अमली पदार्थाची विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या दोघांना गुन्हे शाखेने पांडवनगर परिसरातून अटक केली. त्यांच्याकडून दोन लाख दहा हजार रुपयांचे ६ ग्रॅम मेफेड्रोन (एमडी) जप्त करण्यात आले. विराज इंद्रकांत छाडवा (वय ३२, रा. हेल्थ कॅम्प मित्र मंडळाजवळ, पांडवनगर, वडारवाडी), जयेश भारत कोटियाना (वय २०, रा. तिरुपती लॅान, टिंगरेगनर, विश्रांतवाडी) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.

छाडवा आणि कोटियाना पांडवनगर परिसरात मेफेड्रोन विक्री करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या युनिट सहाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडून दोन लाख दहा हजारांचे मेफेड्रोन, इलेक्ट्रॅानिक वजनकाटा, दोन मोबाइल संच असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. दोघांच्या विरोधात चतु:शृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सहायक आयुक्त नारायण शिरगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक गणेश माने, उपनिरीक्षक भैरवनाथ शेळके, मच्छिंद्र वाळकेर, विठ्ठल खेडकर, रमेश मेमाणे, प्रतीक लाहिगुडे आदींनी ही कारवाई केली.