विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शपथविधी, कोणाच्या वाट्याला किती मंत्रिपदे अशा राजकीय सत्तासंघर्षात एक बातमी जरा दुर्लक्षितच राहिली. ती बातमी होती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे गांजा सापडल्याची. या प्रकरणात दोन विद्यार्थ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आला. विशेष म्हणजे, याच वर्षातील ही दुसरी घटना आहे. या पूर्वी मे महिन्यातही असाच प्रकार उघडकीस आला होता. त्यामुळे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट म्हणून नावलौकिक मिळवलेल्या विद्यापीठातील विद्यार्थ्यांकडे गांजा सापडणे चिंताजनक आहे.

गेल्या दीड-दोन वर्षांत उघडकीला आलेल्या काही प्रकरणांमुळे अमली पदार्थांसाठी पुण्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर पोहोचले आहे. ललित पाटील प्रकरण, कुरकुंभ एमआयडीसीतील कारखान्यात सापडलेला अमली पदार्थांचा साठा या प्रकरणांची चर्चा देशभरात झाली होती. पुणे आणि परिसरात जप्त केलेल्या अमली पदार्थांची किंमत साडेतीन हजार कोटी रुपयांपेक्षाही जास्त आहे. विद्यापीठात गांजा सापडल्याच्या दोन घटना त्याचाच एक भाग. विद्यापीठातील दोन घटनांमध्ये सापडलेला गांजा किरकोळ असला, तरी विद्यापीठातील मुलांकडे गांजा सापडणे हे गंभीरच आहे.

हेही वाचा – एका दिवसात पुणे महापालिकेने केली लाखोंची उधळण..! नक्की कशासाठी खर्च केले पैसे

उत्साहाने सळसळत्या वयात आकर्षणापायी मुले व्यसनांच्या आहारी जातात. तंबाखूजन्य पदार्थ, सिगारेट, मद्य, अमली पदार्थ असा त्याचा सर्वसाधारण प्रवास असतो. विद्यापीठ प्रशासनाने वसतिगृहांच्या सुधारणेसाठी काही पावले टाकली. त्यात अनधिकृतरीत्या राहणाऱ्यांना चाप लावणे, सीसीटीव्ही बसणे, वेळेचे बंधन लागू करणे, विद्यापीठाच्या आवारात मोठ्या प्रमाणात सुरक्षारक्षकांची फौज उभी करणे असे काही उपाय करण्यात आले आहेत. मात्र, त्यानंतरही विद्यापीठाच्या आवारात गांजा सापडण्यामुळे विद्यापीठाच्या वसतिगृह आणि सुरक्षा व्यवस्थेविषयी प्रश्न निर्माण होतो. या मुलांकडे गांजा पोहोचलाच कसा, तो त्यांनी कोणत्या मार्गाने मिळवला याचा तपास करण्याची आवश्यकता आहे.

विद्यापीठाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अनेक विद्यार्थी, प्राध्यापकांनी राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नाव मिळवले आहे. विद्यार्थी, प्राध्यापकांमुळे विद्यापीठालाही राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रतिष्ठा प्राप्त झाली आहे. मात्र, गेल्या दोन वर्षांत विद्यापीठ विविध कारणांनी चर्चेत राहिले आहे. त्यात विद्यार्थी संघटनांमध्ये झालेली हाणामारी, आक्षेपार्ह शब्दांचा वापर असलेल्या रॅप गाण्याचे विद्यापीठाच्या सभागृहात झालेले चित्रीकरण, पौराणिक विषयावरील नाटकाच्या सादरीकरणावरून झालेला वाद अशा काही घटनांनी विद्यापीठाच्या प्रतिष्ठेला गालबोट लागले आहे. ठिकठिकाणी गप्पा मारत, चर्चा करत असलेले विद्यार्थी हे विद्यापीठाचे वैशिष्ट्य. मात्र, याच विद्यापीठाच्या परिसरात पोलिसांना जमावबंदी लागू करण्याची वेळ आली होती. या जमावबंदीमुळे निर्माण झालेला शुकशुकाट त्रासदायक होता. विद्यार्थी आणि विविध संघटनांच्या विद्यापीठात होणाऱ्या आंदोलनांना शिस्त लावण्यासाठी विद्यापीठाने कार्यपद्धती निश्चित करण्याचाही प्रयत्न करून पाहिला. मात्र, त्याला संघटनांकडून कडाडून विरोध करण्यात आला.

हेही वाचा – सवाई गंधर्व महोत्सवासाठी पीएमपीची विशेष बससेवा, कोणत्या मार्गांवरून कधी धावणार बस ?

ग्रामीण भागातून विद्यापीठात येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या लक्षणीय आहे. विद्यापीठ ही बौद्धिक, शैक्षणिक, व्यक्तिमत्त्व विकासाची जागा आहे. मात्र, गांजा सापडण्यासारख्या प्रकरणांनी विद्यापीठाच्या लौकिकाला धक्का पोहोचतो आहे. राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावरील क्रमवारीत स्थान उंचावण्यासाठी प्रयत्नशील असताना विद्यापीठातील अशा घडामोडी सकारात्मक नाहीत. याची विद्यापीठ प्रशासनाने गांभीर्याने दखल घेतली पाहिजे. वसतिगृह, सुरक्षा व्यवस्थेत काही त्रुटी आहेत का, याचे लेखापरीक्षण करण्याची गरज आहे. दोषी विद्यार्थ्यांवर नियमानुसार कारवाई होणे हा भाग झालाच, पण एकूणच तरुणाईचे व्यसनाधीनतेकडे जाणे रोखण्यासाठी गंभीरपणे वेगवेगळ्या स्तरांवर काम करण्याची आवश्यकता आहे. अन्यथा, आवारातील तरुणाईच्या उत्साहाचा निरुपयोगी धूर, बाटल्यांचा खच पाहत हताशपणे राहण्यावाचून दुसरा पर्यायही उरणार नाही.

chinmay.patankar@expressindia.com

Story img Loader