पिंपरी : वाहतूक विभागाचा आदेश झुगारून नागरिकांकडून ‘नो पार्किंग झोन’मध्ये, रस्त्यावर, जागा मिळेल त्या ठिकाणी बेकायदा वाहने लावली जात असल्याने वाहतूककोंडीत भर पडत आहे. ही कोंडी कमी करण्याच्या दृष्टीने पोलिसांनी टोइंग व्हॅन प्रकल्प कार्यान्वित केला आहे. अशा पद्धतीने वाहन लावल्यास टोइंगचा खर्च, वस्तू आणि सेवा करासह (जीएसटी) दंड वसूल केला जाणार आहे. दुचाकीसाठी ७३६ रुपये, तर चारचाकीसाठी ९७२ रुपये दंड आकारला जाणार आहे.
पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत चाकण, भोसरी, तळेगाव हे औद्योगिक क्षेत्र, हिंजवडी, तळवडे ही माहिती आणि तंत्रज्ञान नगरी असून देहू आणि आळंदी तीर्थक्षेत्रे आहेत. यासह मोठ्या बाजारपेठा, तसेच शैक्षणिक आणि व्यापारी संकुले आहेत. त्यामुळे शहरातील रस्त्यांवर वाहनांची वर्दळ असते. दुचाकी, तसेच चारचाकी वाहनांचा वापर करणाऱ्या नागरिकांची संख्याही मोठ्या प्रमाणात असून, अनेकजण दुचाकी आणि चारचाकी वाहनांचा वापर करीत असतात. मात्र, काही जण पार्किंगचे नियम न पाळता बेशिस्तीने कोठेही वाहन पार्क करतात. त्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. अशा वाहनांवर पिंपरी-चिंचवड वाहतूक विभागाकडून कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे.
असा असेल दंड
दुचाकींसाठी ५०० रुपये दंड, २०० रुपये टोइंग शुल्क, ३६ रुपये जीएसटी असे ७३६ रुपये, तर चारचाकी वाहनांसाठी ५०० रुपये दंड, ४०० रुपये टोइंग शुल्क आणि ७२ रुपये जीएसटी असा ९७२ रुपये दंड आकारला जात आहे. टोइंग केलेल्या वाहनावर पूर्वीचे चलन आहे का, याची वाहतूक पोलीस तपासणी करतील. प्रलंबित चलनांपैकी एक आणि आताच्या कारवाईचे एक चलन किमान भरणे बंधनकारक असणार आहे. पूर्वी ५०० रुपये दंड, २०० रुपये टोइंग चार्ज, ३६ रुपये जीएसटी असा एकूण ७७६ रुपये दंड आकारला जात होता. आता दुचाकी आणि चारचाकी वाहनांसाठी स्वतंत्र दंडाची रक्कम आकारली जात आहे.
हेही वाचा…बचाव मोहिमांमधून ४१९ कासवांना जीवदान, वन विभागाच्या वन्यजीव उपचार केंद्रामध्ये उपचार
वाहनचालकांनी पार्किंगच्या नियमांचे पालन करावे. नो पार्किंगमध्ये तसेच वाहतुकीला अडथळा होईल अशा पद्धतीने वाहन लावल्यास संबंधितांवर कारवाई केली जाणार आहे. वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी ही कारवाई केली जात असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त बापू बांगर यांनी सांगितले.