पुणे : भर चौकात लघुशंका प्रकरणात गौरव आहुजाला न्यायालयाने बुधवारी जामीन मंजूर केला. या प्रकरणात अटक केल्यानंतर गौरव गेले पंधरा दिवस येरवडा कारागृहात न्यायालयीन कोठडीत होता.
नगर रस्त्यावरील शास्त्रीनगर चौकात गौरव आहुजाने लघुशंका केल्याची चित्रफीत समाज माध्यमातून प्रसारित झाली होती. त्याच्याबरोबर मोटारीत असलेला मित्र भाग्येश ओसवाल याच्याकडे मद्याची बाटली असल्याचे उघडकीस आले होते. त्यानंतर गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश पसार झाला होता. सार्वजनिक ठिकाणी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गौरव आणि त्याचा मित्र भाग्येश यांना येरवडा पोलिसांनी अटक केली हाेती. भाग्येशला न्यायालयाने नुकताच जामीन मंजूर केला होता. गौरवच्या न्यायालयीन कोठडीत वाढ करण्याचे आदेश दिले होते. गौरवने त्याच्या वकिलांमार्फत जामीन मिळवण्यासाठी अर्ज केला होता. गौरवला अटी आणि शर्तीवर न्यायालयाने जामीन मंजूर केल्याची माहिती येरवडा पोलिसांनी दिली.