पुणे : गणेशखिंंड रस्त्यावरील ब्रेमेन चौक ते ई-स्क्वेअर या मार्गातील उड्डाणपुलाची एक बाजू एक मे रोजी वाहतुकीसाठी खुली करण्यात येणार आहे. बाणेर आणि राजभवनकडे येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम ऑगस्टपर्यंत पूर्ण केले जाणार असल्याने या मार्गावरील वाहतुकीची कोंडी सुटणार आहे. शिवाजीनगरचे आमदार सिद्धार्थ शिरोळे यांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनात मांडलेल्या पुण्यातील प्रश्नांची माहिती पत्रकार परिषदेत दिली, त्या वेळी ते बोलत होते.
‘गणेश खिंंड रस्त्यावरील ब्रेमेन चौक ते ई-स्क्वेअर या मार्गातील उड्डाणपुलाची एक बाजू वाहतुकीसाठी खुली झाल्यानंतर या भागातील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल. बाणेर आणि राजभवनकडे येणाऱ्या उड्डाणपुलाचे काम ऑगस्टपर्यत पूर्ण केले जाणार आहे. त्यानंतर या मार्गावरील वाहतूक कोंडी सुटणार आहे,’ असे शिरोळे यांनी सांगितले.
‘ससून रुग्णालयातील प्रशासकीय व्यवस्थेमध्ये बदल करण्याची गरज असल्याची सूचना सरकारला केली आहे. जीबीएस रुग्णांसाठी अनुदानात वाढ करण्याची मागणीही केली आहे. जीबीएस रुग्णांना होणारा त्रास आणि होणारा खर्च विचारात घेऊन आयुष्मान योजना आणि महात्मा फुले जन आरोग्य योजनेद्वारे दोन लाखांपर्यंत दिल्या जाणाऱ्या अनुदानात वाढ करण्यासाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी दिले आहे,’ असे त्यांनी नमूद केले.
माजी नगरसेवक दत्तात्रय खाडे, गणेश बागडे, रवींद्र साळेगावकर, सुनील पांडे, आनंद छाजेड, किरण ओरसे, सचिन वाडेकर, प्रकाश सोळंकी या वेळी उपस्थित होते.
‘सीसीटीव्हीसाठी धोरण’ महिनाभरात
‘शहराच्या सुरक्षेसाठी ‘सीसीटीव्ही’चे सर्वंकष धोरण तयार करण्याची मागणी विधानसभेत केली होती. पोलीस, महापालिका, मेट्रो आणि अन्य काही खासगी संस्थांच्या माध्यमातून सीसीटीव्ही चालवण्यात येतात. या कॅमेऱ्यांच्या दर्जामध्ये फरक आहे. त्याची देखभालही होत नसल्याचे लक्षात आणून दिले. शहरात १० हजार कॅमेरे आहेत. आणखी १० हजार कॅमेरे बसविण्याची आवश्यकता आहे. ‘सीसीटीव्ही’साठीचे सर्वंकष धोरण येत्या महिन्याभरात करण्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहे.’ असे सिद्धार्थ शिरोळे यांनी सांगितले.
पुणे-मुंबई ‘इकॉनॉमिक कॉरिडॉर’ प्राधिकरण
‘मुंबईमध्ये वेगाने विकास होत आहे, नवी मुंबईमध्ये विमानतळ होत आहे. त्यामुळे पुणे-मुंबई इकॉनॉमिक कॉरिडॉर प्राधिकरण स्थापन करण्याची मागणी केली आहे,’ असे आमदार शिरोळे यांनी स्पष्ट केले.
कटक मंडळांच्या विलीनीकरणाबाबत बैठक
‘पुणे आणि खडकी कटक मंडळांंचे महापालिकेमध्ये विलीनीकरण करण्यातील अडचणींतून मार्ग काढण्यासाठी येत्या १५ दिवसांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांंच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येणार आहे. सध्या या परिसरातील जमिनींच्या मालकी हक्काचा प्रश्न आहे,’ असे आमदार शिरोळे यांनी सांगितले.