पुणे : ‘महापुरुषांच्या कार्याविषयी विनाकारण काही द्वैत निर्माण करण्याची वृत्ती घातक आहे,’ असे मत इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक डाॅ. राजा दीक्षित यांनी सोमवारी व्यक्त केले. टिळक-आगरकर आणि टिळक-गांधी यांच्यामध्ये वैचारिक मतभेद जरूर होते. पण, ते एकमेकांचे विरोधक आहेत, असे चित्र निर्माण केले गेले. वास्तविक समाजाच्या उत्क्रांतीप्रमाणे व्यक्तिजीवनाची उत्क्रांती ध्यानात घेतली, तर महापुरुषांचे महत्त्व आपल्याला समजून घेणे शक्य होऊ शकेल. त्यासाठी इतिहासाची साक्षरता वाढण्याची गरज आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
वक्तृत्वोत्तेजक सभेच्या वतीने आयोजित दीडशेव्या वर्षीच्या वसंत व्याख्यानमालेचे उद्घाटन पुष्प डाॅ. राजा दीक्षित यांच्या व्याख्यानाने गुंफले गेले. ‘लोकमान्यांचे योगदान : ऐतिहासिक मीमांसा’ हा त्यांच्या व्याख्यानाचा विषय होता. त्या प्रसंगी दीक्षित बोलत होते. वक्तृत्वोत्तेजक सभेचे अध्यक्ष डाॅ. दीपक टिळक कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते.
‘लोकमान्य टिळक यांनी केवळ राजकीय नेतृत्व केले असे नाही, तर सामाजिक, भाषिक आणि सांस्कृतिक नेतृत्वही केले,’ असे सांगून दीक्षित म्हणाले, ‘लोकांमध्ये राष्ट्रभावना निर्माण करण्यासाठी त्यांनी गणेशोत्सव आणि शिवजयंती उत्सवामध्ये मेळा, कीर्तनाचा वापर केला. स्वातंत्र्य चळवळीचे नेतृत्व करणाऱ्या टिळक यांचा खिलाफत चळवळीला पाठिंबा होता. एका खटल्यामध्ये टिळकांचे वकीलपत्र बॅ. महंमद अली जिना यांनी घेतले होते. अफाट लोकसंग्रहाचे आंदोलनामध्ये रूपांतर करण्याची हातोटी टिळक यांच्याकडे होती. त्याला विराट जनचळवळीचे स्वरूप महात्मा गांधींनी दिले.’
‘कार्ल मार्क्सचा परिचय लोकमान्य टिळक यांनी सर्वप्रथम करून दिला. त्यांनी शब्दकोशाची निर्मिती केली. मंडालेच्या तुरुंगात असताना त्यांनी गीतारहस्य लिहिले. भाषांतराच्या माध्यमातून मराठी भाषा समृद्ध केली. भाषेवरचे प्रभुत्व हे त्यांना प्रभुत्वाची भाषा करण्यासाठी उपयोगी पडले. १९१३ मध्ये भारतामध्ये चित्रपट आला तेव्हा त्याच्या निधी संकलनासाठी टिळकांनी दादासाहेब फाळके यांना आर्थिक मदत केली होती. तर, बाबूराव पेंटर यांना काँगेसच्या व्यासपीठावर सन्मानित केले होते. ‘हा माणूस वेगळा आहे’, असे टिळक यांनी १९१६ मध्येच गांधी यांच्याविषयी लिहिले होते. इतकेच नव्हे, तर गांधींना काँग्रेसच्या विविध समित्यांवर घ्यावे, असा आग्रह टिळकांनी धरला होता,’ असेही दीक्षित यांनी सांगितले.
इतिहास हे सर्जनशील लेखन आहे. त्यामुळे एकाच कालखंडाचा दोन व्यक्तींनी लिहिलेला इतिहास परस्परविरोधीसुद्धा असू शकतो. इतिहास म्हणजे सामाजिक मानसिकता, आत्मशोध, अस्मिता, ओळख असते. इतिहास हा भूतकाळ आणि वर्तमानकाळ यांच्यातील संवाद असतो.
डाॅ. राजा दीक्षित, इतिहासाचे ज्येष्ठ अभ्यासक