विद्यापीठात सध्या घराणेशाही सुरू आहे.. कोणतीही भरती सुरू झाली की आपला मुलगा, भाचा, पुतण्या याला विद्यापीठात नोकरीला लावायचे असा विडाच उचललेल्या अधिकाऱ्यांकडून गेल्या पाच वर्षांमध्ये अनेक पदांवर अशा वशिल्याच्या तट्टांची भरती झाली आहे. अधिकारी, कर्मचारी, शिक्षक, अधिकारमंडळाचे सदस्य सगळेच या परंपरचे पाईक झाले आहेत.
विद्यापीठातील नोकरी ही जवळपास सरकारी नोकरी सारखीच.. एकदा नोकरी सुरू झाली की निवृत्ती भत्ता घेऊनच बाहेर पडायचे, ही वर्षांनुवर्षांची परंपरा. पद अगदी सरकारमान्य हवे असेही नाही. विद्यापीठ फंडातील पदे, हंगामी पदे कुठेही असो विद्यापीठात चिकटणे महत्त्वाचे. आपल्या नातेवाईकांची वर्णी विद्यापीठातील विविध पदांवर लावण्याचा विडा विद्यापीठातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उचलला आहे. विद्यापीठाच्या प्रशासकीय कारभारावर लक्ष ठेवण्याची, नियंत्रण ठेवण्याची जबाबदारी असलेल्या अधिकार मंडळातील सदस्यही यामध्ये मागे नाहीत. विद्यापीठात कोणतीही भरती सुरू झाली किंवा कोणतेही पद रिक्त झाले की अधिकाऱ्यांचे लॉबिंग सुरू होते. भरती कुठेही बेकायदा ठरणार नाही, याची संपूर्ण तजवीजही केली जाते. कागदपत्रांची पूर्तताही अगदी पद्धतशीरपणे केली जाते. विद्यापीठातील विविध पदांवर २००७ पासून दरवर्षी आठ-दहा पदांवर तरी विद्यापीठातील अधिकाऱ्यांच्या, अधिकार मंडळातील सदस्यांच्या नातेवाईकांची वर्णी लागलेली दिसते. यापूर्वी २००९ मध्ये झालेल्या कर्मचाऱ्यांच्या भरतीमध्ये तर अनेक अधिकाऱ्यांनी आपापल्या उमेदवारांचे घोडे पुढे दामटल्याची चर्चा इतक्या वर्षांनतरही विद्यापीठात सुरू आहे.
आपला भाचा, पुतण्या नोकरीला लागला, की त्याची नोकरी टिकवण्याची ‘नैतिक’ जबाबदारी आलीच ना! ही जबाबदारीही अगदी आवर्जून पूर्ण केली जाते. हंगामी पदेही नियमित होतात. कार्यकाळ संपल्यावर नव्याने नियुक्ती करण्याऐवजी पदाचा कार्यकाळ सातत्याने वाढवला जातो. अशी अनेक उदाहरणे विद्यापीठात पाहायला मिळतात. विद्यापीठातील या घराणेशाहीने अनेक अधिकाऱ्यांच्या लॉबी टिकवून ठेवल्या आहेत. विद्यापीठात नोकरी मिळाल्यानंतर त्यातल्या त्यात कुलगुरूंच्या कार्यालयात, त्यांच्या जवळ काम करायला मिळणे तर भाग्यच! पटापट पदोन्नतीचा तो राजमार्गच मानला जातो. मग सुरक्षा रक्षकाचे काम न बदलता पद मात्र लिपीक होते. विद्यापीठातील यापूर्वीच्या कुलगुरूंच्या काळातही जवळच्या कर्मचाऱ्यांचे भाग्य फळफळल्याच्या घटना घडल्या आहेत. सध्या विद्यापीठाचा गाडा अशीच वशिल्याची तट्टे हाकत आहेत. या घराणेशाहीमुळे विद्यापीठाच्या कारभारातील पारदर्शीपणाबाबत अनेक प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा