चंद्रमोहन कुलकर्णी
शहर वाढलं, विस्तारलं. नदी बारकी झाली. रस्ते मोठे झाले. झाडं तुटली, हिरवा रंग पुसून पुसून गेला आणि त्या जागी सिमेंटचे करड्या रंगाचे अभद्र डाग-धब्बे यानं भवताल व्यापून गेला. डोंगर सपाट झाले. टेकड्या भुईसपाट झाल्या. रस्ते रूक्ष झाले. वाटा कोरड्या झाल्या. गर्दी-कोलाहल वाढला. मोठा बदल झाला. निसर्गचित्र काढायला निसर्गच उरला नाही. लॅण्डस्केपचं रूपांतर सिटीस्केपमध्ये होऊ लागलं.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा
यलो ऑकर कलरची एखादी झोपडी किंवा तांबड्या कौलांचं एखादं छोटंसं घर, वडा-पिंपळांचे सॅप ग्रीनचे हिरवे गर्द फटकारे, लाल-केशरी गुलमोहराचं डार्क ब्राऊन फांद्यांचं एखादं झाड. सकाळची वेळ असेल, तर ऊन-सावल्यांच्या कवडशांचे तुकडे तुकडे, बैलगाडीचं एखादं लाकडी चाक झोपडीच्या भिंतीला टेकवून ठेवलेलं, तिथेच दोन-चार काळ्या-पांढऱ्या शेळ्या-बकऱ्या, रंगीत माळा नि गळ्यात घंटा बांधलेला एखादा बैल, सुंदरसा वळणावळणाचा नदीकिनारा, आकाशात ढगांचे निळ्या-जांभळ्या रंगांचे सोडलेले फ्लो किंवा नदीच्या काठावरचं छानसं एखादं छोटंसं दगडी देऊळ. त्याच्या पाण्यातल्या प्रतिबिंबाचे तुकडे (अस्ताचलास टेकलेले रविबिंब!) पांढरी पडकी मशिद एखादी नि तिच्या घुमटावर फडकणारी हिरवी पताका, पार्श्वभूमीला काळ्या – करड्या आकाशाच्या खिन्न फटकाऱ्यांना छेद देत जगन्नियंत्याला साद घालणाऱ्या काळसर निष्पर्ण वृक्षाचे वाळके फटकारे…
अगदी इतकं साधंसं झकास असं लॅण्डस्केप सहज म्हणून करायला शहराच्या आसपास निसर्गाकडे जाण्याची सोय राहिली नाही, त्यालाही आता पंचवीस वर्षं उलटून गेलीत! हा साधा आनंद सहजगत्या मिळवण्याचे दिवस उलटून पंचवीसच काय पन्नासही वर्षं झाली असतील. गळ्यात चित्रकलेच्या साहित्याची शबनम बॅग टाकून, सायकलवर टांग टाकली, की चार-पाच किलोमीटरवर शहराच्या बाहेर आता-आतापर्यंत होती ती नयनरम्य ठिकाणं. इकडे कात्रज, शिवापूर, शिरवळ, कमर अली दरवेशाचा दरगाह; तिकडे विठ्ठलवाडी, आणखी एका दिशेला वाघोली ते पुढे रांजणगावपर्यंत, एकीकडे युनिव्हर्सिटी, तर पलीकडे पाषाण, भूगाव अशा आठही दिशांना वसलेली छोटी छोटी गावं, वस्त्या. मोठा संपन्न परिसर होता, आत्ता आत्ता पंचवीस वर्षांपूर्वी!
लॅण्डस्केपचं उदाहरण अशासाठी दिलं, की आर्ट कॉलेजमधून शिक्षण घेऊन बाहेर पडलेला विद्यार्थी असो, की एखादा कलाप्रेमी नोकरदार; नोकरी-धंदा करणारा प्रौढ मनुष्य असो किंवा एखादा कलरसिक, जलरंगातील साधी साधी निसर्गचित्रं काढणं ही सामान्य माणसाची नैसर्गिक ऊर्मी आहे. एखादं चित्र काढावं, थोडा वेळ कलाकार आणि कलेच्या सान्निध्यात राहावं, थोडी मौजमजा करावी आणि पुढे चालावं, असं कोणालाही वाटणं स्वाभाविकच आहे.
शहर वाढलं, विस्तारलं. नदी बारकी झाली. रस्ते मोठे झाले. झाडं तुटली; हिरवा रंग पुसून पुसून गेला आणि त्या जागी सिमेंटचे करड्या रंगाचे अभद्र डाग-धब्बे यानं भवताल व्यापून गेला. डोंगर सपाट झाले. टेकड्या भुईसपाट झाल्या. रस्ते रुक्ष झाले. वाटा कोरड्या झाल्या. गर्दी-कोलाहल वाढला. मोठा बदल झाला. निसर्गचित्र काढायला निसर्गच उरला नाही. लॅण्डस्केपचं रूपांतर सिटीस्केपमध्ये होऊ लागलं. शहराचे आतले भाग, वस्त्या, पेठा, गल्लीबोळ सुन्न वाटू लागले. जास्त बकाल आणि केविलवाणे होऊ लागले. कोंदटलेल्या श्वासाची आवर्तनं सिटीस्केपमध्ये दिसू लागली. पडके वाडे, चाळी, जिने, कठडे, रिक्षा, सायकली, स्कूटर, दोऱ्यांवर वाळत घातलेले कपडे, पानबिडीची दुकानं, दुकानांच्या पाट्या, होर्डिंग, जुनी रेस्टॉरंट यांची प्रतिबिंबं चित्रांत दिसू लागली. डोंगर-दऱ्यांमधला पाऊस सिटीस्केपमध्ये येऊन चिखलपाण्याने वाहू लागला. शिंतोडे उडवू लागला. जलरंगांचे ओघळ चिखलाने व्यापू लागले. रोमँटिसिझमचा आणि भाबड्या निसर्गचित्रांचा काळ ओसरला. हा मोठा बदल; शहराच्या समाजजीवनात झालेला हा मोठा बदल चित्रकारांनी ब्रशवर घेतला. चित्रं समाजाभिमुख होऊ लागली. गेल्या दहा-वीस वर्षांत एकमेकांना ‘फॉलो’ करणाऱ्या चित्रकारांची गर्दी वाढू लागली. कलाविद्यालय सोडून चित्रकलेचे खासगी तासा-दोन तासांचे, महिन्या-दोन महिन्यांचे क्विक क्लास वाढू लागले. स्पॉटवर जाऊन चित्र काढण्यापेक्षा एखाद्या स्थळाचा फोटो समोर ठेवून अनुभूतीपेक्षा, स्वतःच्या स्वतंत्र अभिव्यक्तीपेक्षा, फोटो समोर ठेवून कॉपी करणं लोक पसंत करू लागले. सगळ्यांची चित्रं आता एकसारखी दिसू लागली. इतकंच काय, चित्रकार सह्यादेखील एकमेकांसारखे करू लागले. ‘हाऊ टू डू’ आणि ‘यशस्वी चित्र कसे काढावे?’ अशा प्रकारची पुस्तके प्रसिद्ध होऊ लागली. या प्रकारच्या चित्रकलेतील उत्स्फूर्तता कमी-कमी होऊन चित्रे मृतवत वाटू लागली. आणखी एक निरीक्षण असं, की इतके दिवस थोडीशी बाजूला पडलेली ‘पोर्ट्रेट पेंटिंग’ ही शाखा थोडी उजळली. परंतु पोर्ट्रेट पेंटिंगमध्येसुद्धा ॲकॅडमिक पद्धतीचा प्रभाव सतत राहिल्याचं दिसतं. अर्थातच चित्रकलेच्या इतर प्रकारांमध्ये चित्रकार आपापल्या अभिव्यक्तीनुसार आपापल्या कामाच्या निर्मितीत व्यग्र आहेत, यात काहीच शंका नाही. पण, हे स्वतंत्र वृत्तीचं काम पुण्यातल्या काही तुरळक गॅलरीमधूनच प्रदर्शित होताना दिसलं. चित्रकलेबद्दलचं, वैचारिक गोष्टींचं आकलन असणाऱ्या कलारसिकांची आणि चित्र खरेदी करणाऱ्या धनाढ्य रसिकांची, कलासंग्राहकांची वानवा, हे त्याचं प्रमुख कारण असावं. महाराष्ट्राव्यतिरिक्त भारतातल्या इतर आर्ट गॅलरी आणि इतर प्रांतांतले कलावंत यांच्या कलाकृतींचं एकत्रित प्रदर्शन पुण्यासारख्या आर्ट गॅलरीने भरलेल्या शहरामध्ये वारंवार होताना दिसलं नाही. त्यात कलावंत आणि आर्ट गॅलरीमधल्या गटातटांचं राजकारण हाही मुद्दा इथे लक्षात घेणं महत्त्वाचं आहे. वेगवेगळ्या विचारसरणीचे कलावंत वेगवेगळ्या प्रकारची निर्मिती करणारच; पण त्यात गटातटांचं राजकारण डोकावणं, ही गोष्ट एखाद्या शहराचा कलाप्रवाह खंडित करते, असं मला वाटतं. तरीसुद्धा नाटक, नृत्य अशा सादरीकरणांमध्ये अलीकडे चित्रकार आणि चित्रकलेचा होत असलेला सहभाग आणि होत असलेले प्रयोग, ही गोष्ट गेल्या पंचवीस वर्षांत नव्यानं घडते आहे. गेल्या पंचवीस वर्षांत आर्ट कॉलेज आणि आर्ट गॅलरी यांची संख्या लक्षणीयरीत्या वाढली. फाईन आर्ट, ॲप्लाईड आर्ट आणि स्क्लप्चर यांसाठी दर्जेदार शिक्षण मिळणारं आणि सुप्रसिद्ध असं अभिनव कलामहाविद्यालय हा एकखांबी तंबू होता. आता शहराच्या अनेक दिशांना कलाविषयक चांगलं शिक्षण देणारी आर्ट कॉलेज सुरू झाली. चांगल्या प्रकारे स्थिरावलीही. महाराष्ट्राबाहेरून येऊन इथे शिकणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या चांगल्यापैकी आहे. पेन्शनरांच्या पुण्यात संगणकामुळे फार मोठा बदल घडला. पारंपरिक कलाविषयांबरोबरच ॲनिमेशन, ग्राफिक डिझाइन, फॅशन अशा अनेक अद्ययावत आणि अत्याधुनिक विषयांना इथे स्पर्श होऊ लागला. पुण्याजवळच तासाभराच्या अंतरावर उत्तम कलासंग्रहालय उभं राहिलं, ही या अलीकडच्या काही वर्षांमधली फार महत्त्वाची घटना.
अभिनव कलाविद्यालयाप्रमाणेच बालगंधर्व कलादालन हाही चित्रकारांना पंचवीस-तीस वर्षांपूर्वी चित्रप्रदर्शनासाठी एकमेव आधार होता. आता काॅर्पोरेशनच्या छत्राखाली पुष्कळ गॅलरी उभ्या राहिल्या. तद्वतच खासगी गॅलऱ्यांची संख्या मोजायला हाताची दहा बोटं पुरेनाशी झाली. गेल्या पंचवीस वर्षांत चित्रकारांची संख्या अमाप वाढली. अर्थातच त्यामुळे चित्रांचीही संख्या वाढली. पण ही चित्रं रसिकांपर्यंत न्यायची कशी, दाखवायची कशी, हा प्रश्न आता उरला नाही. शहरातल्या सर्व आर्ट गॅलरी चित्रप्रदर्शनांनी ओसंडून वाहू लागल्या. यामुळे चित्रकारांचा अर्थव्यवहार उलाढालीच्या दृष्टीनं किती वाढला हे सांगता येणार नाही; पण गॅलरीचा अर्थव्यवहार मात्र जोमानं होऊ लागला. खरं तर या व्यवहारात चित्रविक्री हा मुद्दा केंद्रस्थानी येऊ लागला. ज्या गॅलरीत चित्र जास्त संख्येनं आणि जास्त किमतीला विकली जातील, त्या गॅलरीमध्ये वर्ष-वर्ष, दोन दोन-तीन तीन वर्षांचं बुकिंग होऊ लागलं. तरी पण मुंबई महानगरीच्या मानानं इथला अर्थव्यवहार फारच दुर्बळ हे तर जगजाहीरच आहे. त्या अर्थानं पुण्यात आजही एक प्रकारे जिल्हा पातळीवरचं किंवा तालुका पातळीवरचंच काम होत आहे, हे सांगताना खेद वाटत असला, तरी सत्य परिस्थिती तीच आहे. कलारसिक, कलावंत, कलाप्रेमी, समीक्षक, विचारवंत यांच्यात चित्रकलाविषयक चर्चा व्हाव्यात, संवाद घडावा यासाठी काही गॅलरी निश्चितपणे प्रयत्न करत आहेत. पण ते फार प्रभावी ठरत नाही.
तसेच दिल्ली, मुंबई, गोवा, कोलकाता, बेंगळूरु अशा ठिकाणी भरत असलेल्या वार्षिक / द्वैवार्षिक / त्रैवार्षिक कला प्रदर्शनांमध्ये पुण्याच्या चित्रकारांचा तुरळक असला, तरी सहभाग महत्त्वाचा ठरतो. शिल्पकलेची स्वतंत्र एकल, स्वतंत्र किंवा समूहानं केलेली प्रदर्शनं पुण्यात अद्याप फारशी पाहायला मिळत नाहीत. पण सिरॅमिक / हस्तकला या प्रकारची प्रदर्शनं शॉपिंग मॉल किंवा इतर ठिकाणी भरण्याचं प्रमाणही किंचितसं वाढलं आहे. आर्ट मंडईसारखे प्रयोगही यशस्वी आणि लोकप्रिय होताना दिसतात. पुणे हे पुस्तकांचं आणि प्रकाशकांचं माहेरघर. गेल्या वीसेक वर्षांमध्ये कथा-कादंबऱ्या आणि ललित साहित्य यांना वळसा घालून चरित्र-आत्मचरित्र, प्रवासवर्णनं, अनुभवकथन, पाककृती, सेलिब्रेटींच्या कहाण्या, उपयोगिता ही मूल्य असलेली पुस्तकं प्रकाशित करण्याकडे प्रकाशकांचा ओढा दिसतो. त्यामुळे अर्थातच मुखपृष्ठांसाठी चित्र करणाऱ्या चित्रकारांवर काही बंधनं आली. दिवाळी अंकांच्या साहित्याबाबतही थोड्याफार प्रमाणात हाच प्रकार सुरू राहिला. त्यामुळे स्टोरी इलस्ट्रेशन या आधीच दुर्लक्षित असलेल्या चित्रकलेच्या महत्त्वाच्या प्रकाराकडे कलाशिक्षण देणाऱ्या संस्थांबरोबरच चित्रकारांचंदेखील गंभीर दुर्लक्ष होत आहे. या प्रकारच्या माध्यमांसाठी चित्र काढताना कॉम्प्युटरवरनं मिळणारी रेडी ग्राफिक्स वापरून त्यावर थोडेफार संस्कार करून कामचलाऊ पद्धतीचा व्यवहार जास्त वाढल्याचं दिसतं आहे. कॅलिग्राफी, टायपोग्राफी यांमध्येसुद्धा शक्य तो ‘रेडिमेड’ मिळवण्याची वृत्ती बळावत चाललेली दिसते. बालवाङ्मयासाठी केल्या जाणाऱ्या चित्रकलेमध्येसुद्धा हाच प्रकार दिसतो. आपण या निर्मितीच्या घटकांकडे नीट लक्ष दिलं नाही, तर नव्या पिढीच्या हाती कलेच्या संदर्भात आपण काय ठेवणार आहोत, हा प्रश्न महत्त्वाचा आहे.
तर, असा एकूण विठ्ठलवाडीच्या रस्त्यानं निसर्गचित्र काढायला गेल्यावर परतीच्या प्रवासात आपण आर्टिफिशिअल इंटेलिजन्स या महामेट्रोच्या जाळ्यात प्रवेश करण्यासाठी उभे आहोत.
(लेखक ज्येष्ठ चित्रकार आहेत.)