पुणे : ग्रामीण भागात कृषी पंपांना वीजपुरवठा करणाऱ्या महावितरणच्या रोहित्रातील तांब्याच्या तारा चोरणाऱ्या टोळीला गुन्हे शाखेने अटक केली. चोरट्यांकडून ८८५ किलो तांब्याची तारा जप्त करण्यात आल्या. जप्त केलेल्या तांब्याच्या तारांची किंमत १० लाख ४२ हजार रुपये आहे. चोरट्यांनी ग्रामीण भागात रोहित्राची तोडफोड करुन तांब्याची तार चोरण्याचे बारा गुन्हे केल्याचे तपासात उघडकीस आले आहे.
अबरार बिलाल अहमद (वय २४), नफीज हमीद अब्दुल (वय २३), मोबीन हमीद अब्दुल (तिघे रा. उत्तर प्रदेश), आफताब नियामतउल्ला खान (वय ३२, रा. नवी मुंबई) अशी अटक करण्यात आलेल्या चोरट्यांची नावे आहेत. ग्रामीण भागात कृषी पंपांना वीज पुरवठा करणाऱ्या महावितरणच्या रोहित्राची तोडफोड करून त्यातील तांब्याच्या तारा चोरीला जाण्याच्या घटना वाढीस लागल्या होत्या. पुणे शहराजवळ असलेल्या लोणीकंद, वाघोली भागात रोहित्रांची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरीला जाण्याच्या घटना घडल्या होत्या. त्याअनुषंगाने गुन्हे शाखेच्या युनिट सहाचे पोलीस निरीक्षक वाहीद पठाण यांच्या मार्गदर्शनाखाली पथक लोणीकंद, वाघोली भागात आरोपींचा शोध घेत होते. तांत्रिक तपासातून मिळालेल्या माहितीनुसार पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतले.
हेही वाचा – टोरेस गैरव्यवहार प्रकरणः मुंबई व जयपूर येथील १३ ठिकाणी ईडीचे छापे
हेही वाचा – शरद पवार यांच्या बाजूला बसणे अजित पवारांनी टाळले, नावाची प्लेट बदलण्यास…
चौकशीत त्यांनी ग्रामीण भागात रोहित्राची तोडफोड करुन तांब्याच्या तारा चोरी केल्याचे उघडकीस आले. पोलिसांनी चौघांना अटक केली. त्यांच्याकडून १० लाख ४२ हजार रुपयांच्या तांब्याच्या तारा जप्त करण्यात आल्या. चोरलेल्या तांब्याच्या तारांची कोणाला विक्री करण्यात आली. यादृष्टीने पोलिसांकडून तपास करण्यात येत आहे. गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त निखील पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहीद पठाण, सहायक निरीक्षक मदन कांबळे, बाळासाहेब सकटे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, रमेश मेमाणे, सुहास तांबेकर, बाळासाहेब तनपुरे यांनी ही कामगिरी केली.