पुणे विद्यापीठाच्या आवारातील गोरखचिंचेचा एक वृक्ष बुधवारच्या वादळी पावसात कोसळला.. त्याची वैशिष्टय़े पाहता पुण्यातील महत्त्वाची ओळख नष्ट झाली आहे, कारण तो पुण्यातील सर्वात मोठा घेर असलेला वृक्ष होता आणि त्याचे वयोमान होते, तब्बल १५० ते २०० वर्षे! त्याचे आणखी एक वेगळेपण म्हणजे- पुण्यात या जातीचे केवळ आठ वृक्ष होते, ही संख्या आता एकने कमी झाली आहे.
विद्यापीठाच्या मुख्य इमारतीसमोरच्या बागेत, एका कोपऱ्यात गोरखचिंचेचा अवाढव्य वृक्ष ठाण मांडून बसला होता. कितीतरी माणसांच्या आवाक्यातही न येणारा त्याचा बुंधा, त्याच्या आतमध्ये असलेली भलीमोठी पोकळी, त्यात जाऊन बसण्याची मजा, पानगळ झाल्यावर मुळांप्रमाणे भासणाऱ्या फांद्या. अशा वैशिष्टय़ांमुळे विद्यापीठात जाणाऱ्यांसाठी तो आकर्षणाचा विषय होता आणि कुतूहलाचासुद्धा! हा वृक्ष बुधवारच्या वादळी पावसात अचानक आडवा झाला. याबाबत वृक्षांचे ज्येष्ठ अभ्यासक डॉ. श्री. द. महाजन यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी हा वृक्ष किती वैशिष्टय़पूर्ण होता, हे सांगितले.
‘‘पुण्यातील सर्वात मोठा बुंधा असलेला असा हा डेरेदार वृक्ष होता. त्याचे नाव गोरखचिंच. या जातीचे एकूण आठ वृक्ष पुणे शहरात आहेत. आता त्यापैकी एक पडल्याने असे सातच वृक्ष उरले आहेत. लष्कर भागात इस्ट स्ट्रीटवर देसाई बंगल्यात असे दोन वृक्ष आहेत, टिळक रस्ता आणि बाजीराव रस्ता जिथे एकमेकांना मिळतात त्या पूरम चौकात कोपऱ्यावर एक वृक्ष आहे. घोले रस्त्यावर असे दोन वृक्ष आहेत. एम्प्रेस गार्डनमध्ये एक, तर स.प. महाविद्यालयाच्या उद्यानात एक या ठिकाणी आता हे वृक्ष शिल्लक आहेत. विद्यापीठातील वृक्ष ब्रिटिश काळातील असावा. विद्यापीठाची इमारत ही तेव्हा गव्हर्नरचे राहण्याचे ठिकाण होते. तेव्हा तो लावला असावा. त्याचे वयोमान साधारणत: १५० ते २०० वर्षे होते,’’ असे डॉ. महाजन यांनी सांगितले.
या जातीचे वृक्ष वैशिष्टय़पूर्ण असले तरी परदेशी आहेत. त्यांचे मूळ आफ्रिकेतील आहे, हे डॉ. महाजन यांनी आवर्जून सांगतात. ‘‘भारतातील सर्वात जुना समजला जाणारा वृक्ष आणि जगातील सर्वात जुना समजला जाणारा वृक्ष गोरखचिंचेचाच आहे. भारतात गोवळकोंडा येथे असा वृक्ष सापडतो. त्याच्या ढोलीत जाण्यासाठी शिडी वापरावी लागते. त्याचे वय सुमारे सातशे वर्षे इतके आहे. तेथील प्रसिद्ध किल्ला बांधण्याचे काम सुरू असताना हापशी मजूर आले होते. त्यांच्यासोबत याचे रोप आले असावे, असे मानले जाते. जगातील सर्वात जुना वृक्ष आफ्रिकेत आहे. त्याचे वय तब्बल पाच हजार वर्षे इतके मागे जाते. तो वृक्षसुद्धा याच जातीचा आहे. त्याच्या खोडात असलेल्या पोकळीत तब्बल २७ माणसे झोपू शकतात,’’ असेही डॉ. महाजन यांनी सांगितले.
चिंचेशी संबंध नाही. तरीही गोरखचिंच!
या वृक्षाचा चिंचेशी संबंध नाही, तरीही त्याला गोरखचिंच असे नाव पडले. त्याचे इंग्रजीतील नाव- बाओबाब (baobab)असे आहे, तर शास्त्रीय नाव adensonia digitata हे आहे. या वृक्षांची संख्या उत्तर प्रदेश व मध्य प्रदेशात तुलनेने जास्त आहे. तिथे याच वृक्षाखाली गोरखनाथ यांनी आपल्या शिष्यांना उपदेश केल्याचे बोलले जाते. त्यावरून त्याचे नाव गोरखचिंच पडले असावे, असेही डॉ. महाजन यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा