डॉ. अ. ल. देशमुख
पुण्याचा भौगोलिक भाग किंवा अत्यंत पोषक वातावरणामुळे गेल्या पंचवीस वर्षांत शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार खूप वेगाने झाला. सुसह्य हवामान, सांस्कृतिक वारसा, औद्योगिक विकास, स्वच्छ आणि शुद्ध पाणीपुरवठा, उत्तम आरोग्य व्यवस्थापन यामुळे शहराच्या लोकसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावर झाल्याचे दिसून येते. शहरातील मध्यवर्ती पेठांच्या तुलनेत शहराच्या परिघावरील परिसरात नव्या शाळा वेगाने निर्माण झाल्या आहेत. माध्यमिक शिक्षणाला व्यावसायिक शिक्षणाची जोड देण्याच्या दृष्टीने किमान कौशल्यावर आधारित अभ्यासक्रम, द्विलक्ष्यी अभ्यासक्रम, माहिती-तंत्रज्ञान अभ्यासक्रम सुरू झाले. राज्य सरकारच्या शालेय शिक्षणातील सर्व महत्त्वाच्या संस्था म्हणजे बालभारती, राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषद, राज्य मंडळ, शिक्षण आयुक्तालय, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण संचालनालय अशा संस्था पुण्यातच आहेत. त्यामुळे राज्याचे शैक्षणिक धोरण पुण्यातून ठरते, असे म्हटले तरी वावगे ठरणार नाही. पुण्यात येणारी नवीन योजना पुढील पाच वर्षांत राज्यभरात पोहोचते, असा आजवर अनुभव आहे. त्यामुळे भविष्यात पुण्याकडे सबंध महाराष्ट्राचे लक्ष राहणार आहे.

शिक्षणाची सद्यःस्थिती            

पुणे शहरात जिल्हा परिषद, महापालिका, खासगी अनुदानित शाळा, खासगी विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थसहायित शाळा, रात्रशाळा, मुक्त शाळा अशा प्रकारच्या शाळा आहेत. अभ्यासक्रमानुसार शाळांचे वर्गीकरण केल्यास गेल्या २५ वर्षांमध्ये इंग्रजी माध्यमाचे वर्चस्व फार मोठ्या प्रमाणात वाढले आहे. परिणामी, अनेक मराठी माध्यमाच्या शाळांना उतरती कळा लागली आहे. शहरातील शाळा राज्य मंडळ, सीबीएसई, आयसीएसई, आयबी, केंब्रिज अशा शिक्षण मंडळाशी संलग्न आहेत. शहरात कोठेही सुरू होणारी नवी शाळा इंग्रजी माध्यमाचीच आहे, असे म्हणता येईल. त्यामुळे मराठी माध्यमाच्या शाळांचा अस्त होतो की काय, अशी स्थिती निर्माण झाली आहे. स्वयंअर्थसहायित शाळांमध्ये, तर आता शिक्षण समूह निर्माण झाले आहेत. एकाच संस्थेच्या शहराच्या वेगवेगळ्या भागांत शाळा निर्माण झाल्या आहेत. वार्षिक पाच हजार रुपयांपासून ते पाच लाखांपर्यंत शुल्क खासगी शाळा आकारतात. शाळांच्या शुल्कामुळे कमी उत्पन्न, मध्यम उत्पन्न आणि श्रीमंत असे पालकांचे तीन गट झाले आहेत. कमी उत्पन्न गटातील मुले महापालिकेच्या शाळेत, मध्यम गटातले खासगी व्यवस्थापनाच्या अनुदानित किंवा विनाअनुदानित शाळेत, तर श्रीमंतांची मुले खासगी व्यवस्थापनाच्या विनाअनुदानित इंग्रजी माध्यमाच्या शाळेत अशी वर्गवारी आपोआपच झाल्याचे दिसून येते. संपूर्ण भारतभरातील शिक्षण प्रक्रियेचा विचार केल्यास पुण्यातील प्राथमिक आणि माध्यमिक शाळांतील गुणवत्ता उच्च असल्याचे शहरातील शाळांच्या वाढणाऱ्या संख्येवरून जाणवते. गेल्या २५ वर्षांमध्ये गुणवत्तेमध्ये प्रामुख्याने भौतिक गुणवत्ता आणि शैक्षणिक गुणवत्ता अशा दोन प्रकारांमध्ये विचार केला जातो. अलीकडे भौतिक गुणवत्ता किंवा पायाभूत सुविधा चांगल्या असल्यास त्या शाळेत प्रवेश घेण्याचा नवीनच विचार विकसित झाला आहे. त्याशिवाय गेल्या पंचवीस वर्षांत माहिती तंत्रज्ञान, संगणकाने क्रांती प्रचंड वेगाने झाली आहे. त्यामुळे शालेय स्तरापासूनच कोडिंग, कृत्रिम बुद्धिमत्ता, मशिन लर्निंग, विदा विश्लेषण अशा तंत्रज्ञानाचे धडे दिले जाऊ लागले आहेत. अध्यापनामध्ये इंटरनेटचा वापर, वर्गांमध्ये स्मार्ट बोर्ड असे ‘स्मार्ट’ पद्धतीचे शिक्षणही शाळांमधून दिले जाते. जागतिक पातळीवरील संधी लक्षात घेऊन जर्मन, जपानी अशा काही परकीय भाषाही शिकवल्या जातात.

महापालिकेच्या शाळा

शिक्षणाचा प्रसार होण्यात पुणे महापालिकेचे महत्त्वाचे योगदान आहे. शहरात महापालिकेच्या ३२० प्राथमिक, ४४ माध्यमिक शाळा आहेत. त्यांत ५५ इंग्रजी माध्यमाच्या, ३४ उर्दू, दोन कन्नड, २२९ मराठी माध्यमाच्या शाळा आहेत. या शिवाय तीन शाळा क्रीडा निकेतन म्हणून, १९ विद्यानिकेतन बुद्धिमान मुलांसाठी चालवल्या जातात. महापालिकेच्या शाळांमध्ये संपूर्ण शिक्षण मोफत असते. तसेच प्रत्येक विद्यार्थ्याला शालेय साहित्याच्या स्वरूपात शिष्यवृत्तीही दिली जाते. सर्वच शाळांमध्ये पोषण आहार दिला जातो. गेल्या पाच वर्षांमध्ये महानगरपालिकेच्या शाळांमधील विद्यार्थ्यांचे प्रवेश घेण्याचे वाढते प्रमाण हा सकारात्मक संकेत आहे. गुणवत्तावाढीसाठी महानगरपालिकेच्या माध्यमिक शाळांमध्ये काही खासगी विश्वस्त संस्था लक्ष घालतात ही महत्त्वाची बाब आहे.

मुक्त शिक्षण

गेल्या काही वर्षांत शहरात मुक्त शिक्षणाचा कल निर्माण झाला आहे. त्यात राज्य मंडळाची मुक्त शाळा, केंद्र सरकारची राष्ट्रीय मुक्त शाळा असे दोन पर्याय आहेत. आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करू इच्छिणारे विद्यार्थी अधिकाधिक वेळ त्यासाठी देऊन औपचारिक शिक्षण मुक्त शाळेद्वारे पूर्ण करू शकतात. राष्ट्रीय मुक्त शाळेमध्ये हव्या त्या वेळी परीक्षा देण्याची (एक्झाम ऑन डिमांड) सुविधाही आहे. मुक्त शिक्षणाच्या सुविधेमुळे शाळा सोडलेल्यांना शिक्षणाच्या प्रवाहात पुन्हा येण्याची संधी उपलब्ध झाली आहे. त्या शिवाय गृह शिक्षणाचे प्रमाणही वाढत आहे. औपचारिक, क्रमिक स्वरूपाचे शिक्षण काही पालक, मुलांना नको असते. प्रयोगशील पद्धतीने, आवडीनुसार शिकण्याची मुभा गृह शिक्षणामध्ये (होम स्कूलिंग) मिळते. त्यात पालकच मुलांच्या कलानुसार, क्षमतेनुसार शिकवतात. गृह शिक्षण देणाऱ्या काही पालकांनी एकत्र येऊन शाळा सुरू केल्याची उदाहरणेही शहरात तयार झाली आहेत. गेल्या पंचवीस वर्षांतील हा महत्त्वाचा बदल आहे. अशा प्रयोगशील शाळांमध्ये अभ्यास, परीक्षा यापेक्षा नवनवे अनुभव घेणे, अनुभवातून शिकणे यावर भर दिला जातो.

खासगी शिकवणीवर्ग

पुणे शहरात शाळांइतक्याच वेगाने खासगी शिकवणीवर्गही वाढले आहेत. सुमारे वीस-पंचवीस वर्षांपूर्वी, अभ्यासात अप्रगत असलेले विद्यार्थीच शिकवणीला जात होते. मात्र, आता सर्वच स्तरांतील विद्यार्थी खासगी शिकवणी वर्गामध्ये जातात. पूर्वी दहावी आणि बारावी या बोर्डाच्या परीक्षा असल्यामुळे त्यासाठी खासगी शिकवणी वर्गात जाण्याचे प्रमाण अधिक होते. मात्र, आता बालवाडीपासूनच विविध प्रकारचे खासगी शिकवणी वर्ग मुलांना लावले जातात. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये शालेय शिक्षणातील गुणांचे महत्त्व अतोनात वाढले आहे. पुढील प्रत्येक करिअर हे गुणांवर अवलंबून आहे. कोणत्याही नव्या अभ्यासक्रमाला प्रवेश घ्यायचा असल्यास चांगले गुण असतील, तरच प्रवेश मिळेल, तरच करिअर घडेल अशा व्यवस्था निर्माण होऊन खासगी शिकवणीवर्गाचा प्रभाव अधिक वाढला. त्यात भर पडली ती इंटिग्रेटेड शिकवणी वर्गांची. गेल्या दहा वर्षांमध्ये अकरावी-बारावीच्या बाबतीत इंटिग्रेटेड स्कूल हा प्रकार उदयास आला. विद्यार्थ्यांनी कनिष्ठ महाविद्यालयात प्रवेश घ्यायचा आणि खासगी शिकवणी वर्गात जायचे. शिकवणी वर्गात स्पर्धा परीक्षांचे मार्गदर्शन केले जाते. कनिष्ठ महाविद्यालयातील उपस्थितीची व्यवस्था शिकवणी वर्गामार्फत केली जाते. गेल्या दहा-पंधरा वर्षांमध्ये पुणे शहर, जिल्ह्यामध्ये सुमारे ५० टक्के कनिष्ठ महाविद्यालये अशा प्रकारातील आहेत. असे शिक्षण, करिअरसाठी विद्यार्थ्यांवर लहान वयात टाकला जाणारा दबाव हे कितपत योग्य, हा प्रत्येकानेच विचार करण्याचा मुद्दा आहे.

भविष्यकाळ

आज जागतिक पातळीवर शैक्षणिक, आर्थिक, सामाजिक, तंत्रज्ञानविषयक परिस्थिती रोज बदलत आहे. संपूर्ण जग संशोधनाच्या माध्यमातून प्रगती करण्याच्या मागे लागलेले आहे. या अनुषंगाने देशातील शिक्षणात परिवर्तन आणण्यासाठी केंद्र सरकारने २०२०मध्ये राष्ट्रीय शैक्षणिक धोरण जाहीर केले आहे. या शिक्षणामधून विद्यार्थ्यांचा भावनिक विकास होण्याची खूप मोठी गरज व्यक्त करण्यात आली आहे. भावनिक विकासाचा पाया मानसशास्त्र आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या माध्यमातून पंचकोषाधारित शिक्षण ही संकल्पना पूर्वप्राथमिक, प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षणामधून हा प्रयत्न सुरू करण्याचा विचार मांडलेला आहे. त्याच्यावरही पुणे शहरामध्ये मोठ्या प्रमाणात काम सुरू आहे. खासगी विनाअनुदानित शाळा, स्वयंअर्थसहाय्यित शाळांबरोबरच्या स्पर्धेत शहरातील महापालिकेच्या शाळा, खासगी अनुदानित शाळांनी टिकणे महत्त्वाचे आहे. गेल्या पंचवीस वर्षांमध्ये निर्माण झालेली ही स्पर्धा अधिक तीव्र होऊ शकते. खासगी शाळांतील आकर्षक आणि महागड्या शिक्षणाबरोबरच प्रत्येक समाजघटकातील विद्यार्थ्याला परवडणारे शिक्षण मिळणे, ही प्राथमिकता असली पाहिजे. आजचे विद्यार्थी हे भविष्यातील नागरिक आहेत. त्यामुळे शालेय शिक्षणातील गुणवत्ता हा कळीचा मुद्दा आहे. आजवर शिक्षणाच्या क्षेत्रात पुण्याने राज्याला खूप काही दिले आहे. महाराष्ट्राच्या इतिहासात शिक्षणाच्या क्षेत्रात, विशेषतः शालेय शिक्षणात पुण्याचे स्थान आणि योगदान मोलाचे राहिले आहे. येत्या काळातही ते राहणार आहे, यात शंका नाही.

(लेखक ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ आहेत.)

Story img Loader