पुणे : भाजी खरेदी करताना झालेल्या वादातून ग्राहकाने भाजी विक्रेत्यावर चाकूने वार केल्याची घटना खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत घडली. ग्राहकाचा खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी भाजी विक्रेत्याविरुद्द खडकी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. मनोज स्वामी (रा. इंदिरानगर, खडकी) असे गु्न्हा दाखल केलेल्याचे नाव आहे. आरोपीने केलेल्या हल्ल्यात भाजी विक्रेते शौकत बाबामियाँ (वय ३६, रा. दर्गा वसाहत, खडकी) गंभीर जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शौकत बाबामियाँ यांचा खडकीतील संजय गांधी भाजी मंडईत भाजी विक्री व्यवसाय आहे. आरोपी मनोज स्वामी मंगळवारी रात्री साडेआठच्या सुमारास भाजी खरेदीसाठी आला होता. भाजी खरेदी करताना आरोपी स्वामीने त्यांच्याशी वाद घालून शिवीगाळ केली. बाचाबाचीतून त्याने गाळ्यावरील चाकूने शौकत यांचा गळा आणि चेहऱ्यावर चाकूने वार केला. गंभीर जखमी झालेल्या शौकत यांना मंडईतील भाजी विक्रेत्यंनी रुग्णालयात दाखल केले. आरोपी पसार झाला असून, सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन बेंदगुडे तपास करत आहेत.

Story img Loader