पुणे विद्यापीठाच्या ५२९ कोटी रुपये खर्चाच्या आणि ११७ कोटी रुपये तुटीच्या अर्थसंकल्पाला अधिसभेने रविवारी मंजुरी दिली असून व्हच्र्युअल क्लासरूम, विद्यार्थ्यांसाठी नव्या शिष्यवृत्ती योजना अशा विविध योजनांसाठी या अर्थसंकल्पामध्ये तरतूद करण्यात आली आहे. या वर्षी प्रथमच विद्यापीठाच्या अर्थसंकल्पातील तरतुदींनुसार खर्च होतो आहे का, हे पाहण्यासाठी ‘बजेट इम्प्लिमेंटशन कमिटी’ स्थापन करण्याचा निर्णय विद्यापीठाने घेतला आहे.
पुणे विद्यापीठाने तुटीचा अर्थसंकल्प मांडण्याची परंपरा कायम राखत यावर्षी मांडलेल्या ११७ कोटी रुपये तुटीच्या आणि ५२९ कोटी रुपये खर्चाच्या अर्थसंकल्पाला अधिसभेने मंजुरी दिली. यावर्षी अनेक नव्या योजनांसाठी विद्यापीठाने तरतुदी केल्या आहेत. विद्यापीठामध्ये विद्यार्थ्यांसाठी व्हच्र्युअल क्लासरूम सुरू करण्याची योजना आखण्यात आली असून त्यासाठी ५ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे देशभरातील गुणवान विद्यार्थ्यांसाठी पुणे विद्यापीठ प्रतिष्ठित अभ्यासवृत्ती सुरू करणार असून त्यासाठी ५० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. कॅप भवनच्या उभारणीसाठी १ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. विभागीय संशोधन विकास कार्यक्रमासाठी ४ कोटी ७३ लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. आपत्कालीन व्यवस्थापन प्रशिक्षणासाठी ५० लाख रुपये तरतूद करण्यात आली आहे. विद्यार्थिनींच्या सक्षमीकरणासाठी ‘विद्यार्थिनी आरोग्य प्रबोधन योजना सुरू करण्यात येणार आहे. या शिवाय गुणवत्ता सुधार कार्यक्रमासाठी १८ कोटी ४० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. लोकशिक्षण आणि प्रबोधनाच्या कार्यक्रमांसाठी १ कोटी ३० लाख रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.
दरवर्षी विद्यापीठाकडून तुटीचा अर्थसंकल्प मांडला जातो. मात्र, केलेल्या तरतुदी खर्च होत नसल्यामुळे तो अधिक्याचा होत असल्याचे अधिसभा सदस्यांनी निदर्शनास आणले. त्या पाश्र्वभूमीवर विद्यापीठाने अर्थसंकल्पामध्ये केलेल्या तरतुदींनुसार खर्च होतो आहे का, याची पाहणी करण्यासाठी विद्यापीठाने प्रथमच ‘बजेट इम्प्लिमेंटशन कमिटी’ स्थापन केली आहे. डॉ. मंगेश कराड यांच्या अध्यक्षतेखाली पाच सदस्यांची समिती स्थापन करण्यात आली आहे. दर महिन्याला ही समिती तरतुदी आणि खर्चातील समन्वयाचा आढावा घेणार आहे.
 
सदस्यांची उदासीनता
आपापल्या गटांच्या, शिक्षणसंस्थांच्या मागण्यांसाठी विद्यापीठाला सातत्याने धारेवर धरणाऱ्या अधिसभा सदस्यांना विद्यापीठाच्या अर्थसंकल्पासारख्या महत्त्वाच्या विषयाशी घेणे-देणे नसल्याचे चित्र अधिसभेमध्ये रविवारी पहायला मिळाले. अर्थसंकल्प मंजूर करण्यासाठी जेम-तेम पंचवीस सदस्य सभागृहामध्ये उपस्थित होते.
 
१७ लाख ते ५२९ कोटी रुपये
पुणे विद्यापीठाने १९४९-५० या वर्षांमध्ये पहिला अर्थसंकल्प १७ लाख रुपयांचा मांडला होता. विद्यापीठाच्या रौप्यमहोत्सवी वर्षांचा अर्थसंकल्प २११ लाख रुपयांचा होता. पहिल्या अर्थसंकल्पापासून यावर्षी मांडण्यात आलेल्या ६४ व्या अर्थसंकल्पामध्ये ५०० कोटी रुपयांपेक्षा अधिक फरक आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune universities budget of rs 529 cr sanctioned
Show comments