१० वर्षांत १६ कोटींचा खर्च, नूतनीकरणाचे काम मात्र रखडलेलेच
शिक्षणाचे माहेरघर असलेल्या पुण्यातील सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या मुख्य इमारतीच्या दुरुस्तीचे काम दहा वष्रे झाले तरी अजूनही पूर्ण झालेले नाही. दीडशे वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यासाठी लागलेल्या वेळेपेक्षा अधिक काळ इमारतीच्या नूतनीकरणातच गेला आहे. दुरुस्तीसाठीच्या निधीच्या तरतुदीतही आतापर्यंत जवळपास ६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. म्हणजेच तब्बल १६ कोटींचा खर्च १० वर्षांत खर्च झाला, मात्र नूतनीकरणाचे काम अद्यापही रखडलेलेच आहे.
विद्यापीठाची मुख्य इमारत ही ‘अ’ दर्जाचा ऐतिहासिक वारसा म्हणून घोषित करण्यात आली आहे. दीडशे वर्षांपूर्वी ही इमारत बांधण्यासाठी जेवढा कालावधी लागला, त्यापेक्षा अधिक कालावधी त्याच्या नूतनीकरणाला लागला आहे. या इमारतीची पायाभरणी १८६४ मध्ये झाली आणि १८७१ मध्ये या इमारतीचे काम पूर्ण झाले. सात वर्षांमध्ये ही भव्य दगडी इमारत उभी राहिली. मात्र, इमारतीच्या दुरुस्तीचे काम गेल्या दहा वर्षांतही पूर्ण होऊ शकलेले नाही. इमारतीच्या नूतनीकरणाचे काम २००६ मध्ये सुरू झाले. गेल्या साधारण दहा वर्षांत झालेल्या प्रत्येक कुलगुरूंनी वर्षभरात, दोन वर्षांत इमारतीच्या दुरुस्तीचे काम पूर्ण होईल, अशा घोषणा केल्या. प्रत्यक्षात दहा वर्षे झाली, सात कुलगुरू बदलले, चार कंत्राटदार बदलले, तरीही इमारतीचे काम पूर्ण झालेले नाही.
या काळात विद्यापीठाने दुरुस्तीसाठी ठेवलेल्या निधीतही जवळपास ६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे. या इमारतीच्या नूतनीकरणासाठी विद्यापीठाने सुरुवातीला साडेदहा कोटी रुपयांचा निधी ठेवला होता. नंतर तो वाढवून १२ कोटी ४६ लाख रुपयांपर्यंत गेला. त्यात आता साडेचार कोटी रुपयांची वाढ झाली असून साधारण १६ कोटी रुपये खर्च होणार आहे. आतापर्यंत त्यातील १४ कोटी ४ लाख रुपये खर्चही झाले आहेत. अजून पॉलिशिंग, कोटिंग, काही लाकूडकाम आणि मनोऱ्यांचे काम राहिले असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
इमारतीच्या नूतनीकरणाचा इतिहास
- या इमारतीच्या नूतनीकरणाचा विषय २००३ मध्ये सुरू झाला. त्या वेळी डॉ. अशोक कोळस्कर हे कुलगुरू होते. त्या वेळी इमारतीचे छत, गच्ची अशा प्रकारच्या तात्पुरत्या दुरुस्त्या करण्यात आल्या. त्यानंतर नूतनीकरणाचा सुरू झालेला विषय पुन्हा थंडावला.
- २००६ मध्ये मुख्य इमारतीचा एक कोपरा ढासळला आणि इमारतीच्या नूतनीकरणाच्या विषयाने पुन्हा उचल खाल्ली. गरजेपुरत्या दुरुस्त्या न करता संपूर्ण इमारतीचे नूतनीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्या वेळी डॉ. नरेंद्र जाधव हे विद्यापीठाचे कुलगुरू होते. त्यानुसार एका संस्थेकडे या इमारतीच्या नूतनीकरणाचे कंत्राट देण्यात आले. मात्र, डिसेंबर २००७ मध्ये काम बंद झाले.
- जून २००८ मध्ये नव्या कंत्राटदारासह कामाची पुन्हा सुरुवात झाली. त्या वेळी २००९ पर्यंत काम पूर्ण करण्याची घोषणा झाली. डॉ. रघुनाथ शेवगांवकर कुलगुरू असताना २०११ मध्ये काम पुन्हा सुरू झाले. मात्र, त्यावेळीही कंत्राटदाराने काम अर्धवट टाकले.
- २०१२ मध्ये डॉ. वासुदेव गाडे यांची कुलगुरू म्हणून नियुक्ती झाली. त्या वेळी नव्या कंत्राटदाराची नेमणूक करण्यात आली. डिसेंबर २०१३ पर्यंत मुख्य इमारतीचे काम पूर्ण करण्याची घोषणा डॉ. गाडे यांनी केली. मात्र, काम करणाऱ्या कंत्राटदाराचा अपघाती मृत्यू झाला आणि काम पुन्हा रेंगाळले. त्यानंतर कंत्राटदार बदलण्यात आला.
मुख्य इमारतीचे काम सुरू आहे. इमारतीचे काम पूर्ण व्हायला अजून साधारण ८ ते १० महिने लागू शकतील.
– डॉ. वासुदेव गाडे, कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ