पुणे : विरुद्ध दिशेने येणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध वाहतूक पोलिसांनी कारवाई तीव्र केली आहे. सहकारनगर परिसरात कारवाई सुरू असताना सांगली जिल्ह्यातील रोहन फाळके याच्या खून प्रकरणातील आरोपीला वाहतूक पोलिसांनी पकडले.

गणेश मळेकर (रा. सांगली) असे अटक करण्यात आलेल्याचे नाव आहे. सहकारनगर वाहतूक विभागाकडून वाहतूक नियमांचा भंग करणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध बिबवेवाडी परिसरात कारवाई करण्यात येत होती. त्यावेळी एक दुचाकीस्वार विरुद्ध दिशेने येत होता. दुचाकीवर तिघे जण होते. वाहतूक पोलिसांना पाहताच मळेकर पळाला. पोलिसांनी त्याला पाठलाग करुन ताब्यात घेतले. चौकशीत सांगलीतील तासगाव परिसरात झालेल्या रोहन फाळके याच्या खून प्रकरणातील तो पसार आरोपी असल्याची माहिती मिळाली.  

हेही वाचा : पिंपरी : आकुर्डी रेल्वे स्थानक येथे ‘बोगी – वोगी’ रेस्टॉरंट

मळेकर फाळके याचा खून करुन पसार झाला होता. झटापटीत त्याच्या पायाला जखम झाली होती. पुण्यात आल्यानंतर त्याने एका दुचाकीस्वाराला सोडण्याची विनंती केल्याची माहिती मळेकरने पाेलिसांना दिली. सहकारनगर वाहतूक विभागातील सहायक पोलीस निरीक्षक प्रशांत खेडकर, पोलीस कर्मचारी स्वप्नील कदम, सागर शिंदे यांनी ही कारवाई केली. वाहतूक पोलिसांनी मळेकरला सहकारनगर पोलिसांच्या ताब्यात दिले.

Story img Loader