सतीश जकातदार
गेल्या शे-सव्वाशे वर्षांच्या पुणे शहराच्या इतिहासात अनेक चित्रगृहे उदयास आली. काही काळाच्या ओघात गडप झाली, काहींनी आपली कात टाकली तर काहींनी २१ व्या शतकाच्या नव्या युगास साजेसे रूप बदलले! तर काही इतिहासात अजरामर झाली. मात्र एक नक्की. सिनेशौकिनांच्या स्मरणात या थिएटर्सची आठवण सदोदित चिरंतन राहिली. कधी तेथे बघितलेल्या सिनेमांमुळे तर कधी त्या त्या सिनेमांच्या निमित्ताने घडलेल्या प्रसंगांमुळे! त्यामुळेच त्या त्या पिढीतील रुचीनुसार सतत बदलणाऱ्या सिनेमांचे दर्शनही त्यात आहे. आणि म्हणूनच या काळाचे खरे साक्षीदार ही सिनेमा थिएटर्स आणि त्या भोवतीचा इतिहास आहे.

‘विसाव्या शतकाचं माध्यम’ म्हणून सिनेमा कलेचा जन्म झाला आणि दादासाहेब फाळकेकृत ‘राजा हरिश्चंद्र’ हा पहिला भारतीय चित्रपट १९१३ ला प्रदर्शित झाला आणि लगोलगच ७ फेब्रुवारी १९१५ ला पुण्यात ‘आर्यन’ हे पहिले चित्रपटगृह उभे राहिले. गंगाधर नरहर उर्फ बापूसाहेब पाठक यांनी ‘मंडई’समोर मनोरे असलेले हे टुमदार चित्रगृह उभारले. (आज तिथे पे-पार्किंग आहे) ‘आर्यन’ त्या काळाचे वैभव होते. तिथूनच ‘एक पडदा’ चित्रगृहाच्या उभारणीस प्रारंभ झाला! ‘आर्यन’चा उदय होईपर्यंत पुणे हे नाट्यवेडे शहर म्हणून ओळखले जात होते. बालगंधर्वांची मोहिनी होती. अभिजात संगीत नाटकांचा तो काळ होता. १९३०-३५ च्या सुमारास संगीत नाटकांना घरघर लागली. तोपर्यंत मूकपटांचे बोलपटात रूपांतर झाले. सिनेमाचा धंदा तेजीत आला. तसे नाट्यगृहांचे चित्रगृहांत रूपांतर झाले. जबडे सराफांचे ‘विजयानंद’, टापरे सावकारांचे ‘किर्लोस्कर नाट्यगृह’ (आताचे ‘वसंत’), किबे लक्ष्मी थिएटर (जुने ‘प्रभात’), लिमये नाट्य- चित्रमंदिर (बंद पडलेले ‘विजय’) आणि आता बंद पडलेले ‘भानुविलास’ अशा अनेक नवीन चित्रगृहांचा उदय झाला. १९६१ साली पुराने पुण्याला घेरेपर्यंत पुण्यात २०-२५ चित्रगृहे उभी राहिली होता. ‘मिनर्व्हा’, ‘श्रीकृष्ण’, ‘श्रीनाथ’, -‘शिरीन’, ‘भारत’ ‘छाया’, ‘हिंद विजय’, ‘डेक्कन’, ‘अपोलो’, ‘अल्पना’ आणि कॅम्पातील ‘वेस्टएंड’, ‘कॅपिटल’ आणि ‘एम्पायर’ अशी अनेक चित्रगृहे सिनेप्रेक्षकांची गर्दी खेचत होती. पानशेतच्या पुरानंतर पुण्याचा चेहरा-मोहराच बदलला. सायकलऐवजी व्हेस्पा आली. टांग्याऐवजी रिक्षा धावू लागल्या. पेठा-वाड्याचे असलेले पुणे चहुबाजूने पसरले. हिंदी सिनेमातही दिलीप-राज-देव या त्रिमूर्तीचा जमाना मागे पडून राजेश-अमिताभ युगाची चाहूल लागली होती. सिनेमा तंत्रही बदलत होते. कृष्ण-धवल सिनेमा रंगीत झाला. सिनेमास्कोप झाला. तशी त्याला अनुरूप सुसज्ज अशी अलंकार, नटराज, राहुल, मंगला, नीलायम, लक्ष्मीनारायण, सोनमर्ग व अप्सरा अशी अनेक थिएटर्स उदयाला आली. विसाव्या शतकाच्या अखेरीस ३५-४० चित्रगृहे पुण्यात होती. मात्र कोथरूड, औंध, सहकारनगर, बिबवेवाडी, कोंढवा अशा वाढत्या पुण्याच्या भागात ९०-९५ सालापर्यंत थिएटरचा मागमूस नव्हता.

या साऱ्याच चित्रगृहांना स्वत:ची स्वतंत्र ओळख होती. पुण्यातील पत्ता शोधण्याची ती ठळक खूण होती. बऱ्याच चित्रगृहांची बांधणी व रचना बेताचीच असली तरी प्रत्येकाची स्वतंत्र वैशिष्ट्ये होती. ‘वेस्टएंड’ला साहेबी ऐटबाजपणा होता. नटराज, नीलायम, राहुल, अलंकारला ७० एम. एम. चा भव्यपणा होता. ‘प्रभात’ स्वच्छता व टापटीप यामुळे ‘सभ्य’ चित्रगृह म्हणून ओळखले जात होते. कुठे स्टिरीओफोनिक साऊंड होता तर काही थिएटर्स वातानुकूलीत होती. काही चित्रगृहे विशिष्ट चित्रपटांच्या प्रदर्शनासाठी प्रसिध्द होती. मंडईत येणाऱ्या गाळेवाले व हमालांसाठी ‘आर्यन’ला तमाशापट तर ‘मिनर्व्हा’ला पौराणिक चित्रपट प्रदर्शित होत. वेश्यावस्तीतील थिएटरला ‘प्यासी जवानी’ तर मध्य भागात पांढरपेशांसाठी ‘फॅमिली ड्रामा’, कॅम्पातील विशेषत: ‘वेस्टएंड’ला आणि शहरातील ‘अलका’ला हॉलिवूडचे इंग्रजी चित्रपट प्रदर्शित होत असत.

१९४०-४५ च्या सुमारास तिकिटाचे दर चार आणे, आठ आणे होते. ते वाढत वाढत पाच-दहा-पंधरा करत पन्नास-साठ रुपयांपर्यंत पोहोचले. सिनेमा येऊन शंभर वर्षे झाली तरी शंभर रुपयांपर्यंत कधीच पोहोचले नाहीत. ते आजच्या इतके महाग मुळीच नव्हते! त्यामुळे ‘स्वस्त’ करमणुकीचा बाजार तेजीत होता. त्यामुळे आवडलेले आवडत्या नट-नट्यांचे चित्रपट पुन्हा पुन्हा पाहिले जात होते (मी २५ वेळा ‘शोले’ पाह्यला असे फुशारकीने सांगणारे प्रेक्षक होते.). ‘सेल्युलाईड’ युगातील सिनेमे असल्याने ते पुन्हा कधी पाहण्याची शाश्वती नसल्याने चित्रपटांचे रौप्यमहोत्सव, हीरकमहोत्सव होत होते. त्यामुळे अनेक गाजलेल्या चित्रपटांचा मुक्काम एकाच थिएटरला अर्धे वर्षे अथवा वर्षभर असे. ‘सांगत्ये ऐका’ चित्रपट विजयानंदला तब्बल १३१ आठवडे इतका विक्रमी चालला होता.

सध्याच्या काळाप्रमाणे चित्रपट एक-दोन आठवड्यात गाशा गुंडाळत नसत. गेल्या शतकाच्या अखेरपर्यंत ‘फर्स्ट रन’ ला तीन, सहा व नऊला शो असत. साधारण अडीच ते तीन तासांचे चित्रपट असत. या शिवाय दुपारी १२ वाजता ‘मॅॅटिनी’ हा अफलातून शो असे. सारे जुने चित्रपट ‘मॅटिनी’ला लागत असे. हरएक पिढीच्या ‘नॉस्टेल्जिया’ ला तेथे वाव असे. अपयशी, यशस्वी असे सारे जुने चित्रपट पुन्हा पुन्हा ‘मॅटिनी’ला लागत आणि ते पुन्हा पुन्हा बघणारे प्रेक्षकही असत. ‘दूरदर्शन’, ‘चित्रवाहिन्या’ आणि ‘व्हिडीओ’च्या आगमनानंतर ‘मॅटिनी’ कल्पना संपुष्टात आली आणि नवे चित्रपट चारही ‘शो’ ला लागू लागले. प्रारंभीच्या काळात तिकिटासाठी रांगा नसत. त्यामुळे ‘झुंबड’ उडत असे. पुढे रांगेत उभे राहून तिकिटे काढली जात. ‘हाऊसफुल्ल’चा बोर्ड लागला की निराशेने परतणारे शेकडो प्रेक्षक असत. रांगांना शिस्त लावण्यासाठी ‘चाबूक मॅनेजर’ही असत. थिएटरपाशी उगाचच रेंगाळणारे टोळभैरवही असत. ‘दो रुपये का… छे रुपया’ असं पुटपुटत भटकणाऱ्या काळाबाजारवाल्यांचा धंदाही तेजीत असे. काही थिएटर्समध्ये बाहेरील खाण्याचे पदार्थ आणण्यास मनाई असे तर काही थिएटर्सला सर्व काही चालत असे. त्यामुळे कोणत्या चित्रपटगृहात चित्रपट बघावयाचा हे प्रेक्षक आपल्या ‘क्लास’ नुसार ठरवत असत. समाजातील आर्थिक श्रेणीनुसार ठरविल्याप्रमाणे थिएटरची रचना तीन स्तरांवर असे. तळाचा वर्ग पिटात, पांढरपेशे-चाकरमाने ड्रेस सर्कल आणि उच्च-मध्यमवर्गीय-श्रीमंत बाल्कनीत. तिकिटाचे दरही तिहेरी श्रेणीत असत (५ रुपये, १० रुपये, २० रुपये) त्या-त्या दर्जाप्रमाणे चित्रपटातील गाण्यांना, संवादांना प्रतिसादही तसाच मिळत असे. पिटात शिट्ट्या, गोंगाट; ड्रेस सर्कलमध्ये टाळ्या आणि बाल्कनीत हुंकार. लाल, पिवळ्या, हिरव्यागर्द रंगाची पतंगाच्या कागदाची तिकिटे ‘क्लास’ प्रमाणे मिळत असत. आसन व्यवस्थेची दशा व दुर्दशा याचा अदमास प्रेक्षकांच्या पचनी पडलेला असे. चित्रपटांप्रमाणेच चित्रपटगृहांशी प्रेक्षकांचे नाते अतुट असे. प्रेक्षकही हरतऱ्हेचे असत. ‘चला पिक्चर टाकू’ मित्रामित्रांनी, ग्रुपने किंवा नाटकाप्रमाणे सजून-धजून जाणारी कुटुंबे असत. सुटी लागली की, हमखास सिनेमाचा आनंद लुटणारी तरुण पोरं असत. बाकीचे सगळे सुसाट सुटलो सायकल संगे, थेट धडकलो थेटरवरती म्हणत जाणारे एकएकटे चित्रशौकीन असत. त्या थिएटरच्या दुनियेत पांढऱ्या पडद्याच्या साथीने सिनेमा सुरू झाला की प्रकाशमान होत.

इंडियन न्यूजनंतर चित्रपटाचे सेन्सॉर सर्टिफिकेट दिसले की, एक स्वरात ‘अठरा’ (अठरा रिळं) असे ओरडणारे प्रेक्षक असत. फिल्म तुटली की कल्ला करणारेही असत. गाण्यांसाठी परत-परत त्याच सिनेमाला येणारे, तसेच गाण्यांच्या वेळी उठून जाणारे प्रेक्षकही असत. दंगा करणारे, टाळ्या-शिट्ट्यांनी कहर करणारे हमसाहमशी रडणारे, नको इतके हसणारे असे हरतऱ्हेचे प्रेक्षक असत. त्यात विविध वयाचे असत. कॉलेजला दांड्या मारून सिनेमा पाहण्याचे व्यसन लागलेले, लग्नानंतर प्रथमच जोडीने आलेले नवोदित दाम्पत्यही असत. तर कोणत्याही कौटुंबिक आनंदाचा कडेलोट एखाद्या सिनेमाच्या निमित्ताने चित्रपटगृहापाशीच होत असे.

१९८४ साली आलेल्या ‘रंगीत दूरदर्शन’ पूर्वीच्या काळात ‘सिनेमा’चे विश्व हे धुंद होतं. हे सारं दुर्मीळ होतं. अप्राप्य होतं. त्यामुळेच त्यात ‘थ्रील’ होतं. आणि त्याचमुळे ‘मॅटिनी’सह या काळात प्रदर्शित झालेले शेकडो सिनेमे पुण्यातील सरत्या काळातील तीन-चार पिढय़ांचा ‘नॉस्टेल्जिया ’ बनला… त्यामुळेच या काळातील साऱ्या आठवणी चित्रपटगृहांपाशी रेंगाळतात. म्हणून ही चित्रपटगृहे आठवणींची गोदामे झाली.

नव्या शतकात ‘मल्टिप्लेक्स’च्या आगमनानंतर ही सारी ‘चित्रपट’ संस्कृती आमूलाग्र बदलली. चाफळकर बंधूंच्या सहा ‘मल्टिप्लेक्स’सह आज पुण्यात आयनॉक्स, पी. व्ही. आर, सिनेपोलीस, फेम कार्निव्हल अशा अनेक पडदा चित्रपटगृहांच्या साखळी कंपन्यांकडे मिळून ३०-३५ मल्टिप्लेक्स व त्यांचे दीडशेच्यावर ‘स्क्रीन’ आहेत. कोथरूड, सिंहगड रोड, औंध, हिंजवडी, मगरपट्टा, कोंढवा, हडपसर, विमाननगर, येरवडा, थेरगाव या सर्व वाढत्या पुण्याला कवेत घेणारी मल्टिप्लेक्स निघाली आहेत.

सिनेमा जसा उत्क्रांत होत गेला तसे सिनेमा बघण्याचे तंत्र ‘मॉल संस्कृती’ आणि मल्टिप्लेक्सने बदलले. सेल्युलाइड युग संपुष्टात आले. ‘ॲनालॉग’चे अस्तित्व राष्ट्रीय चित्रपट संग्रहालयापुरते उरले. ‘डिजिटल युगा’ने वितरण प्रोजेक्शन, प्रदर्शन या चित्रपटगृहांच्या साचेबध्द कल्पनेतच क्रांती केली. नव्या तंत्राने चित्रपट अधिक उठावदार केला. चित्रगृहात स्वच्छता, टापटीप व आकर्षकपणा आणला. आसम व्यवस्थेत ‘समाजवाद’ आणला. एकाचवेळी ‘अनेक पडदा चित्रपटगृहांत’ चित्रपट प्रदर्शित करून एक-दोन आठवड्यांतच चित्रपटाला ‘यशस्विता’ बहाल करण्याचे कसब आणले. सकाळपासून रात्री उशिरापर्यंत शो लावण्याची सोय केली. चित्रपटांची लांबी कमी करून एकाच दिवसांत ७-८ शो लावण्याची किमया केली. ‘सॅटेलाईट’ व ‘डीसीपी’ प्रोजेक्शनमुळे पायरसी टळली व अचूकता आणली. प्रोजेक्शन अधिक सुभग व सुगम केले. चित्रपटांची तिकिटे ऑनलाइन मिळण्याची सोय करून थिएटरवरची झुंबड संपविली. ‘बुक माय शो’ सारखे ॲप मोबाइलला जोडून चित्रपटाचा प्रसार-प्रचार केला. एकाच ठिकाणी प्रेक्षकांना आपल्याला हव्या त्या चित्रपटांचा ‘स्क्रीन’ निवडण्याचा चॉईस दिला. डॉल्बी तंत्राने ध्वनी अधिक सुस्पष्ट व नेमका केला. खाणे-पिणे करत पाय पसरत रिलॅक्स व पॉश खुर्च्यांमधे बसून चित्रपट बघण्याचा आनंद दिला. पण जुने, स्मरणातले चित्रपट मोठ्या पडद्यावर पाहण्याची सोय संपुष्टात आणली. नव्या शतकातील या ‘आधुनिक चित्रपट’ संस्कृतीने छोट्या पडद्यावर घरीच मोफत किंवा अगदी स्वस्त सहजपणे चित्रपट उपलब्ध केला. मात्र मोठ्या पडद्यावर तो गरिबांना महाग केला. अप्राप्य केला. गेल्या शतकाच्या तुलनेत या ‘आधुनिक चित्रपट संस्कृतीने’ चित्रपटाबद्दल ‘नॉस्टेल्जिया’ संपविला. पुण्यातील पहिल्या ‘आर्यन’ चित्रपटगृहाच्या ६० व्या वर्धापनदिनानिमित्त गदिमांनी कवितेतून व्यक्त केलेले हे मनोज्ञ दर्शन याच भावनेची प्रचिती देते…

रसिकहो सुस्वागत आपुले

कृपा आपली म्हणून कलांचे प्रपंच विस्तारले।।

आपण कर्ते आणि करविते

सफल कलांचे आश्रयदाते

फलाधिकारी आपण, आपण उद्यान पोसिले।।

चित्रपटांना नव्हती वाणी

तेव्हापासून याच ठिकाणी

विज्ञानाचे विक्रम आपण पडद्यावर पाहिले।।

चित्रगृह हे जुने अलौकिक

महत्त्व याचे ऐतिहासिक

हे आवडते ‘आर्यन’ आता साठीला आले।।

आपण प्रेक्षक आमुचे दैवत

घरात तुमच्या तुमचे स्वागत

चिरस्थायी ही वास्तू व्हावी

तुमच्या इच्छाबले।।

ग. दि. माडगूळकर (१९७५)

‘आर्यन’सह पुण्यातील एकपडदा चित्रगृहांचे अस्तित्व नव्या शतकात संपुष्टात आले. विसाव्या शतकाचा ‘नॉस्टेल्जिया’ संपला आहे. जुन्या चित्रपटगृहांच्या आठवणी काळाच्या पडद्यामागे राहिल्या. त्या कायमच्याच.

(लेखक ज्येष्ठ चित्रपट आस्वादक-समीक्षक आहेत.)

Story img Loader