पुणे : विमाननगर भागातील झोपडपट्टी पुनर्वसन योजनेअंतर्गत (एसआएए) बांधण्यात आलेल्या वसाहतीत दोन गटात हाणामारी झाल्याची घटना घडली. भांडणे सोडविण्यासाठी आलेल्या पोलिसांना धक्काबुक्की करण्यात आली. याप्रकरणी विमानतळ पोलीस ठाण्यात तीन गुन्हे दाखल करण्यात आले असून, पोलिसांकडून ६० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

याबाबत महेश सिकंदर पारधे (वय १८, रा. एसआरए वसाहत, विमाननगर) याने विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्याने दिलेल्या फिर्यादीनुसार, १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ फेब्रुवारी रोजी महेश आणि त्याचे मित्र इमारतीतील तळमजल्यावर गप्पा मारत थांबले होते. त्या वेळी आरोपींनी काही कारण नसताना पारधे आणि त्याच्याबरोबर असलेल्या दोन मित्रांना हाॅकीस्टीकने मारहाण केली. त्यांना दगडा फेकून मारला. आरोपींनी वसाहतीच्या आवारात दहशत माजविली, असे पारधेने दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे. सहायक पोलीस आयुक्त प्रांजली सोनवणे तपास करत आहेत.

एसआरए वसाहतीतील रहिवासी यासीन नियाजुद्दीन शेख (वय ३८) याने विमानतळ पोलीस ठाण्यात परस्परविरोधी फिर्याद दिली आहे. शेेखने दिलेल्या फिर्यादीनुसार, अकरा जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी किरकोळ वादातून शस्त्रे उगारुन मारहाण केली. शेख याच्या डोक्यात शस्त्राने वार करुन दहशत माजविली, तसेच घरात शिरुन वस्तुंची तोडफोड केली, असे शेख याने परस्पर विरोधी फिर्यादीत म्हटले आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत. शहरात किरकोळ वादातून दोन गटात हाणामारी, तसेच दहशत माजविण्याचे प्रकार वाढीस लागले आहेत. किरकोळ वादातून वाहनांची तोडफोड करण्याच्या घटना शहरात घडल्या आहेत.

महिला पोलिसाला शिवीगाळ

एसआरए वसाहतीत दोन गटात हाणामारी झाल्याची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. त्या वेळी दोन गटातील वाद सोडविण्याचा प्रयत्न करणाऱ्या महिला पोलीस कर्मचाऱ्याला शिवीगाळ करुन धक्काबुक्की करण्यात आली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी तीन महिलांसह २५ ते ३० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याबाबत पोलीस हवालदार नीलम मोहरे यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलीस उपनिरीक्षक चेतन भोसले तपास करत आहेत.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pune viman nagar slums fight between two groups police beaten up case against 60 persons pune print news rbk 25 css