परीक्षेच्या नियोजनांत विविध प्रकारचे गोंधळ कसे घालता येतील, याचे प्रदर्शनच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने गेल्या काही वर्षांपासून मांडले आहे. आतापर्यंत झालेल्या परीक्षांमध्ये प्रश्नपत्रिका डाऊनलोड न होणे, परीक्षा उशिरा सुरू होणे हे गोंधळ सुरूच होते. आता प्रवेश पत्रांमधील चुकाही समोर येत आहेत.
व्यवस्थापन अभ्यासक्रमाच्या अनेक विद्यार्थ्यांच्या प्रवेशपत्राच चुका असल्याची तक्रार विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. परीक्षा अर्ज, शुल्क भरूनही ज्या विषयाची परीक्षा द्यायची, त्या विषयाचा प्रवेश पत्रात समावेशच न केल्यामुळे विद्यार्थ्यांना मनस्तापाला सामोरे जावे लागले. व्यवस्थापन शाखेच्या पदव्युत्तर अभ्यासक्रमांची दुसऱ्या आणि चौथ्या सत्राची परीक्षा सध्या सुरू आहे. मात्र, काही विद्यार्थ्यांचे तिसऱ्या सत्रातील विषय राहिले होते. या विद्यार्थ्यांनी परीक्षा अर्ज विषय आणि शुल्कही भरले. मात्र, विद्यापीठाच्या प्रवेशपत्रावर तिसऱ्या सत्राच्या विषयांचा समावेश करण्यात आला नाही. त्यामुळे काही विद्यार्थ्यांना तिसऱ्या सत्राची परीक्षा देण्यासाठी महाविद्यालयाने मनाई केली. विद्यार्थ्यांकडील प्रवेश पत्राबरोबरच महाविद्यालयांना पाठवण्यात येणाऱ्या सारांश यादीतही या विद्यार्थ्यांच्या विषयाचा समावेश नसल्यामुळे विद्यार्थ्यांचा गोंधळ झाला.
याबाबत विद्यार्थ्यांनी महाविद्यालयाला विचारल्यानंतर महाविद्यालयाने विद्यापीठाकडे बोट दाखवले. विद्यापीठाच्या परीक्षा विभागातही विद्यार्थ्यांना दाद मिळालीच नाही. परीक्षा विभागाने महाविद्यालयाकडे बोट दाखवले. अखेरीस विद्यापीठ आणि महाविद्यालय अशा खेपा घालून या विद्यार्थ्यांना गुरुवारी होणाऱ्या परीक्षेला बसण्याची परवानगी मिळाली. विद्यापीठ आणि महाविद्यालयांतील परस्पर गोंधळामुळे विद्यार्थ्यांना मात्र मनस्तापाला सामोरे जावे लागले. ‘मुळातच आम्हाला प्रवेश पत्रे वेळेवर मिळाली नाहीत. परीक्षेच्या तयारीसाठी दिलेल्या सुट्टीत प्रवेश पत्रे मिळाली. त्यामुळे त्यातील चुका सुधारण्यासाठी वेळ मिळाला नाही,’ असे विद्यार्थ्यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा