पुणे : गेले दोन-तीन दिवसांत शहर आणि परिसराला ऊन, उकाड्यापासून दिलासा मिळाला होता. मात्र, पुढील पाच ते सहा दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची, तसेच किमान तापमानही सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअसने वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुन्हा एकदा उन्हाचा चटका, उकाडा सहन करावा लागणार आहे.गेल्या आठवड्यात तापमानाचा पारा सातत्याने ४० अंश सेल्सिअसवर होता.

मात्र, गेल्या दोन तीन दिवसांत त्यात किंचित घट झाली होती. तसेच दुपारनंतर हवामान ढगाळ होत होते, काही ठिकाणी हलका पाऊसही पडला. त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता काही प्रमाणात कमी झाली. हवामान विभागाच्या आकडेवारीनुसार, शनिवार ते सोमवार या कालावधीत शहरात ठिकठिकाणी ३५ ते ३९ अंश सेल्सिअस दरम्यान तापमानाची नोंद झाली.

त्यानुसार सोमवारी शिवाजीनगर येथे ३९.२, कोरेगाव पार्क, मगरपट्टा, येथे ३८.९, हडपसर येथे ३८.८, वडगाव शेरी येथे ३८.४, चिंचवड येथे ३८, एनडीए येथे ३७.६ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर रविवारी (१३ मार्च) कोरेगाव पार्क येथे ३८.९, शिवाजीनगर येथे ३८.५, मगरपट्टा येथे ३८.४, हडपसर येथे ३८.४, वडगाव शेरी येथे ३८, पाषाण येथे ३७.६, चिंचवड येथे ३७.५, पाषाण येथे ३६.७, तर शनिवारी मगरपट्टा येथे ३७.८, शिवाजीनगर येथे ३७.७, पाषाण येथे ३७.६, कोरेगाव पार्क येथे ३७.२, वडगाव शेरी आणि हडपसर येथे ३६.६, चिंचवड येथे ३६.२, तर एनडीए येथे ३५.५ अंश तापमान नोंदवले गेले. मात्र, पुढील पाच ते सहा दिवस कमाल तापमानात वाढ होऊन ते पुन्हा ४० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. तसेच रात्रीही उकाडा जाणवण्याची शक्यता आहे.

हवामान विभागाचे शास्त्रज्ञ एस. डी. सानप म्हणाले, हवेतील बाष्पाचे प्रमाण कमी झाले आहे. तसेच गुजरात, राजस्थानसारख्या उत्तरेकडील राज्यांमध्येही तापमान वाढले आहे. त्यामुळे तिकडून उष्ण वारे येत आहेत. त्यामुळे पुढील पाच ते सहा दिवस तापमान ४० अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. तसेच किमान तापमानही सरासरीपेक्षा एक ते दोन अंश सेल्सिअस जास्त राहण्याची शक्यता आहे.