‘कार्यकर्त्यांचा उत्साह, ढोल-ताशांचा गजर आणि त्याच्या जोडीला मानापमान, शक्तिप्रदर्शन आणि श्रेय घेण्याची अहमहमिका, राष्ट्रवादी कॉँग्रेसचा वरचष्मा आणि कॉंग्रेसच्या नेत्यांची जाणवणारी अनुपस्थिती अशा वातावरणात पुणे विद्यापीठाला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ अशी नवी ओळख शनिवारी मिळाली. सोलापूर विद्यापीठाच्या नामांतराची बीजेही या कार्यक्रमात रोवली गेली.
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करून ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नवे नाव या विद्यापीठाला देण्यात आले आहे. याबाबतचा अध्यादेश गेल्या आठवडय़ात जारी झाल्यानंतर नामविस्ताराचा औपचारिक सोहळा शनिवारी करण्यात आला. या वेळी विद्यापीठाच्या आवारातील डॉ. बाबासाहेब आंबेडकराच्या पूर्णाकृती पुतळ्याचेही अनावरण करण्यात आले. समारंभाला राज्यपाल के. शंकरनारायणन, केंद्रीय ग्रामविकास राज्यमंत्री उपेंद्र कुशवाह, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री राजेश टोपे, सार्वजनिक बांधकाम मंत्री छगन भुजबळ, माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार विनायक निम्हण, ज्येष्ठ समाजसेवक डॉ. बाबा आढाव, कुलगुरू डॉ. वासुदेव गाडे, कुलसचिव डॉ. नरेंद्र कडू आदी उपस्थित होते.
या वेळी शंकरनारायणन म्हणाले,‘‘राज्यात उच्च शिक्षणामध्ये बदल होणे आवश्यक आहे. उच्च शिक्षण अधिक रोजगारभिमुख होण्याची आवश्यकता आहे. राज्यात सध्या गुणवत्तापूर्ण शिक्षकांची मोठय़ा प्रमाणावर गरज आहे. जी महाविद्यालये आवश्यक त्या पायाभूत सुविधांची पूर्तता करत नाहीत किंवा ज्या ठिकाणी योग्य प्रमाणात पात्रताधारक शिक्षक नाहीत, त्यांच्यावर शासनाने कारवाई करावी.’’ या वेळी पवार म्हणाले, ‘‘ज्या पुण्यात सावित्रीबाई फुले यांना विरोध झाला त्या पुण्यातील विद्यापीठाचा नामविस्तार करून त्याला सावित्रीबाई फुले यांचे नाव देणे यापेक्षा दुसरी मोठी आदरांजली सावित्रीबाई फुले यांना नाही. अहिल्याबाई होळकरांचे नाव सोलापूर विद्यापीठाला देण्याची भूमिका रास्त आहे. त्यासाठी आता सोलापूरकरांनी आग्रह धरावा.’’
या वेळी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक महोत्सव समितीच्यावतीने विद्यापीठाच्या प्रवेशद्वारापासून डॉ.आंबेडकरांच्या पुतळ्यापर्यंत शोभायात्रा काढण्यात आली. या वेळी समितीचे अध्यक्ष परशुराम वाडेकर,दीपक म्हस्के, गौतम बेंगाळे आदी उपस्थित होते.
 
श्रेय कुणाचे?
पुणे विद्यापीठाचा नामविस्तार करून ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे नाव करण्याचा प्रस्ताव मी मंत्रिमंडळात मांडला आणि त्याला मंत्रिमंडळाने मंजुरी दिली, असे उच्चशिक्षण मंत्री राजेश टोपे यांनी त्यांच्या भाषणात सांगितले. मात्र त्यावर, ‘‘नामविस्ताराचा इतिहास फार चांगला नसताना या वेळी आमच्या प्रयत्नांना विरोध झाला नाही, याबद्दल हा निर्णय घेणाऱ्या सर्वाचे अभिनंदन!’’ असा टोला भुजबळ यांनी लगावला. समता परिषदेने नामविस्तारासाठी केलेल्या प्रयत्नांचा दाखला देण्यासही भूजबळ विसरले नाहीत.

फुले यांच्या वारसांना आमंत्रण नाही
सावित्रीबाई फुले यांचे वंशज असलेल्या नीता होले यांना विद्यापीठाने कार्यक्रमाला निमंत्रितच केले नाही. विद्यापीठाच्या प्रवेशद्वारावरील फलकाचे अनावरण करण्यासाठी मान्यवर थांबलेच नाहीत. त्यामुळे मुख्य कार्यक्रम सुरू असताना होले यांनी या फलकाचे अनावरण केले आणि विद्यापीठात छोटेसे मानापमान नाटय़ रंगले. भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांच्या नेतृत्वाखाली विद्यापीठ नामकरण समितीची स्थापना झाली होती. मात्र, त्यातील सदस्यही नाराज आहेत.
 
मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती चर्चेत
कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांची अनुपस्थिती संपूर्ण कार्यक्रमाच्या वेळी चर्चेचा विषय ठरली. कार्यक्रमपत्रिकेवर नाव असूनही मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण कार्यक्रमाला उपस्थित राहिले नाहीत. त्याचबरोबर शहर काँग्रेसचे नेतेही या कार्यक्रमाला अनुपस्थित होते.
 
आंबेडकरांच्या पुतळ्यावरून नाराजी
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात शनिवारी अनावरण करण्यात आलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचा चेहरा हा आंबेडकरांच्या चेहऱ्याशी मिळत नसल्याचा आक्षेप आंबेडकरवादी संघटनांनी घेतला आहे. याबाबत या संघटनांनी कुलगुरूंना निवेदन देऊन आंदोलनाचा इशारा दिला आहे. समता परिषदेने हा पुतळा विद्यापीठाला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा