पुणे : मुंबई-पुणे रस्त्यावरील पाटील इस्टेट भागातील महात्मा गांधी वसाहतीत टोळक्याने कोयते उगारून तीन ते चार दुचाकींची तोडफोड केल्याची घटना घडली. याप्रकरणी खडकी पोलिसांनी पाच जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला.

याप्रकरणी राजजूनी फौजानसिंग याच्यासह पाचजणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत सय्यद नूरजहाँ इराणी (वय ५६, रा. महात्मा गांधी वसाहत, पाटकर प्लाॅट, पाटील इस्टेट, मुंबई-पुणे रस्ता) यांनी खडकी पाेलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, राजजूनी आणि साथीदार बुधवारी रात्री महात्मा गांधी वसाहतीत शिरले. आरोपींनी कोयते उगारून शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. आरोपींनी दहशत माजवून वसाहतीत लावलेल्या तीन ते चार दुचाकींची तोडफोड केली. दहशत माजवून आरोपी पसार झाले. पसार झालेल्या आरोपींचा शोध घेण्यात येत असून, पोलीस उपनिरीक्षक दिग्विजय चौगले तपास करत आहेत.

शहर परिसरात वाहनांची तोडफोड करुन दहशत माजविण्याच्या घटना वाढीस लागल्या आहेत. दोन दिवसांपूर्वी येरवडा भागात टोळक्याने कोयते उगारुन दहशत माजविली होती. नागरिकांच्या घरावर कोयते आपटून आरोपी पसार झाले होते.

गेल्या दोन महिन्यात बिववेवाडी, येरवडा, कसबा पेठेतील कागदीपुरा वाहन तोडफोडीच्या घटना घडल्या होत्या. वाहनांची तोडफोड करणाऱ्या आरोपींविरुद्ध उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी कडक कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांना दिले होते. पोलिसांनी तोडफोड करणाऱ्या आरोपींविरुद्ध गुन्हे दाखल करुन त्यांची धिंड काढली होती. तोडफोडीच्या सर्वाधिक घटना उपनगरात घडतात. तोडफोडीच्या घटनांमध्ये अल्पवयीन मुले सामील असल्याची माहिती पाेलिसांनी दिली. वाहनांची तोडफोड करणाऱ्या सराइतांची यादी पोलिसांनी तयार केली आहे. तोडफोड करणाऱ्या सराइतांची माहिती संकलित करुन त्यांच्याविरुद्ध कावराईचे आदेश देण्यात आले आहेत. तोडफोड करणाऱ्या अल्पवयांनांविरुद्ध कायद्यातील कठोर तरतुदींचा आधार घेऊन कारवाईचे आदेश देण्यात आले आहेत.