Pune Video : मंदिर म्हटलं की देव असणार, पण तुम्ही कधी देव नसलेले मंदिर पाहिले आहे का? तुम्हाला वाटेल हे कसं शक्य आहे? पण, हे खरंय. ऐतिहासिक शहर म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुण्यात एक असं मंदिर आहे, जिथे देवच नाही. तुम्हाला प्रश्न पडला असेल की असं कसं शक्य आहे? आज आपण याच मंदिराविषयी सविस्तर जाणून घेणार आहोत.
प्रार्थना समाजाचे मंदिर
पुणे शहराला प्रचंड मोठा इतिहास लाभला आहे. तुम्हाला ब्राह्मो समाज माहिती आहे का? आपल्या विश्वाचा निर्माता ब्रम्हा आणि त्याची उपासना करणारा समाज म्हणजे ब्राह्म समाज आणि त्याच ब्रह्मोपासनेची पद्धती म्हणजे ब्राह्म धर्म. याच ब्राह्मो समाजापासून पुढे आला प्रार्थना समाज. पुण्यात बुधवार पेठेतील पासोड्या विठोबाच्या बाजूने जाणाऱ्या बोळात प्रार्थना समाजाचे मंदिर आहे.
‘गोष्ट पुण्याची‘ या खास लोकसत्ताच्या सीरिजमध्ये लोकसत्ता प्रतिनिधीने या मंदिराची भेट घेतली आणि या मंदिराचा इतिहास जाणून घेतला.
पाहा व्हिडिओ
हेही वाचा : रेल्वेत जनरल डबा सुरुवातीला आणि शेवटी का असतो? तर एसी डबे नेहमी मध्यभागीच का असतात? जाणून घ्या खरं कारण
मूर्ती नसलेले मंदिर
राजा राम मोहन रॉय यांनी १८२८ साली ब्राम्हो समाजाची संकल्पना बंगालमध्ये साकारली. नंतर १८६१ मध्ये पंडित नवीन चंद्र रॉय यांनी पहिल्या ब्राम्हो समाजाची स्थापना लाहोरमध्ये केली आणि पुण्यात प्रार्थना समाजाची शाखा १८७० साली न्यायमूर्ती रानडे आणि रामकृष्ण भांडारकर यांच्या पुढाकाराने स्थापन झाली.
बहुईश्वरवाद, मूर्तिपूजेचा विरोध, बालविवाह, सती, जात-पात यांसारख्या रुढी परंपरांचा बिमोड करण्याची प्रार्थना समाजाची मूळ उद्दिष्टे होती. पण, या विचारधारेचा प्रसार करण्यासाठी स्वतःच्या एका जागेची आवश्यकता होती. मग काय, १९०९ साली बुधवार पेठेतल्या पासोड्या विठोबा मंदिराच्या मागे असलेल्या एका जागेत ही बैठकीची जागा उभी राहिली. ही जागा पुढे प्रार्थना समाजाचे मंदिर म्हणून ओळखली लागली, त्यामुळे या मंदिरात मूर्ती नाही.
स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे हे मंदिर
सुरुवातीला हे एक छोटे मंदिर होते, मात्र पुढे १९२० साली सर नारायण गणेश चंदावरकर यांनी भांडारकरांच्याच वाढदिवशी मोठ्या वास्तूची पायाभरणी केली आणि आज ही मोठी वास्तू उभी राहिली. मूर्ती विरहित असलेली ही वास्तू पूर्ण दगडाची आहे. पौर्वात्य आणि पाश्चिमात्य घटकांचा वापर करून ही देखणी वास्तू साकार केली आहे. तीन मोठ्या कमानींच्या व्हरांड्यातून आत मधल्या मोठ्या सभागृहात प्रवेश करता येतो. या सभागृहाचा आकार बघून प्रार्थना समाज त्याकाळी किती लोकप्रिय आणि विस्तृत होता याची कल्पना येते. याच सभागृहात या समाजाच्या विचाधारा आणि प्रबोधनकारक, प्रसार करणारी व्याख्याने, सभा, विचारमंथने, बैठका इत्यादी होत असत.
ही वास्तू स्थापत्यकलेचा एक उत्तम नमुना आहे. फक्त पुण्यातीलच नाही तर महाराष्ट्रातील, भारतातील लोकांनी या जागेला भेट देऊन याचा इतिहास जाणून घेणे गरजेचे आहे.