पुणे : वाहतूक कोंडी सोडविण्याच्या दृष्टीने उपयुक्त ठरणाऱ्या पूर्व रिंग रोडसाठी ३० हेक्टर जागेचे संपादन अद्यापही बाकी असून, हे काम महिनाअखेरपर्यंत पूर्ण करण्याची सूचना राज्य रस्ते विकास महामंडळाने जिल्हा प्रशासनाला केली आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या वतीने दोन रिंग रोडची कामे हाती घेण्यात आली आहेत. त्याची विभागणी पूर्व आणि पश्चिम अशी करण्यात आली आहे. पश्चिम भागातील रिंग रोडसाठीची भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण झाली असून, पूर्व भागातील ३० हेक्टर जागेचे संपादन अद्यापही बाकी आहे. पूर्व रिंग रोडसाठी एकूण २६५ हेक्टर जागेचे संपादन करण्यात येणार आहे. आतापर्यंत २३५ हेक्टर जागा जिल्हा प्रशासनाच्या ताब्यात आली आहे. दहा गावांतील ३० हेक्टर जागेच्या संपादनासंदर्भात जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक झाली.

बैठकीला राज्य रस्ते विकास महामंडळाचे अधिकारीही उपस्थित होते. त्या वेळी महिनाअखेरपर्यंत जिल्हा प्रशासनाने भूसंपादन करावे, अशी सूचना करण्यात आली. त्यानुसार जिल्हा प्रशासनाच्या संबंधित यंत्रणेलाही जिल्हाधिकारी डुडी यांनी तसे आदेश दिले.

खेड, हवेली, पुरंदर आणि भोर या तालुक्यांतील पूर्व भागातून रिंगरोड जाणार आहे. हा रस्ता एकूण ६२ किलोमीटर लांबीचा असून, पुरंदर येथील नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळून तो जाणार आहे. पूर्व रिंग रोड झाल्यानंतर विमानतळापर्यंतचा प्रवासही सुलभ होणार आहे.