प्रदीप वैद्य
मुंबई किंवा अन्य कुठेही नाटकाच्या कामानिमित्त मी जेव्हा जातो तेव्हा, ‘तुमच्या पुण्यासारखं ‘थिएटर’ आमच्याकडे होत नाही हो!’ अशी स्वतःच्या गावा-शहराबद्दल नाराजी व्यक्त करणारी पुण्याची वाखाणणी आजकाल सतत ऐकू येते. नाटकातल्या प्रायोगिकतेकडे पाहता, ही वस्तुस्थिती असल्यामुळे मनाला छान तर वाटतंच, पण दुसरीकडे आपण या बदलाचे साक्षीदार आहोत याचंही काही तरी मनात हुळहुळतं.
प्रायोगिक नाटकाच्या संदर्भातल्या या बदलाचा कालखंड साधारण गेल्या पंचवीस वर्षांचा! सत्तरच्या दशकात ‘पुण्यात नाटक वेगळं घडतं’ अशी इतरत्र निर्माण होणारी एक प्रकारचं न्यून व्यक्त करणारी ओळख आज पुन्हा एकदा वेगळ्या परिमाणांनी आपल्या शहराला प्राप्त होताना दिसते आहे. याला कारण सत्तरच्या दशकात झालेली पायाभरणी हेही आहेच, पण नव्वदोत्तरी कालखंडात उभी राहिलेली आव्हानंच नाही तर सहस्रकाचा उंबरठा ओलांडताना अनेकांनी घेतलेल्या नव्या दिशा, नव्या ऊर्जेने होऊ पाहणारं काम आणि रंगभूमीविषयक नव्या जाणिवा-नेणिवा यात सतत कार्यरत आहेत. म्हणून कोविड काळाचा दुसरा उंबरठा समर्थपणे ओलांडून पुण्याची प्रायोगिक रंगभूमी आज रसरशीत काम आणि नवतेच्या ऊर्जेने भरून काम करते आहे.
सतत शोध घेणाऱ्या, अस्वस्थ आणि कृतिशील मनांचं, तसंच अथक, सातत्यपूर्ण आणि निष्ठापूर्ण उपक्रमशीलतेतून केल्या गेलेल्या कामाचं हे सर्व फलित आहे. यात आणखी काही गोष्टीही महत्त्वाच्या ठरतात. आर्थिक गणितं प्रतिकूल असतानाही नाटकाला आवश्यक असलेला वेळ देणं, त्यासाठी प्राथमिकता देणं ही मानसिकता इतर ठिकाणांच्या तुलनेत पुण्याच्या कलाकारांमध्ये अजूनही टिकून आहे. सातत्याने चुरस ठेवणारे पुरुषोत्तम, फिरोदिया, लोकांकिका यांसारखे इतरही विविध पातळ्यांवरील स्पर्धात्मक उपक्रम हा दुसरा मुद्दा आहे. राज्य किंवा स्थानिक सरकारच्या पातळीवरून पुण्याच्या नाट्यकर्मींच्या रसरशीतपणाची दखलही न घेतली जाणं हाही एक अत्यंत महत्त्वाचा घटक ठरतो. इथलं वातावरण बदलण्यात किंवा अत्यंत सुयोग्य दिशेने तापवण्यात पुण्याच्या काही व्यक्ती-संस्थांनी ‘यथाशक्ती-यथामती’चा व्यूह भेदून केलेल्या काही साहसी, काही निःस्वार्थी आणि दूरगामी पावलांचा महत्त्वाचा वाटा निश्चित आहे.
सर्वांत महत्त्वाचा प्रवास पुणेकर नाट्यविश्वाने केलेला दिसतो, तो नाटक सादर करण्यासाठी असलेल्या पायाभूत सुविधांमध्ये. सत्तरच्या दशकात असलेल्या सुविधा मनातून नाकारत असता, तरीही दुसरे पर्याय नसल्यामुळे त्याच पायाभूत सुविधा म्हणजे तीच नाट्यगृहं, पूर्वीच्याच जाहिरात आणि इतर संकल्पना वापरत पुण्याचे कलाकार अगदी सहस्रकाच्या उंबरठ्यावर येऊन ठेपेपर्यंत नाटक सादर करत होते. याच सुमारास पुण्यात ‘स्नेहसदन’ या नव्या अध्यायाला सुरुवात झाली. पुण्याच्या आजच्या नाटकाचा जो मार्ग आज प्रशस्त झाला आहे, तो या वाटेवरच प्रशस्त झाला. स्नेहसदन ही खासगी मालकीची जागा आहे. ती एक धार्मिक आस्थापना असूनही तेव्हाच्या संचालकांना साहित्य, नाट्य आणि संगीत इत्यादींत असलेला रस महत्त्वाचा ठरला. काही वर्षं हा समीप रंगमंचाचा पर्याय समर्थपणे चालला. नाटकाचं, सादरीकरणांचं एक वेगळं समीकरण मांडलं गेलं. समन्वय संस्थेने इथल्या समीप सादरीकरणांचा जणू वसाच घेतला होता. पुढे अनेक संस्था या ठिकाणी येऊ लागल्या. काव्य, संगीत, नाट्य अशा सादरीकरणांची प्रेक्षकांना सवय होऊ लागली आणि इतक्यातच स्नेहसदनमध्ये बदलून आलेल्या नव्या संचालकांना या अशा वापराबद्दल नापसंती असल्याने हे सर्व बंद केलं गेलं. अर्थातच हा पर्याय कलाकारांना अनुपलब्ध झाला. यापुढल्या घटनाक्रमातूनच आणखी एक महत्त्वाची गोष्ट घडली, ती म्हणजे सुदर्शन रंगमंचाची स्थापना. सुदर्शन हा तर खासगी समारंभ, लग्न किंवा शुभ कार्यासाठी दिला जाणारा हॉल होता. त्याचं रूप नाटकाच्या समीप सादरीकरणाच्या दृष्टीने बदललं गेलं. आवश्यक किमान सुविधा उपलब्ध करून दिल्या. तेव्हा नव्यानेच सुरू झालेली आसक्त नाटक कंपनी, ललित कला केंद्रातून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांच्या संस्था, महाराष्ट्र कल्चरल सेंटर, समन्वय आणि पुढे पुढे आणखी नव्या नव्या संस्था आजतागायत सुदर्शनच्या अंगणात अक्षरशः बागडत आल्या आहेत. सुदर्शन रंगमंचामुळे पुण्याच्या नाटकातल्या प्रायोगिकतेला नवी दिशा, आश्वासन, विश्वास आणि ऊर्जा प्राप्त होत गेली.
याच पहिल्या दशकात पुण्यातील नाटकं पुण्याबाहेरच्या स्पर्धात्मक आणि अन्य मान्यवर महोत्सवांमध्ये निवडली जाण्याचं प्रमाण वाढू लागलं. पुण्याच्या प्रायोगिकतेला ‘अवकाश’ हे परिमाण ललकारू लागलं. दिग्दर्शक वर्षानुवर्षं पाळलेल्या सादरीकरणाच्या आणि संसाधनांच्या चौकटीबाहेर पडण्याचा प्रयत्न करू लागलेले दिसू लागले. वेगळी वाट चालण्याची, चालून पाहण्याची ऊर्मी, मग ती आकृतिबंधांतून असेल, सहकार्याने उभारलेल्या नाटकाची असेल, महोत्सवांची असेल, कार्यशाळांची असेल, ती जोर धरू लागली. पुण्यातील नाटकं बाहेर जाणं तर वाढलंच, पण बाहेरची नाटकं पुण्यात सादर होण्याचं प्रमाणही खूप वाढू लागलं.
या सर्वांतून उपलब्ध संसाधनांचा, विशेषतः सादरीकरणाच्या जागांचा पुण्यातील दिग्दर्शकांचा विचार बदलू लागला. दोन बाजूंना प्रेक्षक आणि मध्ये सादरीकरण, नेपथ्य म्हणून असलेल्या केवळ पलंगाच्या बाजूला लगेच प्रेक्षक, तीन बाजूंना प्रेक्षक असे प्रयोग उपलब्ध जागांमध्येच (तसे आव्हानात्मक असूनही) केले जाऊ लागले. ललित कला केंद्रासारख्या आस्थापना आणि इतर अनेक विश्वासार्ह नाट्य प्रशिक्षण प्रणाली सुरू झाल्या. नाटका-अलीकडच्या आकृतिबंधांवरही बरंच काम होऊ लागलं. जसं अभिवाचन, अभिनीत अभिवाचन, एकलनाट्य (सोलो) आणि या सगळ्या कलात्मकतेला, वेगवेगळ्या प्रकारच्या रचना, अवकाश, मिती, दिग्दर्शकीय नजरा शोधू लागल्या.
असं आधी कधीच झालं नसेल का? तर नक्की झालं होतं की; पण ते त्या त्या एखाद्या उपक्रमापुरतं मर्यादित राहून गेलं. एखाद्या दृष्टीला ऊर्जा मिळत उपक्रमशील माणसं कामाला लागून वणव्याला हवा मिळत जावी, तसं ते तेव्हा झालं नाही.
आता मात्र आजूबाजूला तयार झालेल्या (एका अर्थी) मागणीला कलाकार किंवा काही व्यक्तींचं मन प्रतिसाद देऊ लागलं आणि पुण्याने नाटकासाठी प्रयोगशीलता जपणाऱ्या समांतर व्यवस्था निर्माण करायला सुरुवात केली. पुणे शहरात प्रामुख्याने गॅदरिंगच्या थाटात इंग्रजी नाट्यनिर्मिती आजवर करू शकलेल्या, शहराच्या पूर्व आणि ईशान्य भागातही याची सुरुवात होऊ लागली. ग्यान अदब, टिफासारख्या जागा उदयाला आल्या. येत गेल्या. सुदर्शनच्या जोडीने ज्योत्स्ना भोळे रंगमंच पुढे विकसित झाला. उपनगरांमध्ये काही सादरीकरणांच्या निमित्ताने काही नवे अवकाश शोधले गेले. अक्षरनंदन शाळेचा, कलाछायाचा रंगमंच वापरला जाऊ लागला. ललित कला केंद्रात अंगणमंच विकसित झाला आणि तिथं वेगळ्या परिमाणाची सादरीकरणं पाहण्यासाठी खुलीही झाली. प्रेक्षकांनाही हे आवडू लागल्याचं प्रतिसादावरून दिसत राहिलं. अशा सर्व भारलेल्या-भरलेल्या अवस्थेत बंगल्याचं गॅरेज, इमारतीची गच्ची, एखाद्या घराचा मोठा हॉल, घराघरांत जाऊन नाटक, एखाद्या बंगल्यात सर्व खोल्या वापरत केलेलं नाटक अशा सर्व आणि आणखीही विविध शक्यता पुण्यातील नाट्यकर्मींकडून सातत्यपूर्ण पद्धतीने सर्वत्र पडताळल्या जाऊ लागल्या. आणि…
…कोविड दाखल झाला!
मात्र, कोविडने रेखित केलेल्या काळाच्या या दुसऱ्या उंबरठ्यावर आधी ई लॅब स्टुडिओ आणि बाणेर भागातील ड्रामालय हे अतिशय छोट्या जागांचे स्टुडिओवजा उपक्रमही नाटक सादर करू लागलेले दिसले. कोविडनंतर यातूनच ‘द बॉक्स’ची सुरुवात झाली. द बॉक्सचं अनुकरण मग होऊ लागलं आणि आणखी काही जागा निर्माण झाल्या. बंद पडलेल्या कारखान्याच्या जागेत द बॉक्स, द बेस आणि पुणे स्टुडिओ अशा तीन जागांमध्ये नाटक घडू लागलं. प्रेक्षकांनीही कोविडग्रस्ततेतून बाहेर पडून दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद स्पष्ट जाणवला. पुढे ज्योत्स्ना भोळे रंगमंचाच्या इमारतीतील पहिल्या मजल्यावर डॉ. श्रीराम लागू रंगावकाश सुरू करण्यात आलं.
आज रेस्कॉन या बंद पडलेल्या कंपनीच्या जागेत द बेस आणि पुणे स्टुडिओ दुर्दैवाने बंद करण्यात आले असले, तरीही तिथे द बॉक्स कलासंकुलात पाच वेगवेगळ्या कलव्यवहाराच्या जागा, हिराबागेत एसेलआर ब्लॅक बॉक्ससह आणखी जागा असलेलं महाराष्ट्र कल्चरल सेंटरचं संकुल, पूर्व भागात कोविडच्या उंबरठ्यावर स्थापित झालेलं मोनालिसा कलाग्राम आणि शहराच्या नैऋत्य दिशेला थोडं बाहेर असलेलं झपूर्झा अशी खासगी संकुलं या शहराची सांस्कृतिक राजधानी म्हणून ओळख खऱ्या अर्थाने पूर्ण करत आहेत. पुष्कर रंगमंच, टी फॉर थिएटर, वोपा (WOPA) अशा उपक्रमांतून बऱ्याच छोट्या-मोठ्या जागा निर्माण होत चालल्या आहेत किंवा उभारी घेऊ लागल्या आहेत. नाटक ही कला एकटीनेच नाही, तर चित्र-शिल्पकला, संगीत, नृत्य आणि मानसशास्त्र, अर्थशास्त्र, पुरातत्त्व अशा इतर ज्ञानशाखांशी सलगी करत वाढतीय, सादर होतीय. एक नवी कलासंकुल-संस्कृती उदयाला येऊ लागली आहे. विविधांगी मनोरंजनाकडे प्रेक्षक आशेने आणि सकारात्मक पाहू लागले आहेत.
मात्र, आज पुणे शहर जेवढं विस्तार पावलं आहे त्यात शहराला सादरीकरणाच्या कलांसाठी एका भक्कम पायाभूत व्यवस्थेची गरज आहे. छोटे, मध्यम आणि मोठे असे मंच-अवकाश अनुक्रमे जास्त ते कमी प्रमाणात तयार व्हायला हवे आहेत. सध्याच्या या उपलब्ध व्यवस्थांमध्येही पुण्याच्या एकूण लोकसंख्येच्या एखाद-दोन टक्काच लोक प्रेक्षक असूनही भरपूर चैतन्याचा माहौल आहे. लोकसंख्येच्या प्रमाणात या सुविधा निर्माण होत गेल्या, तर काय होईल? ते महत्त्वाचं ठरेल हे जरी खरं असलं, तरी स्थानिक आणि राज्य पातळीवर शासनाला याची दखलही घ्यावीशी वाटत नाही, हे दुर्दैव आहे. घोले रस्त्यावर प्रायोगिक नाटकासाठी विकसित करायला घेतलेल्या रंगमंचाचा बट्याबोळ सर्वांनी पाहिला आहेच.
परंतु शासनाच्या अनास्थेमुळे रडत न बसता, कलाकार व्यक्ती किंवा कलाकार संस्था/समूहांनी नुसत्या जागा नाही, तर कलासंकुलं निर्माण करायला घेऊन, ती स्वबळावर किंवा स्वयंनिर्मित संसाधनांनी विकसित करून इथल्या कलाप्रेमी लोकांचं कलात्मक स्पंदन जोरकस करत नेलं आहे हे निःसंशय! या कामात यशस्वी ठरणारं पुणे हे एकमेव शहर मला भारताच्या नकाशावर दिसत आहे, विशेषतः गेल्या पंचवीस वर्षांत.
(लेखक प्रसिद्ध रंगकर्मी आहेत.)