पुणे : गेल्या काही दिवसांपासून पुणे विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या तसेच पुणे विमानतळावर येणाऱ्या देश-परदेशातील विमानांमध्ये बॉम्ब असल्याचा संदेश समाज माध्यमांद्वारे येत असल्याचा प्रतिकूल परिणाम विमान वाहतुकीवर होत आहे. अशाच प्रकारे विस्तारा विमान कंपनीची दिल्ली ते पुणे फ्लाईट क्रमांक युके ९९१ मध्ये बॉम्ब असल्याचा संदेश ॲडम अलंजा ६४६ ट्विटर हँडल वरून अज्ञात व्यक्तीने दिला. त्यामुळे पुणे विमानतळावर पुन्हा खळबळ उडाली. याप्रकरणी तपासानंतर ही अफवा असल्याचे निष्पन्न झाले.
याबाबत विमानतळ पोलीस ठाण्यात विजय गणपत नाणेकर (वय ३५, रा. टिंगरेनगर) यांनी अज्ञात ट्विटर हँडल विरोधात तक्रार दाखल केली आहे. अज्ञात व्यक्तीने ॲडम अलंजा ६४६ ट्विटर हँडल वरून ‘आय प्लेस्ड पाईप बॉम्बस ऑन बोर्ड ऑफ द फॉलोइंग फ्लाइट्स युके’ असा संदेश प्रसारित केला. धमकी असलेला मजकूर ट्विट करून विस्तारा कंपनीचे विमान दिल्ली ते पुणे या विमानामधील प्रवासी तसेच विमानतळ परिसरातील नागरिक आणि प्रवाशांमध्ये खोटी माहिती पसरवूनन भीतीदायक वातावरण निर्माण केले. तसेच त्यांच्या जीवितास तसेच सुरक्षेस धोका निर्माण केला आहे. याबाबत विमानतळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक एन धामणे पुढील तपास करत आहेत.
हेही वाचा…दिवाळीनिमित्त बारामतीत पवार कुटुंब एकत्र दिसणार का? या प्रश्नावर अजित पवारांचे दोन शब्दांत उत्तर…
u
दोन दिवसांपूर्वीही अशीच धमकी
पुणे विमानतळावर दोन दिवसापूर्वी अशाच प्रकारे इंडिगो एअरलाइन्सच्या हैदराबाद ते पुणे, जोधपूर ते पुणे हा विमान प्रवास करणाऱ्या विमानांना ‘या विमानांमध्ये बॉम्ब आहे’, असा संदेश मंदआइमेसर या ट्विटर हँडल वरून आला होता. तसेच वेगवेगळ्या विमानांचे क्रमांकही देण्यात आले होते. अशाप्रकारे विमानातील प्रवासी तसेच विमानतळ परिसरातील नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करून अफवा पसरवण्यात आली होती.