पुणे विद्यापीठाच्या प्रस्तावित नामविस्तारातील ‘ज्ञानज्योती’ शब्द वगळून ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याच्या प्रस्तावाला पुणे विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषदेने शनिवारी संमती दिली असून विद्यापीठाचा नामविस्तार करण्याबाबत पुढील आठवडय़ामध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे, असे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले.
विद्यापीठाच्या अधिसभेत पुणे विद्यापीठाचा नामविस्ताराचा प्रस्ताव एकमताने मंजूर करण्यात आला होता. त्यानुसार अधिसभेने विद्यापीठाचे नाव ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’  असे करण्यात यावे अशी शिफारस व्यवस्थापन परिषदेला केली होती. मात्र, ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’  हे नाव खूप मोठे होत असल्यामुळे त्यातील ‘ज्ञानज्योती’ हा शब्द वगळून ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असा नामविस्तार करण्याला व्यवस्थापन परिषदेने मंजुरी दिली आहे. नामविस्ताराबाबत पुढील आठवडय़ामध्ये शासनाकडे प्रस्ताव पाठवण्यात येणार आहे.
पुणे विद्यापीठाच्या नामविस्तारासाठी गेली काही वर्षे विविध पातळ्यांवर आंदोलने करण्यात आली होती. परिवर्तनवादी चळवळीतील कार्यकर्त्यांनी या मागणीसाठी विविध प्रकारे सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला होता. राज्य शासनाने नामविस्ताराबाबत अनेकदा भूमिका स्पष्ट करताना विद्यापीठाने असा प्रस्ताव पारित करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. त्या पाश्र्वभूमीवर आज संमत झालेला प्रस्ताव विद्यापीठाकडून शासनाकडे पाठवण्यात येणार असून त्यानंतर नामविस्ताराचा निर्णय हा शासनस्तरावर होणार आहे.
याबाबत पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांनी सांगितले,‘‘पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराचा प्रस्ताव पुढील आठवडय़ातच शासनाकडे पाठवण्यात येईल. ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ हे नाव खूप मोठे होत होते. त्याचप्रमाणे सावित्रीबाई फुले यांना ज्ञानज्योती किंवा क्रांतिज्योती अशा कोणत्याही विशेषणाची गरज नाही. त्यामुळे नावातून ‘ज्ञानज्योती’ हा शब्द काढण्याचा निर्णय एकमताने झाला.’’

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा