पुणे : महंमदवाडी आणि हांडेवाडी भागात दोन डीपी रस्ते डेव्हलपमेंट क्रेडिट नोटच्या मोबदल्यातून करण्यात येणार आहेत. पालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत हे दोन्ही रस्ते करण्याचा प्रस्ताव गुरुवारी मान्य करण्यात आला. यासाठी ८८ कोटी ८३ इतका खर्च अंदाजे येणार आहे.

पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशीपच्या धर्तीवर ‘डेव्हलपमेंट क्रेडिट नोट’ या मोबदल्याच्या स्वरुपात शहरातील डीपी रस्ते व पूल खासगी सहभागातून विकसित करण्याचा निर्णय पालिकेने घेतलेला आहे. त्यानुसार महंमदवाडी येथील सर्व्हे क्रमांक १६ आणि ८ पार्ट मध्ये २४ मीटर डीपी रस्ता करणे, उंड्री सर्व्हे नंबर २०, २२, २६ ते हांडेवाडी सर्व्हे नंबर १,२, ६ या दरम्यानचा २४ मीटर आर.पी. रस्ता पीपीपी तत्वावर विकसित केला जाणार आहे. शहरातील विविध भागांत वाहतुकीचा प्रश्न अधिकच गंभीर होत चालला आहे. या वाहतूक कोंडीचा फटका अनेकांना बसला असून अनेक भागांतील रस्ते अरुंद असल्याने वाहतूक कोंडी होत असल्याचे समोर आले आहे.

हेही वाचा – पुणे : सणासुदीत वाहन चोरट्यांचा उच्छाद, ११ दुचाकी, दोन रिक्षांची चोरी

या पार्श्वभूमीवर शहराच्या विकास आराखड्यातील (डीपी) रस्ते प्राधान्यक्रमाणे मोठे करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. पालिकेकडे हे रस्ते करण्यासाठी पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने अनेकदा अडचणी येतात. त्यामुळे पालिकेने पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप धर्तीवर डेव्हलपमेंट क्रेडिट नोट या मोबदल्याच्या स्वरुपात शहरातील डीपी रस्ते व पूल खासगी सहभागातून विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शहरातील सात डीपी रस्ते आणि दोन उड्डाणपुलांची कामे पीपीपी पद्धतीने करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे.

हेही वाचा – पुणे : शिवसेना पदाधिकारी गेले ‘वर्षा’ बंगल्यावर, ‘हे’ आहे कारण!

महंमदवाडी येथे २४ मीटर डीपी रस्ता करणे, उंड्री ते हांडेवाडी दरम्यानचा २४ मीटर आर.पी.रस्ता पीपीपी तत्वावर विकसित केला जाणार आहे. या कामामुळे या परिसरातील वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे, असा दावा पालिका प्रशासनाकडून केला जात आहे. स्थायी समितीच्या बैठकीत हे दोन्ही रस्ते विकसित करण्यासाठी मान्यता द्यावी, असा प्रस्ताव ठेवण्यात आला होता. त्याला महापालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या समितीच्या बैठकीत मान्यता देण्यात आली.