पुणे : शहरात परिसरात वाहन चोरट्यांनी उच्छाद मांडला आहे. गेल्या दोन दिवसात ११ दुचाकी आणि दोन रिक्षा अशी वाहने चोरीला गेल्याचे उघडकीस आले. चंदननगर, चतुः शृंगी, स्वारगेट, सिंहगड रस्ता, लोणीकंद, हडपसरसह वेगवेगळ्या भागातून वाहने चोरीला गेली आहे. सणासुदीत वाहन चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.
शहरातून वाहन चोरीचे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण वाढत आहे. शहरातून दररोज किमान चार ते पाच वाहने चोरीला जातात. त्यात सर्वाधिक दुचाकी असतात. सोसायटी, शैक्षणिक संस्था, तसेच व्यावसायिक संकुलासमोर लावलेल्या दुचाकी चोरुन चोरटे पसार होतात. दुचाकींसह रिक्षा, मोटारी, टेम्पो चोरीला जातात. धायरी फाटा परिसरातील यशदा अभ्यासिकेसमोर रस्त्यावर लावलेली दुचाकी चोरल्याप्रककरणी सिंहगड रस्ता पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत किरण कदम (वय ३८) यांनी फिर्याद दिली आहे. दुसऱ्या घटनेत चतुःशृंगी परिसरातील प्राईम रोझ सोसायटीजवळ लावलेली दुचाकी चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत राहुल गलांडे (३०) यांनी फिर्याद दिली आहे. पाषाण भागात देखील दुचाकी चोरीची घटना घडली असून. याप्रकरणी चतु: शृंगी पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल आहेत.
जुन्या मुंढवा रस्त्यावर व्यंकटेश हाॅस्टेलसमोर लावलेली रिक्षा चोरट्याने चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याबाबत परमेश्वर घुले (२२) यांनी चंदनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. याच भागात खराडी बाह्यवळण मार्गावर परिसरातील गॅरेजमध्ये दुरुस्तीसाठी ठेवलेली रिक्षा चोरट्याने चोरून नेली. याबाबत सिद्धराम बाळशंकर (वय ४६) यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी चंदननगर पोलिसांनी गुन्हा दाखल केला. सहकारनगर, तसेच सिंहगड रस्त्यावरील नऱ्हे, वाघोतील कवडे वस्ती भागातून दुचाकी चोरील्या गेल्याच्या घटना उघडकीस आल्या आहेत.
हेही वाचा – ‘पर्वती’मध्ये आमदार मिसाळांची धाकधूक वाढली?
मोटारीची काच फोडून लॅपटाॅप चोरी
टिळक रस्ता परिसरात माेटारीची काच फोडून चोरट्यांनी लॅपटाॅप चोरून नेला. शंकरशेठ रस्त्यावरील सेव्हन लव्हज चौक परिसरात मोटारीची काच फोडूनलॅपटॉप, कागदपत्रे चोरून नेली. याप्रकरणी स्वारगेट पोलीस ठाण्यात दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.