पुणे : पुणे पोलिसांच्या वाहतूक शाखेत दाखल होणारे पोलीस अधिकारी, तसेच शालेय, महाविद्यालयीन विद्यार्थ्यांना वाहतूक नियमांचे प्रशिक्षण देणारी संस्था सुरू करण्यात येणार असल्याची घोषणा पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शनिवारी केली. वाहतूक पोलिसांची कार्यपद्धती, वाहतूक समस्या, तसेच आव्हानांची माहिती देण्यासाठी पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या संकल्पनेतून वाहतूक शाखा, पुणे प्लॅटफाॅर्म फाॅर कोलॅबोरिटिव्ह रिस्पाॅन्स (पीपीसीआर), टाॅप मॅनेजमेंट कन्सोर्टियम फाऊंडेशन (टीएमसीएफ) आणि जहाँगीर रुग्णालयाच्या सहकार्याने विद्यार्थ्यांंसाठी ‘ पुणे ट्रॅफिक मिटिगेशन इंटर्नशिप प्राेग्राम’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या उपक्रमात सहभागी झालेल्या महाविद्यालयीन युवकांना पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांच्या प्रशस्त्रीपत्र प्रदान करण्यात आले. या वेळी ते बोलत होते.
सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा, अतिरिक्त पोलीस आयुक्त मनोज पाटील, पिनॅकल इंडस्ट्री अँड इकोमोबिलिटीचे संचालक सुधीर मेहता, वेकफिल्ड कंपनीचे संचालक मुकेश मल्होत्रा, माय पेज पुणेचे संचालक अजय अगरवाल, ट्रान्सपोर्टशन सिस्टीम स्ट्रॅटेजिस्ट डिझायनरचे निशित कामत या वेळी उपस्थित होते.
पोलीस आयुक्त अमितेश कुमार म्हणाले, ‘महाविद्यालयीन विद्याथी, तसेच वाहतूक शाखेत दाखल होणाऱ्या पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांना वाहतूक विषयक समस्या, आव्हाने, नियमांची माहिती देण्यासाठी पुणे पोलिसांकडून प्रशिक्षण संस्था सुरू करण्यात येणार आहे. पुण्यातील वाहतूक समस्येची माहिती, नियमांचे पालन, नियमभंग केल्यास होणारी कारवाई याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. अपघात घडल्यानंतर केल्या जाणाऱ्या उपायोजनांची माहिती देण्यात येणार आहे. पुण्यातील वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पुणे पोलिसांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी महापालिकेसह विविध यंत्रणांशी समन्वय साधून वाहतूक समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात आले आहेत. रस्त्यावरील कोंडी सोडवून वाहतूक गतिमान करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. दुतर्फा झालेल्या अतिक्रमणांवर कारवाई करण्यात येत आहे.’
वाहतूक समस्या सोडविण्यासाठी पोलिसांनी झपाटून काम करणे गरजेचे आहे. ज्या भागात कोंडी होत आहे. अशा रस्त्यांची पाहणी करुन कोंडी का होते, याची माहिती घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने पोलिसांकडून प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी नमूद केले.
नियमभंग करणाऱ्यांना ‘अनोखी’ शिक्षा
मद्यप्राशन करुन वाहने चालविणे, विरुद्ध दिशेने वाहन चालविण्यासह विविध प्रकारचे वाहतूक नियमभंग करणाऱ्यांना वाहनचालकांना वाहतूक पोलिसांकडून शिक्षा देण्यात येणार आहे. वाहतूक प्रशिक्षण संस्था सुरू झाल्यानंतर नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांना संस्थेत बोलावून त्यांना वाहतूक नियमांची माहिती देण्यात येणार आहे.
‘ पुणे ट्रॅफिक मिटिगेशन इंटर्नशिप प्राेग्राम’ काय ?
वर्दळीचे चौक, तसेच वाहतूक नियमनाच्यादृष्टीने आव्हानात्मक असलेल्या चौकात विद्यार्थ्यांना चाैकात नेऊन त्यांना वाहतूक नियमनाचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वाहतूक नियमभंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई कशी करण्यात येते, याचीही माहिती देण्यात येणार आहे. अपघात झाल्यानंतर अपघातग्रस्तांना त्वरित मदत कशी करायची, याबाबतची माहिती देण्यात येणार आहे. सीसीटीव्ही कारवाई, तसेच तांत्रिक बाबींची माहिती देण्यात येणार आहे. वाहतूक शाखेचे पोलीस उपायुक्त अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक सुनील गवळी, पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, उपनिरीक्षक रघतवान हे काम पाहत आहेत.