पुणे : संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज आणि जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचे आगमन रविवारी शहरात होणार आहे. पालखी आगमनामुळे शहरातील वाहतूक व्यवस्थेत मोठ्या प्रमाणावर बदल करण्यात आले आहे. वारकरी, तसेच भाविकांच्या सोयीसाठी शहरातील प्रमुख रस्ते बंद करण्यात येणार आहेत. वाहतूक पोलिसांकडून पालखी सोहळ्या दरम्यान वाहतुकीस बंद असलेले, सुरू असलेल्या रस्त्यांची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध करून देण्यात आली आहे.

पालखी आगमन आणि प्रस्थानाच्या दिवशी शहरातील वाहतूक बदल, तसेच बंद रस्ते, पर्यायी मार्गांची माहिती गुगल मॅपद्वारे मिळणार आहे. पालखी सोहळ्यात लाखो भाविक सहभागी होतात. पालखीचा मार्ग, बंद करण्यात आलेले रस्ते आणि वाहतूक बदलांबाबतची माहिती वाहनचालकांना देण्यासाठी पुणे पोलिसांकडून यंदा गुगल मॅपचा वापर करण्यात येणार आहे. त्यासाठी पोलिसांनी गुगलशी समन्वय साधला आहे. नागरिकांना गुगल मॅपवर वाहतुकीस सुरू असलेले आणि बंद असलेल्या रस्त्यांची त्वरित माहिती मिळणार आहे, अशी माहिती वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त रोहिदास पवार यांनी दिली.

हेही वाचा…आळंदी: इंद्रायणी पुन्हा फेसाळली; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काही तासांपूर्वी दिलं होतं ‘हे’ आश्वास

शहरातील वाहतूक बदल, बंद रस्ते, पालखीचा मार्ग, विसावा, पालखीचा मुक्काम याबाबतची माहिती मिळवण्यासाठी गुगल लिंक https://www.google.com/maps/deditmid=1Nud/8Rsb6grJP82jhCKyn3uzeGFSJLI&usp=sharing चा वापर करावा, असे आवाहन वाहतूक पोलिसांकडून करण्यात आले आहे.

हेही वाचा…विळखा अमली पदार्थांचा… : पुणे :नशेच्या अमलाखाली शहरातील रात्रजीवन

पालख्यांचा मुक्काम नाना-भवानी पेठेत राहणार आहे. या भागातील वाहतूक बदलांविषयी माहिती गुगल मॅपवर मिळणार आहे. दोन्ही पालख्या मंगळवारी (२ जुलै) मार्गस्थ होणार आहेत. प्रस्थान सोहळ्याची माहिती गुगल मॅपवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे.