डॉ. शीतलकुमार रवंदळे
गेल्या २५ वर्षांमध्ये पुणे शहर आणि परिसरात अभियांत्रिकी आणि व्यवस्थापनशास्त्र अभ्यासक्रमांची महाविद्यालये झपाट्याने वाढली. पदवीधर विद्यार्थ्यांना नोकरीच्या संधी निर्माण होण्यासाठी महाविद्यालयांमध्ये कॅम्पस प्लेसमेंटसारखे उपक्रम सुरू झाले. गेल्या २५ वर्षांत अनेक बदल झाले आहेत. नव्या तंत्रज्ञानाचा उदय, विद्यार्थ्यांचा कल, कंपन्यांची मागणी यात सातत्याने बदल झाले आहेत. म्हणूनच २१ व्या शतकाच्या २५ व्या वर्षांत महाविद्यालयांतील कॅम्पस प्लेसमेंटमध्ये होत गेलेल्या बदलांचा वेध घेणे महत्त्वाचे ठरते. दर पाच वर्षांनी नोकऱ्यांचा बदललेला कल, तंत्रज्ञानातील बदल टिपतानाच आता कृत्रिम बुद्धिमत्तेसारख्या तंत्रज्ञानाच्या काळाचा, त्यामुळे होणाऱ्या बदलांचा आणि यातून निर्माण होणाऱ्या संधी समजून घेतल्या पाहिजेत.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सन २००० ते २००५

हा काळ माहिती तंत्रज्ञान सेवा कंपन्यांचा सुवर्णकाळ होता. त्यामुळे माहिती तंत्रज्ञान सेवा क्षेत्रात टीसीएस, विप्रो, कॉग्निझंट, ॲक्सेंचर अशा कंपन्यांनी मोठ्या प्रमाणात नोकरीच्या संधी अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना दिल्या. वायटूकेसारख्या समस्यांमुळे बऱ्याच तरुणांना नोकऱ्या उपलब्ध झाल्या. अभियांत्रिकीचे शिक्षण घेणाऱ्या तरुणांना जास्त प्रमाणावर नोकऱ्या मिळाल्याने अभियांत्रिकेचे आकर्षण वाटून नवनवीन अभियांत्रिकी महाविद्यालये सुरू झाली आणि आधीच अस्तित्वात असलेल्या महाविद्यालयांमध्ये जागांची संख्याही वाढवण्यात आली. संगणक व माहिती तंत्रज्ञान या शाखांतील प्रवेशांचे प्रमाण वाढू लागले. विद्यापीठामधील अभियांत्रिकी महाविद्यालयांची संख्या शंभरावर गेली.

सन २००५ ते २०१०

या काळात माहिती तंत्रज्ञान क्षेत्राबरोबरच उत्पादन, बीपीओ, बँकिंग, फायनान्स, इन्शुरन्स क्षेत्रातही नोकरीच्या बऱ्याच संधी उपलब्ध झाल्या. मात्र २००८ साली आलेल्या जागतिक आर्थिक मंदीमुळे कंपन्यांनी भरती थांबवली किंवा कमी केली. त्यामुळे कॅम्पस प्लेसमेंटची परिस्थितीही बरीच खालावली.

सन २०१० ते २०२०

हा काळ ‘कॅम्पस प्लेसमेंट’साठी ‘सुगीचे दिवस’ होते. मोठ्या प्रमाणात नोकरभरती करणाऱ्या माहिती तंत्रज्ञान सेवा कंपन्यांबरोबरच माहिती तंत्रज्ञान उत्पादन कंपन्यांनीही या कालखंडात नोकऱ्या देण्यास सुरुवात केली. पुण्यातील चांगल्या अभियांत्रिकी महाविद्यालयात मोठ्या प्रमाणात नोकरभरती करणाऱ्या कंपन्यांनी शंभरावर नोकऱ्या एकेका महाविद्यालयात देण्यास सुरुवात केली. उद्योगांना याच काळात पोषक वातावरण निर्माण झाले. नवीन उद्योजकांनी याच कालखंडात स्वतःचे बरेच नवउद्यमी सुरू केले. डिजिटल विपणन अशा कौशल्यांना नोकरीत प्राधान्य मिळू लागले.

सन २०२० ते २०२५

२०२० मध्ये करोना प्रादुर्भावाचा काळ सुरू झाल्याने जगच बंद झाल्याची स्थिती निर्माण झाली होती. त्यामुळे बऱ्याच लोकांच्या नोकऱ्या गेल्या. कॅम्पस प्लेसमेंटची स्थितीही खालावली. कंपन्यांनी प्रत्यक्ष महाविद्यालयात येऊन नोकरभरती करण्याऐवजी ऑनलाइन भरती प्रक्रिया राबवण्यास सुरुवात झाली. लेखी परीक्षांऐवजी ऑनलाइन चाचण्या, ऑनलाइन मुलाखती कंपन्यांकडून घेतल्या जाऊ लागल्या. करोना प्रादुर्भावाच्या भीतीमुळे घरातून काम करण्याचा (वर्क फ्रॉम होम) काळ होता. करोनाचा प्रादुर्भाव ओसरल्यानंतरचे २०२२ वर्ष हे कॅम्पस प्लेसमेंटसाठी ‘सुवर्णकाळ’ म्हणून कदाचित नोंदवले जाईल. कारण, अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांना अत्याधिक मागणी असल्याने विद्यार्थ्यांना दोन ते तीन ऑफर ऑन कॅम्पस आणि ऑफ कॅम्पसच्या माध्यमातून मिळू लागल्या. त्याशिवाय कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मशीन लर्निंग, सायबर सेक्युरिटी सुरक्षा, विदा विज्ञान या क्षेत्रात कुशल असणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्त संधी मिळू लागल्या. २०२२ नंतर कॅम्पस प्लेसमेंटचे प्रमाण कमी झाले. हा काळ कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उदयाचा काळ ठरला आणि कुठल्यातरी एका तंत्रज्ञानात विद्यार्थी सरस असण्याची कंपन्यांची मागणी वाढू लागली.

कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान

कृत्रिम बुद्धिमत्तेच्या उपयोगितेमुळे पुन:पुन्हा सारखेच काम करावे लागणाऱ्या नोकऱ्यांमध्ये यांत्रिकीकरणामुळे टांगती तलवार दिसू लागली. मात्र, त्याच वेळी प्रॉम्प्ट इंजिनीअर, एआय डेव्हलपर, डेटा ॲनालिस्ट, मशिन लर्निंग इंजिनीअर अशा नव्या पदांची गरज निर्माण होऊ लागली. महाविद्यालयांमध्ये या कौशल्यांचा समावेश करणे आता अपरिहार्य होणार आहे. विद्यार्थ्यांनी त्यासाठी एनपीटीइएल, उडेमी, कोर्सेरा अशा संकेतस्थळांद्वारे विविध प्रमाणपत्र अभ्यासक्रम करणे गरजेचे झाले आहे. सध्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून तयार केलेल्या नोट्स एटीएस (ॲप्लिकेशन ट्रॅकिंग सिस्टिम) माध्यमातून सीव्ही निवडण्यात येतात. त्यामुळे योग्य ‘की-वर्ड्स’ नसल्यास हजारो विद्यार्थ्यांची संधी गमावली जाते. प्राथमिक स्वरूपाच्या मुलाखतींसाठीही चॅटबॉटचा वापर केला जातो. तसेच रोबोट्स आता ऑनलाइन मुलाखती घेतात. त्यामुळे त्या पद्धतीने मुलाखतीला सामोरे जाण्याचा सराव विद्यार्थ्यांनी प्रकर्षाने करायला हवा. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे बऱ्याच क्षेत्रातील नोकऱ्या कमी होतील. सर्वांत आधी श्रमिक कामगारांच्या नोकऱ्या (ब्ल्यू कॉलर जॉब्ज), त्यानंतर पांढरपेशी नोकऱ्या (व्हाईट कॉलर जॉब्ज) सर्वांत शेवटी, सर्जनशील क्षेत्रातील नोकऱ्या (क्रिएटिव्ह जॉब्ज) जातील असा अंदाज होता. प्रत्यक्षात हा कल उलट झालेला दिसतो. सर्वात आधी सर्जनशील क्षेत्रातील नोकऱ्या, त्यानंतर पांढरपेशी नोकऱ्या आणि सर्वांत शेवटी श्रमिक नोकऱ्या असे सध्याचे चित्र आहे.

इंटर्नशिपचे महत्त्व

महाविद्यालयातील अभ्यासक्रमात इंटर्नशिप असो की नसो, पण विद्यार्थ्यांनी इंटर्नशिप करायलाच हवी. तरच ते या एआय युगातील स्पर्धेत टिकू शकतील. प्राइम मिनिस्टर इंटर्नशिप योजना, मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना, एआयसीटीई इंटर्नशिप पोर्टल यांसारख्या सरकारी योजनांमधून केंद्र सरकार, तसेच महाराष्ट्र सरकारकडून अतिशय उत्तम प्रकारच्या इंटर्नशिपच्या आणि शिकताना पैसे मिळवण्याच्या संधी उपलब्ध करून देण्यात येत आहेत. या संधी विद्यार्थी आणि महाविद्यालयांसाठी उत्तम आहेत. याची नक्कीच प्रशंसा व्हायला हवी. या योजना म्हणजे पारंपरिक शिक्षण पद्धतीतून शिक्षण क्षेत्राला बाहेर काढून विद्यार्थ्यांना ‘ऑन द जॉब ट्रेनिंग’ मिळाल्याने उद्योग क्षेत्राला अपेक्षित कुशल मनुष्यबळ तयार करण्यासाठी ‘गेम चेंजर’ ठरणार आहेत. त्यांचा जास्तीत जास्त उपयोग विद्यार्थी व महाविद्यालयांनी करून घ्यायला हवा. सरकार व्यतिरिक्त प्रायव्हेट क्षेत्रातील लिंक्डईन, इंटर्नशाला.कॉम, हॅकरअर्थ.कॉम, वीफाऊंड.कॉम, लेट्सइंटर्न.इन, वीइंटर्न, इंटर्नवर्ल्ड अशा संकेतस्थळांवर एकत्रित लाखो ऑनलाइन आणि ऑफलाइन इंटर्नशिप उपलब्ध आहेत. कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रातील कंपन्यांमध्ये होणारे बदल विद्यार्थी या इंटर्नशिपच्या माध्यमातून शिकू शकतील.

बदल आणि संधी

सन २००० ते २०१५ या काळात केवळ ॲप्टिट्यूडची लेखी परीक्षा, त्यानंतर मुलाखत अशीच कंपन्यांची नोकरभरतीची प्रक्रिया होती. २०१६ नंतर ॲप्टिट्यूडबरोबरच प्रोग्रामिंगची चाचणीही आयटी कंपन्यांबरोबरच बहुतांश कंपन्यांनी अनिवार्य केली आहे. पूर्वी मुलाखती प्रत्यक्ष (फेस टू फेस) पद्धतीने होत असत. आता मात्र साधारणपणे ५० ते ६० टक्के कंपन्या आभासी मुलाखती (व्हच्युअल इंटरव्ह्यू) घेतात. आता कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांचा वापर करून ‘व्हर्च्युअल रोबोट्स’कडून मुलाखती घेण्यास सुरुवात झाली आहे. याचा सराव विद्यार्थ्यांनी करायला हवा. ऑनलाइन चाचणी देताना विद्यार्थ्यांनी नैतिक मूल्यांचे भान ठेवून ‘कॉपी’ करू नये, यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत घेतली जाते. विद्यार्थ्याने इतर काही मदत घेतली का, दुसरे कुठले सॉफ्टवेअर वापरले का, यासाठी दृकश्राव्य पद्धतीने पडताळणी केली जाते. चुकीच्या मार्गाने चाचणी देणाऱ्या विद्यार्थ्यांना सहजच हुडकून दाखवले जाते. कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे लो कोड किंवा नो कोडच्या माध्यमातून अगदी सहजपणे विविध लँग्वेजमध्ये प्रोग्रॅम सहजपणे तयार करून घेतले जाऊ शकतात. त्यामुळे कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करून कमी वेळात उत्तम दर्जाचे प्रोग्रॅम तयार करणाऱ्या अभियंत्यांना बाजारात मागणी असणार आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी स्वत:ची कौशल्यवृद्धी करणारे अभियंतेच आपापल्या क्षेत्रात तग धरू शकतील.प्रकल्पांवर भर आवश्यककृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरामुळे नैतिकता व अनैतिकता यावरही भर दिला जात आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता तत्त्वे, विदा सुरक्षितता अशा क्षेत्रांमध्ये नव्या संधी निर्माण झाल्या आहेत. आता विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त प्रकल्प करण्यावर भर दिला पाहिजे. आपल्या प्रकल्पांचे कोड गीटहबसारख्या संकेतस्थळावर उपलब्ध केले पाहिजेत. अभ्यासक्रमात नसेल, तरीही प्रत्येक सत्रात एक तरी चांगला प्रकल्प करायला हवा. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात टिकण्यासाठी विद्यार्थ्यांनी विविध कंपन्यातर्फे घेण्यात येणाऱ्या प्रकल्प स्पर्धांमध्ये पूर्ण तयारीनिशी भाग घ्यायला हवा. विविध कंपन्यांच्या व भारतातील सर्वोत्तम महाविद्यालयातर्फे आयोजित आणि तांत्रिक स्पर्धांमध्येही भाग घेतला पाहिजे. भविष्यात मोठ्या प्रमाणात नोकरी भरती करण्याचे प्रमाण हळूहळू कमी होऊन एखाद्या भविष्यकालीन तंत्रज्ञानात कुशल होऊन त्या तंत्रज्ञानात प्रमाणित होण्यासाठी प्रकल्प, शोधनिबंध, इंटर्नशिप केल्यास कंपन्यांमध्ये जास्त मागणी असेल.

(लेखक महाराष्ट्र असोसिएशन ऑफ ट्रेनिंग अँड प्लेसमेंट ऑफिसर्सचे अध्यक्ष आहेत.)