सुहास किर्लोस्कर
गेल्या २५ वर्षांतील सांस्कृतिक स्थित्यंतरे याचा विचार करताना २००० साली पुण्यामध्ये कोणते बदल घडणे सुरू झाले होते, याचा शोध घेणे योग्य ठरेल. १९९७ मध्ये हिंजवडी येथे आणि २००५ मध्ये कल्याणीनगर येथे आय. टी. पार्क सुरू झाले. मुंबई, बेंगळुरू, चेन्नई येथे माहिती तंत्रज्ञान कंपन्यांची गर्दी झाल्यामुळे विस्तार होण्यास वाव असलेल्या पुण्याची निवड झाली होती. या निमित्ताने अ-मराठी युवा वर्ग नोकरीसाठी पुण्यामध्ये मोठ्या प्रमाणावर येण्यास सुरुवात झाली. त्याच अनुषंगाने २००५ पासून पुण्यातून दुबई, सिंगापूर आणि फ्रँकफर्ट येथे विमान सेवा सुरू झाली. याचीच परिणती नांदेड सिटी, अमानोरा पार्क, मगरपट्टा सिटी सारख्या कॉम्प्लेक्समधून पुण्याचा विस्तार होऊ लागला. मल्टी-क्युझिन अर्थात देशो-देशीच्या पाककृती असणारी हॉटेल/ रेस्टॉरंट पुण्यात हात-पाय पसरू लागली. एकूणच पुण्याचे रुपडे बदलून कॉस्मोपॉलिटन शहर होऊ लागले. त्याचे प्रतिबिंब सांस्कृतिक कार्यक्रमात पडणे ओघाने आलेच.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

नाटक

बालगंधर्व रंगमंदिर, यशवंतराव चव्हाण नाट्यगृह, टिळक स्मारक येथे मराठी नाटके आणि सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न व्हायचे. पिंपरी चिंचवड येथे १९९४ पासून रामकृष्ण मोरे सभागृह सुरू झाले होते. औंध येथे २०१२ मध्ये पंडित भीमसेन जोशी कलादालन सुरू झाले. २०१४ मध्ये पद्मावती येथे अण्णा भाऊ साठे नाट्यगृह सुरू झाले. १९९८ पासून अडीच हजार आसन व्यवस्था असलेले गणेश कला क्रीडा मंच सुरू झाल्यामुळे भरगच्च गर्दी होऊ शकणारे कार्यक्रम या सभागृहात होऊ लागले. टिळक स्मारक वगळता अन्य नाट्यगृहांची व्यवस्था महानगरपालिकेकडे असल्यामुळे कारभारातील अनागोंदी दिवसेंदिवस वाढतच आहे. पुण्यातील या नाट्यगृहामध्ये व्यावसायिक विनोदी नाटकांचे ‘खेळ’ सादर केली जात असल्यामुळे प्रायोगिक नाटकांसाठी भरत नाट्य मंदिर आणि सुदर्शन रंगमंच हे दोनच पर्याय उपलब्ध होते. ज्योत्स्ना भोळे सभागृहामध्ये संगीताचे विश्लेषण, नृत्य-नाटिका आणि त्यासंबंधी विविध संकल्पनांवर आधारित अभिनव प्रयोग, नाट्यवाचन, चित्रपट रसास्वाद शिबिर, फिल्म स्टडी सेंटरचे उपक्रम, विविध कलांच्या रसास्वादाचे अनेक कार्यक्रम होत असतात.

पुण्यामधील पहिले बॉक्स थिएटर २० ऑगस्ट २०२० रोजी सुरू झाले, ज्यामध्ये रंगमंच आणि आसन व्यवस्था बदलण्याची सोय आहे. ‘काजव्यांचा गाव’ हे नाटक प्रेक्षकांच्या अवती-भोवती घडते. चौसोपी वाडा असा सेट असलेल्या ठिकाणी प्रेक्षक बसलेले असतात आणि कलाकार त्यांच्या आजूबाजूला वावरतात. ‘उच्छाद’ सारखे नाट्यप्रयोग सादर होत असताना प्रेक्षकांची आसन-व्यवस्था रंगमंचाच्या चारी बाजूला असते आणि सर्व प्रेक्षकांमध्ये नाटक सादर होते. असे नाट्यानुभव प्रेक्षक व कलाकार यांच्यामधील दरी कमी करतात आणि अभिनय-दिग्दर्शन यामधील बारकावे जवळून अनुभवता येतात. २००० सालानंतर बहुपडदा चित्रपटगृहांचा (मल्टीप्लेक्स)उदय झाला, बहुतांश एकपडदा चित्रपटगृहे बंद पडली. ओ.टी.टी.वर उत्तमोत्तम चित्रपट घरबसल्या बघता येत असल्यामुळे आणि इतर भाषिक चित्रपटांइतके विषयांचे वैविध्य मराठीत नसल्यामुळे मराठी चित्रपटाचा प्रेक्षक कमी झाला. अलीकडेच बॉक्स थिएटरमध्ये मराठी चित्रपटाचे काही खेळ करण्यात आले.

मूळ रंगकर्मी असलेले चित्रपट अभिनेते नसिरुद्दीन शाह यांच्या हस्ते १८ जानेवारी २०२४ रोजी श्रीराम लागू रंग-अवकाशचे उद्घाटन झाले आणि इथे नाटक, नृत्य, गायन, दृश्य कला अशा वैविध्यपूर्ण कार्यक्रमांची रेलचेल सुरू झाली. उद्घाटनाच्या दिवशी इसमत चुगताई यांच्या तीन कथांचे नाट्यमय वाचन नसिरुद्दीन शाह, हिबा शाह आणि रत्ना पाठक शाह यांनी वेगळ्या स्वरूपात सादर करून वेगळा नाट्यानुभव प्रेक्षकांना दिला. तत्पूर्वी पुण्यामध्ये हिंदी नाटके रेल्वे स्थानकाजवळील मालधक्का चौकातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक भवन येथे सादर केली जायची. आता नसिरुद्दीन शाह-रत्ना पाठक शाह यांचे ‘ओल्ड वर्ल्ड’, विनय पाठक-रजत कपूर यांचे ‘नथिंग लाईक लिअर’, स्वाती दुबे दिग्दर्शित ‘अगरबत्ती’, मानव कौल, लिली दुबे सारख्या कलाकारांचे अभिनव व प्रायोगिक नाट्यप्रयोग बघण्याची संधी पुणेकरांना आता श्रीराम लागू रंग-अवकाशमुळे मिळत आहे. राष्ट्रीय नाट्य विद्यालयातर्फे (नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा – एनएसडी) भारत रंग महोत्सव गेल्या वर्षी आयोजित करण्यात आला होता, ज्यामध्ये वैविध्यपूर्ण विषयावरील कन्नड, बेंगाली, मराठी, इंग्रजी भाषेतील उत्तमोत्तम नाट्य कलाकृती पुणेकरांना बघता आल्या. फ्लोरियन झेलर लिखित नसिरुद्दीन शाह अभिनित दिग्दर्शित ‘द फादर’ या नाटकाचे प्रयोग या रंग अवकाशात लवकरच सादर होणार आहेत.

अर्थात पुणे चारी बाजूने विस्तारले असले, मेट्रो उपलब्ध असली तरीही कोरेगाव पार्कचा प्रेक्षकवर्ग अद्याप सदाशिव पेठेत येत नाही आणि कोथरूडमधला प्रेक्षक कल्याणीनगर मधील कार्यक्रमास फारच क्वचित हजेरी लावतो. कोथरूडपासून १३ कि.मी. अंतरावर अलीकडेच सुरू झालेले झपूर्झा म्युझियम पुण्याच्या सांस्कृतिक वैभवामध्ये भर घालणारे आहे. हॉटेलसाठी अंतराची भीडभाड न ठेवणाऱ्या पुणेकरांनी झपूर्झा येथे होणाऱ्या सांस्कृतिक कार्यक्रमांनाही भरघोस प्रतिसाद द्यायला हवा. रंगमंचावरील कलाकृतींचा विचार करता ब्रॉडवे थिएटर पुण्यात अद्याप झालेले नाही, त्याचा विचार भविष्यात व्हावा.

संगीत

न्यू इंग्लिश स्कूल येथे होणारा सवाई गंधर्व भीमसेन महोत्सव २०१८ पासून महाराष्ट्रीय मंडळ, मुकुंदनगर येथे आयोजित करण्यात येतो, हा बदलही अनेक संगीत रसिकांनी अद्याप तितक्या खुल्या दिलाने स्वीकारलेला नाही. अर्थात गेल्या २५ वर्षांत सवाई गंधर्व भीमसेन महोत्सवाचे स्वरूपही बदलले आहे. अहोरात्र चालणारा हा संगीत महोत्सव आता एक दिवसाचा अपवाद वगळता रात्री दहापूर्वी आटोपता घ्यावा लागतो. प्रत्येक कलाकाराला एक तासाचा वेळ दिला जातो, ज्याचे नियोजन करताना अनेक नामवंत कलाकार राग संगीताला ४० मिनिटे देतात आणि २० मिनिटे भजन सादर करण्यासाठी राखून ठेवतात.

दर्जेदार कलाकारांचे सादरीकरण करण्यापेक्षा गर्दी खेचणाऱ्या कलाकारांना प्राधान्य दिले जात आहे. त्यामुळे सवाई गंधर्व महोत्सव एक इव्हेंट बनला आहे.

वसंतोत्सव, स्वरझंकार महोत्सव, गानसरस्वती महोत्सव, गंगाधर महोत्सव अशा महोत्सवांची रेलचेल जानेवारी-फेब्रुवारी महिन्यात सुरू झाली. राग संगीत उत्साहवर्धक करण्याचा ट्रेंड याच २५ वर्षांच्या काळामध्ये सुरू झाला. सरोद किंवा सतार वादनाच्या मैफलीमध्ये दोन बाजूला दोन तबलावादक बसवणे, हा त्याचाच एक भाग. काही ठरावीक कलाकार एका महोत्सवातून दुसऱ्या महोत्सवात वारंवार ऐकायला मिळतात. राग संगीत, नाट्यसंगीतापासून फ्युजन, विविध राज्यांतील लोकसंगीत ‘वसंतोत्सव’मध्ये ‘कोक स्टुडियो’ सारखे रुपडे लेऊन स्वरमंच गाजवू लागले. रेखा भारद्वाज, तिजन बाई, शेखर सेन (कबीर), जॉर्ज ब्रूक्स (सॅक्सोफोन), अबिदा परवीन (सुफी संगीत), पियुष मिश्रा असे वैविध्यपूर्ण संगीत प्रकार वसंतोत्सवाच्या निमित्ताने ऐकता आले. युवा प्रेक्षकांची गर्दी जमवण्यात वसंतोत्सव यशस्वी होताच तसा ट्रेंड सवाई गंधर्व महोत्सवात आणण्याचे प्रकार झाले, जे त्या महोत्सवाच्या परंपरेला आणि पंडित भीमसेन जोशी यांनी ज्या हेतूने हा महोत्सव सुरू केला, त्याला धक्का देणारे होते. महोत्सवाचे इव्हेंट करण्यासाठी डिजिटल स्क्रिन, झगमगाट, दणदणीत आवाज, राग संगीताच्या स्वरमंचावर सिंथेसायजर, ड्रमचे आगमन असे प्रकार वाढीस लागले. एकूणच महोत्सवी संगीताला उत्तम दिवस आल्यामुळे दर्जेदार संगीताचा प्रसार होण्याऐवजी लोकानुनय केला जातो. त्यामुळे सादर करणाऱ्या कलाकाराचा स्वतःचा विचार गायन-वादनामध्ये दिसत नाही आणि हमखास टाळी मिळवणारे संगीत गायले-वाजवले जाते.

अलीकडेच दिलजित दोसांजचा कार्यक्रम आयोजन करण्यावरून गदारोळ उठला होता. परंतु, समाज माध्यमावरील प्रचाराला (सोशल मीडियावरील कॅम्पेनला) प्रतिसाद देऊन पुण्याच्या काना-कोपऱ्यातून आलेल्या अमराठी युवा वर्गाने हा कार्यक्रम हाउसफुल्ल केला, ज्यामुळे तथाकथित संस्कृती रक्षकांची कुचंबणा झाली. बाणेरच्या बंतारा भवनमध्ये वीर दास, वरूण ग्रोव्हर यांचे स्टँड-अप टॉक शो युवा वर्गाने हाउसफुल्ल केले. युवा वर्ग वेगवेगळ्या प्रकारचे संगीत कोणताही अभिनिवेश न राखता ऐकत असतो. कोणी काही वेगळ्या धाटणीचे गाणे ऐकायला दिले तर ते ऐकतात, तीन चार वेळा ऐकून मग आपले मत नोंदवतात हे विशेष. आपल्या आवडीचे तेच चांगले अशा भावनेतून न ऐकता नवीन किंवा वेगळे काही ऐकण्याची युवकांची मानसिकता सर्वानीच अंगिकारली तर आपल्या संगीताच्या जाणीवा समृद्ध होऊ शकतील.

सुफी संगीत, उर्दू शायरी, गझल, कव्वाली अशा संगीत प्रकारांचा आस्वाद घेणारा वर्ग ‘पन्नाशीची उमर गाठलेला’ असतो. परंतु, या समजुतीला धक्का देऊन कार्यक्रम सादर करणाऱ्यांचे आणि प्रेक्षकांचे वय कमी करणारा सुखन हा कार्यक्रम ओम भूतकर आणि सहकारी यांनी सादर केला आणि युवा वर्गाने तो अक्षरशः डोक्यावर घेतला. पुण्यातला सुखन हा कार्यक्रम ऑनलाईन तिकिटांच्या संकेतस्थळावर ‘ओपन’ झाल्यापासून पंधरा मिनिटांत हाउसफुल्ल होत असतो, हे विशेष. तीन तासांच्या मैफली कमी होत असण्याच्या आजच्या काळात महाराष्ट्र कल्चरल सेंटरतर्फे श्रीराम लागू रंग-अवकाश येथे ‘खयाल’ हा उपक्रम सुरू होत आहे, ज्यामध्ये कलाकारांना काळाच्या चौकटीमध्ये अडकण्याचे बंधन नसेल. असे अनेक उपक्रमशील कार्यक्रम पुण्यातील सांस्कृतिक वर्तुळामध्ये होत असतात. त्यामुळे पुढे येणारा काळ आश्वासक आहे. गर्दीमध्ये जाणकार दर्दी रसिकांची संख्या वाढवून सुजाण प्रेक्षकवर्ग तयार करण्यात पुण्याने पुढाकार घेतल्यास प्रयोगशील रंगमंचीय आविष्कार अनुभवण्याच्या संधी वारंवार मिळतील, अशी आशा आहे.

(लेखक कला आस्वादक आहेत.)