पुणे : गुंड नीलेश घायवळला वाहतूक पोलिसांनी दणका दिला. नगर रस्त्यावरून घायवळ त्याच्या साथीदारांसह काळ्या काचा असलेल्या तीन मोटारींतून निघाला होता. त्यावेळी वाहतूक पोलिसांनी काळ्या काचा असलेल्या मोटारी पाहिल्या. मोटारी अडवून घायवळ आणि साथीदारांकडून सहा हजार रुपयांचा दंड वसूल केला. गुंड घायवळची कोथरुड परिसरात दहशत आहे. खून, खुनाचा प्रयत्न, शस्त्र बाळगणे, खंडणी, अपहरण असे गंभीर गुन्हे घायवळविरुद्ध दाखल आहेत. पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी शहरातील गुंड टोळ्यांच्या म्होरक्यांची झाडाझडती घेतली होती. गुन्हेगारी टोळक्यांच्या म्होरक्यांना पोलीस आयुक्तांनी समज देऊन शहरात गंभीर गुन्हे केल्यास कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा दिला होता. घायवळचे नगर जिल्ह्यातील जामखेड परिसरात मूळगाव आहे. जामखेड परिसरात घायवळने सामाजिक कार्यकर्ता म्हणून दबदबा निर्माण केला आहे. नगर रस्त्यावरून घायवळ आणि साथीदार मंगळवारी दुपारी मोटारीतून निघाले हाेते.
हेही वाचा : एमपीएससीतर्फे मुद्रांक निरीक्षक पदाच्या परीक्षेचा निकाल जाहीर
खराडी जकात नाका परिसरात वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक अरविंद गोकुळे आणि सहकारी वाहनांची तपासणी करत होते. त्यावेळी काळ्या रंगाच्या काचा असलेल्या तीन माेटारी पोलीस निरीक्षक गोकुळे यांनी पाहिल्या. काळ्या काचा, तसेच वाहन क्रमांकाच्या पाटीवर केलेल्या फेरफारामुळे (फॅन्सी नंबर प्लेट) पोलीस निरीक्षक गोकुळे आणि सहकाऱ्यांनी मोटारचालकांची चाैकशी सुरू केली. तेव्हा मोटारीत घायवळ आणि दहा ते पंधरा साथीदार असल्याचे निदर्शनास आले. पोलिसांनी मोटारी अडविल्यानंतर घायवळ आणि साथीदारांनी तेथून जाण्याचा प्रयत्न केला. काळ्या काचा आणि फॅन्सी नंबर प्लेटचा वापर केल्याप्रकरणी वाहतूक पोलिसांनी घायवळसह साथीदारांना सहा हजार रुपयांचा दंड ठोठावला. घायवळ आणि साथीदार निमूटपणे दंड भरून तेथून रवाना झाले.