पुणे : ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांनी शुक्रवारी सायंकाळी रामायणातील व्यक्तिरेखा असलेल्या नाटक अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांनी बंद पाडले. नाटकातील संवादातून भावना दुखावल्या प्रकरणी ललित कला केंद्राचे विभागप्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना पोलिसांनी अटक केली. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील ललित कला केंद्राच्या विद्यार्थ्यांचे रामायणातील व्यक्तिरेखा असलेले नाटक शुक्रवारी सायंकाळी अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या (अभाविप) कार्यकर्त्यांनी बंद पाडले. पात्रांच्या तोंडी आक्षेपार्ह संवाद असल्याचा, धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप अभाविपकडून करण्यात आला. याबाबत अभाविपंकडून तक्रार देण्यात आली.
हेही वाचा…पुणे : वादात सापडलेल्या नाटकावरून आता समाजमाध्यमांत ‘रामायण’
ललित कला केंद्रातील विद्यार्थ्यांनी रामायणातील व्यक्तिरेखांवर नाटक सादर केले. या नाटकात भावना दुखावणारे संवाद होते. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून विभाग प्रमुख प्रवीण भोळे यांच्यासह सहा जणांना अटक केली आहे, अशी माहिती परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त विजयकुमार मगर यांनी दिली. भोळे विभाग प्रमुख आहेत. नाटक सादर करण्यापूर्वी किमान त्यांनी संहिता वाचायला हवी होती. भावना दुखावून समाजात तेढ निर्माण करणे हा दखलपात्र गुन्हा असल्याचे मगर यांनी स्पष्ट केले.