‘नो एन्ट्री’त गाडी दामटवणे, सिग्नल तोडण्यात पुणेकर आघाडीवर
पुणे वाहतूक शाखेतर्फे मागील महिन्यात मोठा गाजावाजा करीत शहरातील प्रमुख रस्ते व चौकांमध्ये शंभर किलोमीटरपेक्षा अधिक अंतराची मानवी साखळी करून वाहतुकीच्या नियमांबद्दल जनजागृती करण्याचे अभियान राबवले गेले. परंतु त्यानंतरही ‘नो एन्ट्री’त गाडी दामटवणे, झेब्रा क्रॉसिंगच्या पुढे गाडी उभी करणे, सर्रास सिग्नल मोडणे या पूर्वीच्या चित्रात तसूभरही फरक पडलेला नाही. त्यामुळे केवळ एक दिवसाच्या अभियानाच्या फार्सनंतर पुन्हा ‘येरे माझ्या मागल्या’ असेच म्हणण्याची वेळ आली आहे.
पुण्यातील खिळखिळ्या सार्वजनिक वाहतुकीमुळे बहुसंख्य पुणेकरांचा भर स्वतचे वाहन वापरण्यावरच आहे. स्वत:चे वाहन नसलेल्यांना पुण्यात प्रवास करणेच अतिशय जीकिरीचे आहे. त्यामुळे शहराच्या प्रमुख रस्त्यांवर कार्यालयीन वेळांमध्ये दररोज वाहतूक कोंडी होते. प्रत्येकालाच घाई असल्याने आपले वाहन पुढे दामटवण्यात नियमांची ‘ऐशीतैशी’ केली जाते. या पाश्र्वभूमीवर वाहतूक नियमांबाबत जनजागृती करण्यासाठी मानवी साखळी तयार करून जनजागृती करण्याचे अभियान राबवले होते.
अभियानाचा भर कशावर?
वाहतूक शाखेकडून राबविण्यात आलेल्या अभियानात वाहतुकीचे किमान पाच नियम तरी पाळा, असा संदेश देण्यात आला होता. मानवी साखळीत सहभागी झालेल्यांना वाहतूक नियम पाळण्याबाबत प्रतिज्ञाही देण्यात आली होती. झेब्रा क्रॉसिंगच्या अगोदर ‘स्टॉप लाइन’वर वाहने थांबविणे, लाल सिग्नल लागल्यानंतर वाहने थांबविणे, हॉर्नचा वापर शक्यतो टाळणे, ‘सीट बेल्ट’ आणि हेल्मेटचा वापर करणे आणि रस्त्यांवर रुग्णवाहिकेला प्रथम प्राधान्य देणे असे हे नियम आहेत. मात्र, प्रत्यक्षात मोजके नागरिक सोडल्यास सर्रासपणे वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन केले जाते आहे. चौकात वाहतूक पोलीस असल्यास नियमांचे पालन केले जाते; अन्यथा लाल दिवा असूनही वाहने पुढे दामटवली जातात.