माहिती अधिकारात प्रश्न विचारणाऱ्या किंवा काही माहिती मागणाऱ्या कार्यकर्त्यांच्या हातावर तुरी देण्यासाठी आता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने नवीनच पळवाट शोधून काढली आहे. माहिती अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी शिवायच उत्तराची पत्रे कार्यकर्त्यांना पाठवण्यात येत आहेत.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या प्रशासनाकडे माहिती अधिकारात विचारलेली माहिती देण्यापेक्षा ती टाळण्यात येत असल्याची तक्रार कार्यकर्त्यांकडून सातत्याने करण्यात येत असते. माहिती वेळेवर दिली जात नाही. माहिती उपलब्ध नाही, अशीच उत्तरे दिली जातात. काही दिवसांपूर्वी खुद्द कुलगुरूंचाच बायोडेटा विद्यापीठाकडे उपलब्ध नसल्याचे उत्तर विद्यापीठाने दिले आहे. माहिती मागणाऱ्यांना दरवेळी नव्याने वाटाण्याच्या अक्षता मिळत असतात. माहिती तर द्यायची. मात्र, त्याची जबाबदारीही येता कामा नये अशी एक नवी पळवाट विद्यापीठाने शोधून काढली आहे.
सध्या माहिती अधिकारात देण्यात आलेल्या अनेक पत्रांवर माहिती अधिकाऱ्यांची प्रत्यक्ष किंवा डिजिटल स्वाक्षरीच नाही. फक्त विद्यापीठाचा शिक्का मारून ही पत्रे अर्जदारांना दिली जात आहेत. नियमानुसार माहिती अधिकारात माहिती देताना किंवा उत्तर देताना त्यावर संबंधित संस्थेच्या माहिती अधिकाऱ्याची स्वाक्षरी, संस्थेचा शिक्का, माहिती अधिकारात माहिती उपलब्ध करून दिल्याबाबत शिक्का असणे आवश्यक आहे. मात्र, गेल्या काही आठवडय़ांमध्ये वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये माहिती देताना विद्यापीठाने माहिती अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी शिवायच पत्रे दिली आहेत. त्याचबरोबर एखाद्या मुद्दय़ावर वारंवार प्रश्न विचारल्यानंतर एकच जावक क्रमांक टाकून देखील काही पत्रे देण्यात आल्याचे समोर येत आहे. विद्यापीठाच्या माहिती अधिकार कक्षाकडून दिलेली माहिती ही अधिकाऱ्यांच्या अपरोक्ष देण्यात आली का, असा प्रश्नही कार्यकर्त्यांकडून उपस्थित करण्यात येत आहे.
मान्यतेचे रखडलेले प्रस्ताव आता कसे दिसले?
काही महिन्यांपूर्वी शिक्षक मान्यतेचे किती प्रस्ताव प्रलंबित आहेत याबाबतची माहिती विद्यापीठाकडे माहिती अधिकारात मागण्यात आली होती. त्यावेळी शिक्षक मान्यतेचा एकही प्रस्ताव प्रलंबित नसल्याचे उत्तर विद्यापीठाने अर्जदाराला दिले होते. मात्र, आता संस्थाचालकांनी याबाबत आवाज उठवल्यानंतर शिक्षक मान्यतेचे प्रस्ताव रखडल्याचे विद्यापीठ प्रशासनाच्या नजरेस आले आहे. लवकरात लवकर हे प्रस्ताव निकाली काढण्याचे आश्वासनही विद्यापीठाकडून देण्यात आले आहे.

Story img Loader