पुणे : पीएच.डी. प्रबंध सादर करण्यासाठी विद्यार्थ्याकडे लाच मागणाऱ्या प्राध्यापिकेवर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून कारवाई करण्यात आली आहे. त्यानुसार संबंधित प्राध्यापिकेची ‘गाइडशीप’ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला असून, प्राध्यापिकेकडे मार्गदर्शन घेणाऱ्या आठही विद्यार्थ्यांना दुसऱ्या गाईडकडे स्थलांतरित करण्यात आले आहे.
सांगवी येथील बाबुरावराजी घोलप महाविद्यालयात अर्थशास्त्र विषयाच्या प्राध्यापिका डॉ. शकुंतला माने पीएच.डी. मार्गदर्शक म्हणून कार्यरत होत्या. डॉ. माने यांनी पीएच.डी.चा प्रबंध विद्यापीठाकडे मान्यतेसाठी सादर करण्यासाठी विद्यार्थ्याकडून २५ हजार रुपयांची लाच मागितली. मात्र, संबंधित विद्यार्थ्याने तक्रार नोंदवल्यावर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सापळा लावून माने यांना रंगेहात पकडले. त्यानंतर शिक्षण क्षेत्रातून पीएच.डी. मार्गदर्शकांकडून संशोधक विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या त्रासाचा मुद्दा समोर आला. या प्रकाराची दखल घेऊन विद्यापीठाने पीएच.डी.च्या विद्यार्थ्यांना नाव गोपनीय ठेवून तक्रार करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला.
हेही वाचा…बीबीए, बीसीएच्या निर्णयाविरोधात शिक्षण संस्थांनी न्यायालयात का धाव घेतली?
या पार्श्वभूमीवर प्र कुलगुरू डॉ. पराग काळकर म्हणाले, की संबंधित प्राध्यापिकेची ‘गाइडशीप’ रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच त्यांच्याकडे असलेले विद्यार्थी स्थलांतरित करण्यात येणार आहेत. या संदर्भातील कार्यवाहीचा अहवाल सादर करण्याचे निर्देश संबंधित संशोधन केंद्राला देण्यात आले आहेत.