पुणे : भरधाव वेगाने मोटार चालवताना नियंत्रण सुटल्याने मोटार थेट दुकानाचा लोखंडी दरवाजा तोडून आत शिरल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री टिळक रस्त्यावर घडली. याप्रकरणी पोलिसांनी चार अल्पवयीनांना ताब्यात घेतले, सुदैवाने या घटनेत कोणी गंभीर जखमी झाले नाही.
पसार होण्याच्या तयारीत असलेल्या अल्पवयीनांना रहिवाशांनी पकडून पोलिसांच्या ताब्यात दिले. अल्पवयीन मुले एका मित्राच्या मोटारीतून शनिवारी मध्यरात्री डेक्कन जिमखाना परिसरात गेले होते. एका उपाहारगृहात जेवण केल्यानंतर मध्यरात्री ते मोटारीतून टिळक रस्त्याने स्वारगेटकडे निघाले होते. मोटारीतून भरधाव वेगाने निघालेल्या मोटार चालविणाऱ्या अल्पवयीनाचे नियंत्रण सुटले. साहित्य परिषद चौकाजवळ मोटार थेट पदपथावर चढली. मोटार एका दुकानाच्या दरवाज्यावर आदळली. धडक एवढी जोरात होती की दुकानाचा लोखंडी दरवाजा तुटला.
हेही वाचा – पिंपरी-चिंचवडमध्ये कंपनीला भीषण आग; आगीचे कारण अस्पष्ट
हेही वाचा – पुणे : विवाहाच्या आमिषाने महिलेवर बलत्कार, आरोपीकडून अधिकारी असल्याची बतावणी; ३८ लाखांची फसवणूक
अपघात झाल्यानंतर मोठा आवाज झाला. गाढ झोपेत असलेले रहिवासी जागे झाले. मोटारचालक अल्पवयीन आणि त्याचे मित्र घाबरलेले होते. मुलांनी परस्पर एका क्रेनचालकाला दूरध्वनी केला. मोटार जागेवरुन हलविण्यास सांगितले. अपघातानंतर आवाजाने जागे झालेल्या रहिवाशांनी तेथे धाव घेतली. रहिवाशांच्या लक्षात हा प्रकार आला. त्यानंतर या घटनेची माहिती विश्रामबाग पोलिसांना कळविण्यात आली. गस्तीवरील पोलीस कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. सुदैवाने या घटनेत कोणी जखमी झाले नाही. मुलांना ताब्यात घेण्यत आले. या घटनेची नोंद विश्रामबाग पोलीस ठाण्यात करण्यात आली नाही, अशी माहिती पोलिसांना दिली.