पुणे : किरकोळ वादातून एका अल्पवयीनाने साथीदारांसह जनता वसाहत परिसरात दहशत माजवित वाहनांची तोडफोड केली. तोडफोडीत मोटारी, रिक्षा, दुचाकींसह सहा ते सात वाहनांचे नूकसान झाले आहे. याप्रकरणी पर्वती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी दोघांना अटक केली. अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे.

शंतनू जगताप, पियूष गाकवाड अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. याबाबत संजय जाधव (वय ५१, रा. जनता वसाहत) यांनी पर्वती पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. शुक्रवारी पहाटे साडेतीन वाजताच्या सुमारास जनता वसाहत भागात ही घटना घडली. ताब्यात घेतलेला अल्पवयीन सराइत आहे, अशी माहिती पर्वती पोलिसांनी दिली.

हेही वाचा – लोकजागर : ‘भावी आमदारां’च्या फलकांना आवरणार कोण?

आरोपींची जनता वसाहतीतील काही जणांशी वादावादी झाली हाेती. त्यानंतर अल्पवयीन, त्याचे साथीदार दांडके घेऊन जनता वसाहतीत आले. त्यांनी यामध्ये तीन रिक्षा, दोन मोटारी, दुचाकींची तोडफोड केली. आरोपींनी जाधव यांच्या मोटारीची तोडफोड केली. त्यांनी आरोपींना जाब विचारला. तेव्हा आरोपींनी त्यांना दांडक्याने मारहाण केली. जाधव यांच्या भावाने मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केला. तेव्हा आरोपींनी त्याला मारहाण केल्याचे जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे.

हेही वाचा – आव्वाज कुणाचा?

‘आम्ही इथले भाई आहोत, आमच्या नादाला लागू नका’, असे म्हणून आरोपींनी परिसरात दहशत माजविली. त्यानंतर आरोपी पसार झाले. घटनेची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांच्यासह पथकाने घटनास्थळी धाव घेत माहिती घेतली. तोडफोड करणाऱ्या दोघांना पोलिसांनी अटक केली असून, अल्पवयीन साथीदाराला ताब्यात घेण्यात आले आहे. शहर, तसेच उपनगरात टोळक्याकडून दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. कोयते, तसेच दांडकी उगारून वाहनांची तोडफोड केली जाते. यापूर्वी जनता वसाहतीत किरकोळ वाद, तसेच वर्चस्वाच्या वादातून नागरिकांच्या वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना घडल्या आहेत. वाहन तोडफोडीच्या घटनांमुळे या भागातील रहिवासी दहशतीखाली आहेत.