चांदणी चौकातील पूल स्फोटकांनी पाडण्यात आल्यानंतर अकरा तासांनी बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली. सकाळी दहाच्या सुमारास या भागातील वाहतूक पूर्ववत झाली.मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील जुना पूल मध्यरात्री एक वाजण्याच्या सुमारास स्फोट घडवून पाडण्यात आला. पूल पाडण्यासाठी ६०० किलो स्फोटकांचा वापर करण्यात आला. शनिवारी (१ ऑक्टोबर) बाह्यवळण मार्गावरील वाहतुकीत बदल करण्यात आला. या भागातील वाहतूक पर्यायी मार्गाने वळविण्यात आली. रात्रीपासून या भागात पोलिसांनी प्रतिबंधात्मक आदेश जारी केले होते. रात्री दहानंतर या भागातील वाहतूक थांबविण्यात आली.
हेही वाचा >>> पुणे : दुचाकीवरुन प्रवासी वाहतुकीवर कारवाई करणाऱ्या आरटीओ अधिकाऱ्याला धमकी
मध्यरात्री एक वाजून एक मिनिटांनी स्फोटकांचा वापर करुन पूल पाडण्यात आला. त्यानंतर या भागातील राडारोडा काढण्यास सुरूवात करण्यात आली. रविवारी सकाळी आठ वाजेपर्यंत राडारोडा हटवून बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले होते. सकाळी साडेदहाच्या सुमारास राडारोडा हटविण्यात आला. त्यानंतर अकराच्या सुमारास बाह्यवळण मार्गावरील वाहतूक सुरळीत झाली.