पुणे : वडगाव शेरी विधानसभा मतदारसंघाली खराडीसह इतर भागात कमी दाबाने पाणीपुरवठा केला जात असून, विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर या भागात जाणीवपूर्वक पाणीटंचाई निर्माण केली जात असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. महापालिकेडे वारंवार पाठपुरावा करूनही या भागातील पाणी प्रश्न सुटत नसल्याने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे तक्रार करणार असल्याचे आमदार बापूसाहेब पठारे यांनी सांगितले.

वडगाव शेरी मतदारसंघात गेल्या तीन महिन्यांपासून कमी दाबाने पाण्याचा पुरवठा होत आहे. या भागातील पाण्याच्या टाक्या पूर्ण भरल्या जात नाहीत. मतदारसंघात विरोधी पक्षाचा आमदार असल्याने जाणीवपूर्वक महापालिकेचे अधिकारी पाणीपुरवठा करण्यास हात आखडता घेत असल्याचा आरोप केला जात आहे.

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा साठा शिल्लक असतानाही पुरेसे पाणी मिळत नसल्याने वडगाव शेरी मतदारसंघातील नागरिक त्रस्त झाले आहेत.

वडगावशेरी भागाला ७१ एमएलडी पाण्याचा पुरवठा केला जातो. या भागात एकूण २९ पाण्याच्या टाक्या आहेत. या मतदारसंघाला लष्कर पाणीपुरवठा जलकेंद्रातून तसेच भामा आसखेड धरणातून पाणीपुरवठा केला जातो.

वडगाव शेरी, खराडी भागातील नागरिकांना पुरेसे पाणी दिले जात नाही. भामा आसखेड प्रकल्प सुरू झाल्यानंतर पाणी मिळेल, असा दावा केला जात होता. मात्र, अद्यापही पाणी मिळत नाही. अनेक सोसायट्यांना पाण्यासाठी पैसे मोजावे लागत आहेत, असे या भागातील नागरिक अजिंक्य जाधव यांनी सांगितले.

वडगाव शेरीचे आमदार बापूसाहेब पठारे म्हणाले, वडगाव शेरीमधील नागरिकांना पुरेसे पाणी मिळावे, यासाठी महापालिकेकडे अनेकदा पाठपुरावा केला जात आहे. पाण्याचे राजकारण तर केले जात नाही ना? अशी शंका येते. निवडणुकीच्या निकालानंतर ही पाणीटंचाई जाणू लागली आहे. पाणी प्रश्न न सुटल्यास पालकमंत्री अजित पवार यांच्यासह मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेणार आहे.

Story img Loader