पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनीयरिंग यांच्यातर्फे आपत्ती निवारण-बचाव याबाबतचा प्रमाणपत्र अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. भारतात विद्यापीठ स्तरावर पहिल्यांदाच अशा प्रकारचा अभ्यासक्रम राबवला जाणार आहे.
गार्डियन गिरिप्रेमी इन्स्टिट्यूट ऑफ माउंटेनीयरिंगचे संस्थापक- संचालक उमेश झिरपे यांनी या अभ्यासक्रमाची माहिती दिली. ‘सर्टिफिकेट कोर्स इन आउटडोअर रेस्क्यू अँड डिझास्टर मॅनेजमेंट’ या अभिनव अभ्यासक्रमात आपत्ती व्यवस्थापनाचे प्रकार, त्याची वैशिष्ट्ये, आपत्तींमुळे होणारा परिणाम, त्यावरील उपाय योजना, शोध आणि बचाव मोहिमांची तंत्रे, प्रथमोपचाराची माहिती, वैद्यकीय सुविधांचा वापर अशा घटकांचा समावेश आहे.
आपत्ती व्यवस्थापन, आपात्कालीन मदत आणि सेवा या क्षेत्रातील प्रशिक्षित आणि तज्ज्ञांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. एकूण १८० तासांच्या या अभ्यासक्रमात सात ते आठ दिवसांचे निवासी प्रात्यक्षिक प्रशिक्षण दिले जाईल. अभ्यासक्रमाला प्रवेशासाठी बारावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमाची प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, प्रवेशासाठी १४ जानेवारी ही अंतिम मुदत आहे. अभ्यासक्रमाची माहिती https://bit.ly/CCORDMFeb2023 या संकेतस्थळावर देण्यात आली आहे.
झिरपे म्हणाले, गेल्या काही वर्षात निसर्गातील आपत्तींचे प्रमाण वाढले आहे. अशा आपत्तीच्या काळात, डोंगरदऱ्यात, दुर्गम भागात अपघात झाल्यास प्रशिक्षित मनुष्यबळाची मदतकार्यात आवश्यकता असते. प्रशिक्षित मनुष्यबळाच्या साहाय्याने कमी वेळेत आणि योग्य पद्धतीने मदतकार्य पार पाडता येते. या सर्व बाबींचा विचार करून अभ्यासक्रम तयार करण्यात आला आहे.
अभ्यासक्रमामुळे आपत्ती व्यवस्थापनाचे, बचाव आणि मदतकार्याचे तांत्रिक शिक्षण दिले जाईल. त्यामुळे नैसर्गिक आपत्तीच्या वेळी बचाव, मदतकार्यासाठी कुशल मनुष्यबळ उपलब्ध होणार आहे. तसेच, आपत्ती निवारण आणि व्यवस्थापन या महत्त्वाच्या विषयांवर सर्वकष काम करण्याची संधी उपलब्ध होणार आहे, असे डॉ. दीपक माने, संचालक, क्रीडा आणि शारीरिक शिक्षण मंडळ, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ यांनी सांगितले.