पुणे विद्यापीठ हे वैमानिक प्रशिक्षण सुरू करणारे राज्यातील पहिले विद्यापीठ ठरणार असून जर्मनी येथील एफएफएल इन्स्टिटय़ूटच्या सहकार्याने पुणे विद्यापीठ हा अभ्यासक्रम सुरू करणार आहे.
‘एफएफएल इन्स्टिटय़ूट’ ही वैमानिक प्रशिक्षण देणारी जर्मनीतील सर्वात जुनी संस्था आहे. ही संस्था पुणे विद्यापीठाशी करारबद्ध होत असून पुणे विद्यापीठामध्ये वैमानिक प्रशिक्षण अभ्यासक्रम सुरू करण्यात येणार आहे. पुढील शैक्षणिक वर्षांपासून हा अभ्यासक्रम सुरू करण्याचा प्रयत्न सध्या पुणे विद्यापीठात केला जात आहे. सध्या भारतामध्ये सुरू असणाऱ्या डिरेक्टर जनरल ऑफ सिव्हिल एव्हिएशनच्या अभ्यासक्रमाच्या धर्तीवर हा अभ्यासक्रम असणार आहे. विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामध्ये हा अभ्यासक्रम चालवण्यात येणार आहे. एकूण अठरा महिने कालावधीचा हा अभ्यासक्रम असून त्यासाठी साधारण ४५ लाख रुपये शुल्क आकारण्यात येणार आहे. अभ्यासक्रमातील थिअरीचा भाग पुणे विद्यापीठाच्या तंत्रज्ञान विभागामध्ये आणि प्रात्यक्षिक जर्मनीमध्ये एफएफएल इन्स्टिटय़ूटमध्ये शिकवले जाणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र आणि गणित या विषयांसह बारावीची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. अभ्यासक्रमासाठी एकावेळी ४० विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. या अभ्यासक्रमाला प्रवेश देण्यासाठीचे निकष अजून निश्चित झाले नसून त्यासंबंधी सध्या चर्चा सुरू आहे, असे पुणे विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थी केंद्राचे संचालक डॉ. विजय खरे यांनी सांगितले.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा