पेशवाईच्या काळात असताना अठराव्या शतकात सातारा जिल्ह्य़ातील माहुली गावचा एक मुलगा नारायण नशीब काढायला माहुलीतून पुण्यात आला आणि रामेश्वर मंदिरात हा दमला भागला निजलेला बालक सरदार खाजगीवालेंच्या नजरेस पडला.
मंडईतील टिळक पुतळ्यासमोरच खाजगीवाले यांचा वाडा होता. हल्लीची मंडई जेथे नारळाची वाडी आणि काही विहिरी होत्या, रामेश्वर मंदिर आणि आताची तुळशीबाग ही सरदार खाजगीवाले यांची मालकी असणारी जागा होती. हा मुलगा कोण, कुठचा वगैरे विचारल्यावर त्यांनी त्याला आपल्या पदरी घेतला. त्याला काही तरी काम द्यावयाचे म्हणून दररोज पूजेसाठी तुळशीची पाने,डिक्ष्या वगैरे आणून देणे हे नारायणाचे काम. घरातील अन्य मुलांसोबत नारायणचे शिक्षण चालू झाले.
त्याचे उत्तम अक्षर, गणित याकडे नजर जाताच त्याला सरदारांनी आपल्या हिशेब विभागात घेतले आणि तेथेच नारायणाने कर वसुली किंवा सरकारी महसूल गोळा करण्याची एक नवी रीत मांडून दाखविली. ती पुढे पेशव्यांना दाखविण्यात आली आणि ती रीत मान्यही झाली. पुढे नारायणास बढती मिळून पालखी पदस्थ सरदारात रूपांतर झाले आणि तेथून नारायण किंवा नारो अप्पाजी खिरे हे नाव बदलून सरदार तुळशीबागवाले म्हणून त्यांची ओळख निर्माण झाली. ज्या भागातून, बागेतून नारायण तुळशीची पाने आणीत असे ती बाग खाजगीवाल्यांनी त्याला देऊ केली. खिरे कुटुंबाचे दैवत श्रीराम म्हणून तुळशीबागेत एक राममंदिर उभे राहिले. ते आजही आहे आणि अन्यही काही मंदिरे तेथे आहेत. असा इतिहास सांगितला जातो.
पेशवाईनंतर आले ब्रिटिश आणि अनेक वर्षांनी खाजगीवाल्यांच्या नारळाच्या वाडीचे लॉर्ड रे मार्केट म्हणजेच हल्लीच्या महात्मा फुले मंडईमध्ये रूपांतर झाले. ज्या जागी पूर्वी बागा होत्या तेथे आता व्यापाराची केंद्रे झाली आहेत. मात्र ज्यांना तुळशीबागेत जायचे असते त्यांना या इतिहासाशी काहीच देणे-घेणे नसते. त्यांना रस असतो तो तेथे असणाऱ्या आणि मिळणाऱ्या नानाविध प्रकारच्या वस्तूंमध्ये! तुळशीबागेत काय मिळत नाही, असे विचारले तर इलेक्ट्रॉनिक वस्तू, असे उत्तर देता येईल. आत शिरल्याबरोबर असणारी देवदेवतांच्या मूर्तीची दुकाने, भांडी-कुंडी, संसारास लागणारी बहुतेक सर्व आवश्यक साधनसामग्री देणारी दुकाने, पूजासाहित्य म्हणजे दिवे, समया वगैरे, खरे खोटे दागिने, खेळणी, भेटवस्तू यांची असंख्य दुकाने येथे आहेत आणि गंमत म्हणजे गेली कित्येक वर्षे ही सर्व दुकाने उत्तम चालत आहेत.
तुळशीबागेच्या आत जशी दुकाने आहेत तशी बाहेरच्या बाजूसही आहेतच, त्यात स्वेटर, कपडे, धान्य, किराणा, टिकल्या, नकली दागिने, कलाकुसर करणाऱ्यांसाठी लागणाऱ्या वस्तूंची अनेक दुकाने आहेत. खरे तर तुळशीबाग ही सुमारे एक एकराची चारही बाजूंनी बंद, पैकी तीन बाजूंनी आतून बाहेरून दुकाने, काही देवळे व एक नगारखाना असणारी वास्तू आहे. मात्र गेले वर्षांनुवर्षे दररोज खरेदी करण्यासाठी झुंबड उडविणाऱ्या महिलांसाठी तुळशीबाग म्हणजे शनिपार चौक ते आर्यन वाहनतळ, तसेच तेथून डावीकडे वळून बाबूगेनू चौकापर्यंत आणि तेथून विश्रामबाग वाडा हे रस्ते आणि पोट गल्ल्या म्हणजे तुळशीबाग. वास्तविक जगात कोठेही मिळणाऱ्या वस्तू तुळशीबागेत मिळतात. म्हणजेच इथे मिळणारी कोणतीही वस्तू अन्यत्र मिळू शकते. पण इथे जितकी ‘व्हरायटी’ आणि नवनवीन प्रकार असतात तसे एवढ्या मोठय़ा प्रमाणात म्हणजे गंगावनापासून पाण्याच्या बंबापर्यंत आणि पाच रुपयांच्या कानातल्यापासून अस्सल सोन्याच्या दागिन्यांपर्यंत इथे काहीही असते, खपते. बहुतेकांचे संसार येथील भांडी-कुंडय़ांपासून सुरू होतात आणि फुललेल्या संसारास लागणाऱ्या असंख्य आणि नवनवीन वस्तू इथे हजर असतात. येथे किती कोटींचा व्यापार चालतो हे सांगणे कठीण आहे. मात्र सर्वच व्यावसायिकांची भगभराट होते हे खरे. इथल्या छोटय़ा व्यावसायिकांकडे कामास असणारी व्यक्ती मंत्रिमंडळापर्यंत पोहोचली आहे.
उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो, त्या त्या ऋतूंसाठी लागणाऱ्या वस्तू इथे असतात आणि त्याच्या ग्राहक महिलाही सदैव खरेदीस तत्पर आणि सिद्ध असतात. बाहेरगावहूनच काय, परदेशातून आलेली महिला कितीही गडबडीत असली तरी तुळशीबागेत चक्कर मारणारच. कारण तुळशीबाग हा महिलांचा हक्काचा प्रांत आहे, तुळशीबाग हा ब्रँड आहे.