सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या आवारात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभे करण्यात येईल, अशी घोषणा अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी रविवारी केली. त्याचप्रमाणे महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची शिफारस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केंद्र शासनाकडे पाठवली असल्याची माहितीही त्यांनी दिली.
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या पहिल्या वर्धापनदिनाच्या कार्यक्रमात मुनगंटीवार बोलत होते. विद्यापीठ नामकरण कृती समितीतर्फे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी कृती समितीचे प्रमुख सुधाकर पणीकर, कृष्णकांत कुदळे, अर्थतज्ज्ञ एच. एम. देसरडा, महात्मा फुले यांच्या वंशज नीता होले, गौतम बेंगाळे आदी उपस्थित होते.
या वेळी मुनगंटीवार म्हणाले, ‘विद्यापीठाच्या आवारात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक उभारण्यात येईल. त्यासाठी पुढील महिन्यात विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे यांच्याशी बैठक घेण्यात येईल. विद्यापीठाच्या नामविस्ताराच्या प्रक्रियेत लोकप्रतिनिधी म्हणून माझा सहभाग होता याचा मला अभिमान आहे. महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुले यांना भारतरत्न देण्याची मागणी कृती समितीने केली होती. त्यानुसार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पंतप्रधान कार्यालयाला शिफारसपत्र पठवले आहे.’
मराठवाडय़ातील सर्वाना स्वस्त दरात गहू आणि तांदूळ
राज्यातील दुष्काळजन्य परिस्थितीच्या पाश्र्वभूमीवर माध्यमांशी बोलताना मुनगंटीवार म्हणाले, ‘मराठवाडय़ासाठी आपत्ती व्यवस्थापन आराखडा तयार करण्यात आला आहे. आणखी काही दिवस पाऊस पडला नाही, तर या आराखडय़ाची अंमलबजावणी सुरू करण्यात येईल. मराठवाडय़ातील सर्व नागरिकांना गहू आणि तांदूळ स्वस्त दरात देण्यात यावेत, अशा सूचना प्रशासनाला देण्यात आल्या आहेत.’

Story img Loader