डॉ. पराग काळकर
दोनशे वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी डेक्कन कॉलेजची स्थापना केली. त्यानंतरच्या काळात विशेषतः २००० नंतर शिक्षण क्षेत्राचा, उच्च शिक्षण क्षेत्राचा झपाट्याने विकास झाला. अनेक खासगी महाविद्यालये, विद्यापीठे निर्माण झाली. त्यामुळे ऑक्सफर्ड ऑफ द ईस्ट ही पुण्याची बिरुदावली आता अधिक ठळक झाली आहे. शिक्षण आणि समाज कायम बदलत असतो याची जाणीव ठेवून गेल्या पंचवीस वर्षांतील बदल, विस्ताराचा आढावा घेतानाच उच्च शिक्षण क्षेत्रात गुणात्मक विकास आणि ज्ञानविस्तार घडतो आहे का, भविष्यातील गरजा याचाही धांडोळा घेणे आवश्यक ठरते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

उच्च शिक्षणाचा विस्तार

पुण्याच्या मध्यवर्ती भागात पारपंरिक अभ्यासक्रम राबवणाऱ्या महाविद्यालयांची संख्या सन २००० पूर्वी मोठ्या प्रमाणात होती. त्यात फर्ग्युसन महाविद्यालय, सर परशुरामभाऊ महाविद्यालय, वाडिया महाविद्यालय, डेक्कन कॉलेज, गरवारे महाविद्यालय अशा महाविद्यालयांचा समावेश होतो. या महाविद्यालयांतून पदवी अथवा पदव्युत्तर पदवी पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्याही बरीच होती. या नामवंत महाविद्यालयांची ख्याती जगभर पसरलेली होती. आताचे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ म्हणजे पूर्वाश्रमीचे पुणे विद्यापीठ. सन २००० पूर्वी विद्यापीठाशी संलग्नित महाविद्यालयांमध्ये पारंपरिक अभ्यासक्रमाच्या महाविद्यालयांची संख्या अधिक होती. मात्र त्याच सुमारास जागतिकीकरणाचे परिणाम दिसू लागले. हिंजवडीमध्ये आयटी पार्कची उभारणी झाली आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रातील संधी दिसू लागल्या. त्याचा परिणाम शिक्षण क्षेत्रावरही झाला. शहराचा चहुबाजूंनी विकास, विस्तार होऊ लागल्याने विस्तारित पुण्याच्या शैक्षणिक गरजांना परिपूर्ण करण्यासाठी स्वयंनिर्वाही विनाअनुदानित महाविद्यालये आणि शैक्षणिक संस्था बहुसंख्येने उदयास आल्या. विशेषतः अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन अभ्यासक्रमांची महाविद्यालये. तोपर्यंत पुण्यात तत्कालीन पुणे विद्यापीठाव्यतिरिक्त एसएनडीटी महिला विद्यापीठ, भारती विद्यापीठ विश्वविद्यालय, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, डेक्कन कॉलेज अभिमत विद्यापीठ, गोखले राज्यशास्त्र आणि अर्थशास्त्र संस्था अशी काही मोजकीच विद्यापीठे होती. त्यानंतरच्या काळात सिम्बायोसिस अभिमत विद्यापीठ, टिळक महाराष्ट्र अभिमत विद्यापीठ, डॉ. डी. वाय. पाटील अभिमत विद्यापीठ अशी विद्यापीठे झाली. आज पुणे शहर आणि परिसरात ३० हून अधिक विद्यापीठे कार्यान्वित आहेत. येत्या काळात आणखी किमान १० खासगी विद्यापीठे आणि समूह विद्यापीठे अस्तित्वात येणार आहेत. आकडेवारी पाहिल्यास, सन २००० मध्ये १५० च्या आसपास महाविद्याये आणि शैक्षणिक संस्था अस्तित्वात होत्या. त्यात अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या १७ होती. तसेस कला, विज्ञान आणि वाणिज्य महाविद्यालये १०० च्या आसपास होती. तर आता २०२५ मध्ये वेगवेगळ्या विद्यापीठस्तरीय संस्था वगळून सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अंतर्गत येणारी जवळपास ४०० महाविद्यालये शहर आणि परिसरात आहेत. साधारण विद्यार्थिसंख्या तीन लाखांपेक्षा अधिक आहे. या व्यतिरिक्त खासगी आणि अभिमत विद्यापीठांची मिळून एकत्रित विद्यार्थिसंख्या तीन लाखांच्या आसपास आहे. त्याशिवाय ऑनलाइन, तसेच दूरशिक्षणाच्या माध्यमातूनही विद्यार्थी शिक्षण घेतात. पारंपरिक शिक्षणाच्या जोडीनं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ बँकिंग मॅनेजमेंट, वैकुंठ मेहता राष्ट्रीय सहकार व्यवस्थापन संस्था अशा काही संस्थाही महत्त्वाच्या आहेत.पूर्वी खासगी शिक्षण संस्था सुरू करण्यासाठी वेगवेगळ्या स्तरावरच्या परवानगी आवश्यक असल्याने संस्थात्मक वाढीचा आणि बदलांचा वेग कमी होता. मात्र, गेल्या काही वर्षांत शिखर संस्थांच्या स्वतंत्र नियमावलीनुसार आवश्यक असणारी जमीन आणि इमारतीचे मार्गदर्शक मानक पूर्ण केल्यानंतर व्यावसायिक अभ्यासक्रमाच्या विविध महाविद्यालयांना परवानगी मिळण्याची प्रक्रियाही बऱ्यापैकी सोपी झाली आहे. अनेक नवीन संस्थांनी शिखर संस्थांची मान्यता घेऊन वेगवेगळ्या विद्याशाखांमधील महाविद्यालयांचा विस्तार मोठ्या प्रमाणात झाला आहे आणि याच कारणाने पुणे शहराची उच्च शिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना सहभागी करून घेण्याची क्षमताही सातत्याने विस्तारत आहे. येत्या काळात ती १० लाखांचा टप्पा ओलांडण्याची चिन्हे आहेत. आवश्यक असणारी जमीन, पुरेशा पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक विकासासाठी आवश्यक असणारे भांडवल उपलब्ध असल्यास नवीन शैक्षणिक संस्था सुरू करणे अवघड राहिलेले नाही. त्यामुळेच शहराच्या चहुदिशांना अनेक शिक्षण संस्था निर्माण होत असल्याचे दिसते.

संशोधनाचे केंद्र

उच्च शिक्षणातील महत्त्वाचा घटक म्हणजे संशोधन. सन २००० पूर्वी पुण्यात आघारकर संशोधन संस्था, राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा (एनसीएल) आंतरविद्यापीठीय खगोल आणि खगोलभौतिकी केंद्र (आयुका), राष्ट्रीय रेडिओ आणि खगोलभौतिकी संस्था (एनसीआरए), राष्ट्रीय विषाणू संस्था (एनआयव्ही), राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था (एनसीसीएस) अशा केंद्र सरकारच्या संशोधन संस्था कार्यान्वित होत्या. त्याशिवाय संरक्षण क्षेत्राशी संबंधित शिक्षण संस्था, संशोधन संस्थाही पुण्यात आहेत. रसायने, पेशी, विषाणूंपासून अवकाशापर्यंतचे संशोधन या संस्थांमधून करण्यात येते. त्यातून वैद्यकीय, संरक्षण, उद्योग अशा क्षेत्रांना दिशा देणारे महत्त्वाचे संशोधन झाले आहे. २००६ मध्ये महत्त्वाची भर पडली ती भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्थेची (आयसर पुणे). विज्ञानातील उच्च शिक्षण आणि संशोधनाला प्राधान्य असलेली ही संस्था पुण्यात सुरू झाली. पीएच.डी. अभ्यासक्रमांची सुविधाही विद्यापीठांमध्ये उपलब्ध आहे. त्यामुळे संशोधनाला चालना मिळाली आहे. गेल्या पंचवीस वर्षांत उद्योग क्षेत्रानेही संशोधनाला हात दिला आहे. त्यामुळे टीसीएस, इन्फोसिस अशा मोठ्या कंपन्यांची संशोधन केंद्रे पुण्यात सुरू झाली. त्या माध्यमातून विदा विश्लेषण, मशीन लर्निंग, इंटरनेट ऑफ थिंग्ज अशा क्षेत्रांसाठीचे संशोधन केले जाते. पूर्वी संशोधन आयसोलेटेड पद्धतीने होत होते. मात्र, गेल्या काही वर्षांत आंतरविद्याशाखीय संशोधनाचे महत्त्व वाढले आहे. त्यामुळे पुण्यातील संस्था एकमेकांच्या सहकार्याने, उद्योगांना सोबत घेऊन संशोधन करतात. परिणामी एकूणच पुण्यातील संशोधन क्षेत्रात गतिशीलता निर्माण झाल्याचे दिसून येते.

शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी

गेल्या पंचवीस वर्षांत पुण्यात राज्यभरातूनच नाही, तर परराज्यांतून आणि परदेशांतूनही विद्यार्थी शिक्षणासाठी येतात. विशेषतः आयटी पार्कची निर्मिती झाल्यानंतर विद्यार्थ्यांचा टक्का वाढायला लागला. माहिती तंत्रज्ञान, वाहन, संरक्षण अशा विविध क्षेत्रांतील रोजगारसंधी उपलब्ध असल्याने अन्य शहरांच्या तुलनेत विद्यार्थ्यांची पुण्याला पसंती मिळाली. ते शहरातील विविध विद्यापीठे, शिक्षण संस्थांमध्ये प्रवेश घेतात. या विद्यार्थ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठी वसतिगृहे, खाणावळी, शिकवणी वर्ग अशी एकूण परिसंस्थाच विकसित झाली. गेल्या दशकात १४००० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विद्यार्थी अनेक देशांमधून येत असल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे शहरात बहुसांस्कृतिक वातावरण तयार झाले आहे.

स्वायत्त महाविद्यालये

सन २००० पूर्वी महाविद्यालयांना संलग्नता देणारे तत्कालीन पुणे विद्यापीठ एकमेव होते. त्यामुळे महाविद्यालयांची विद्यापीठाशी संलग्नता होती. मात्र, केंद्र सरकारने गुणवत्तापूर्ण महाविद्यालयांना स्वायत्तता देण्याचे धोरण स्वीकारले. त्यानुसार २००३-०४ मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय पुणे (सीओईपी) हे पुण्यातील पहिले स्वायत्त महाविद्यालय ठरले. त्यानंतरच्या काळात टप्प्याटप्प्याने महाविद्यालयांना स्वायत्तता मिळू लागली. स्वायत्ततेअंतर्गत महाविद्यालयांना अभ्यासक्रम विकसित करणे, परीक्षा पद्धती ठरवण्याची मुभा मिळते. त्यामुळे आता महाविद्यालये स्वायत्ततेचा पर्याय स्वीकारू लागली आहेत.

भविष्याचा वेध

गेल्या पंचवीस वर्षांचा आढावा घेतल्यास शहरात उच्च शिक्षण, संशोधनाचा झपाट्याने विकास झाला. मात्र, विद्यापीठांची वाढती संख्या लक्षात घेता पुणे हे सर्वाधिक पदवी देणारे, सर्वाधिक विद्यार्थी असणारे शहर असेल. आता राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० ची अंमलबजावणी सुरू झाली आहे. या धोरणानुसार अनेक बदल होऊ घातले आहेत. त्यात महत्त्वाचा बदल म्हणजे विद्यापीठाशी असलेली संलग्नता संपुष्टात येऊन प्रत्येक महाविद्यालय हे पदवी देणारी शिक्षण संस्था होणार आहे. आंतरविद्याशाखीय शिक्षणावर भर दिला जाणार आहे. कला, वाणिज्य, विज्ञान हा पारंपरिक भेद संपुष्टात येणार आहे. ही बाब विचारात घेता शिक्षण संस्थांनी प्रामुख्याने मानसिकतेमध्ये बदल करण्याची गरज अधोरेखित होत आहे.संशोधन आणि त्या संशोधनाचा समाजासाठी होणारा उपयोग याकडे शिक्षण संस्थांनी अधिक लक्ष देण्याची आवश्यकता आहे. बौद्धिक संपदा निर्मिती, त्यातून नवे तंत्रज्ञान विकसित करणे, शिक्षण संस्था-संशोधन संस्थांतील तंत्रज्ञान उद्योगांना हस्तांतरित करणे, शिक्षण, उद्योग क्षेत्राने एकत्रित काम करणे गरजेचे झाले आहे. विद्यार्थ्यांना केवळ पदवी देऊन चालणार नाही, तर त्यांचा सर्वसमावेशक विकास करून त्यांना रोजगारक्षम करण्यावर भर देणे हे प्रमुख उद्दिष्ट आहे. त्याशिवाय हवामान बदल, करोनापश्चात आरोग्य, पर्यायी ऊर्जा अशा विषयांवर मूलभूत संशोधनाचे महत्त्व निर्माण झाले आहे. त्यासाठी शिक्षक, विद्यार्थ्यांनी पुढाकार घेतला पाहिजे. तसेच सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह पुण्यातील उच्च शिक्षण संस्था, विद्यापीठांनी एकत्रित येऊन काम केले पाहिजे. त्यातून विद्यार्थ्यांना विविध विषयांचा अभ्यास करण्याची संधी मिळेल, त्यांचे ज्ञान आणि कौशल्ये अधिक व्यापक होऊ शकतील. त्यामुळे उच्च शिक्षण अधिक प्रभावी आणि उपयुक्त होईल. विविध क्षेत्रांतील श्रेयांकांचे आदान-प्रदान होऊन विद्यार्थ्यांना त्यांची आवड आणि क्षमता जोपासण्याची संधी मिळेल

(लेखक सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे प्र-कुलगुरू आहेत.)