पुणे विद्यापीठ रिफेक्टरीमध्ये भोजन करताना विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये अळी सापडल्याने गोंधळ झाला. संतप्त विद्यार्थ्यांनी निदर्शने केली व त्यानंतर कुलसचिवांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या चर्चेत प्रशासनाने आपली चूक मान्य केली. गेल्या वर्षभरातील ही तिसरी घटना असून, एक एप्रिलपासून नव्याने टेंडर काढलेल्या केटर्ससंदर्भातील आठवडय़ाभरातच ही घटना घडली आहे.
विद्यापीठाच्या रिफेक्टरीमध्ये सोमवारी दुपारी विद्यार्थी भोजन करीत होते. त्या वेळी अतुल बाबर या विद्यार्थ्यांच्या ताटामध्ये असलेल्या टोमॅटोच्या कोशिंबिरीमध्ये एक जिवंत अळी सापडली. ही बाब त्याने अन्य विद्यार्थ्यांच्या निदर्शनास आणून दिली. सर्व विद्यार्थी एकत्र आले. त्यांनी रिफेक्टरी कमिटी प्रमुख सदानंद भोसले यांच्या निदर्शनास ही बाब आणून दिली. केटिरग व्यवस्थापक त्रिभुवन आणि गृह व्यवस्थापक व्ही. पी. यादव यांना संतप्त विद्यार्थ्यांनी गराडा घातला. त्या वेळी विद्यार्थीच असे करतात आणि आम्हाला त्याचा त्रास होतो, असा आरोप या दोघांनी केला. यंदाच्या वर्षांत जेवणामध्ये अळी सापडण्याचा प्रकार तीनदा घडला असल्यामुळे विद्यार्थी संतप्त होते.
या घटनेनंतर कुलसचिव तेथे आले. त्यांच्याशी झालेल्या चर्चेत ही चूक मान्य करण्यात आली. एक एप्रिलपासून रिफेक्टरीचे टेंडर सॅफॉर्न केटर्सकडून शुभम केटर्सकडे आले आहे. उत्तम दर्जाचे भोजन मिळावे यासाठी विद्यार्थ्यांनी वाढीव दरदेखील मान्य केला. मात्र, तरीही भोजनामध्ये अळी सापडली, असे विद्यार्थ्यांनी सांगितले. या घटनेबाबत विद्यार्थ्यांनी निषेध व्यक्त केला.