पुणे : अलीकडच्या काळात वाचनापासून दुरावत असलेल्या विद्यार्थ्यांना पुस्तके, वाचनाकडे आकर्षित करण्यासाठी १ ते १५ जानेवारी या कालावधीत ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. त्यात सामूहिक वाचन, वाचन संवाद, वाचन कौशल्य कार्यशाळा, पुस्तक परीक्षण आणि कथन स्पर्धा असे उपक्रम राबवण्यात येणार आहेत.

उच्च व तंत्रशिक्षण विभागाने या बाबतचा शासन निर्णय प्रसिद्ध केला. त्याद्वारे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाबाबतच्या मार्गदर्शक सूचना आणि कार्यपद्धती देण्यात आली आहे. राज्यातील उच्च शिक्षण संस्थांमध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी हा उपक्रम राबवण्यात येणार आहे. उपक्रमाअंतर्गत विद्यार्थ्यांना अभ्यासक्रमाव्यतिरिक्त अन्य कोणतेही पुस्तक वाचायचे आहे. या पुस्तकावर किमान ५०० शब्दांचे परीक्षण किंवा पाच मिनिटांचे सादरीकरण करायचे आहे. वाचनीय पुस्तकांची यादी प्रसिद्ध करून उच्च शिक्षण संस्थेने विद्यार्थ्यांना पुस्तके उपलब्ध करून द्यायची आहेत. स्पर्धेतील विजेत्या परीक्षणांचा समावेश महाविद्यालयाच्या वार्षिक अंकात कारावा. स्पर्धेतील विजेत्यांना २६ जानेवारी रोजी पारितोषिक प्रदान करण्याबाबत स्पष्ट करण्यात आले आहे.

हेही वाचा…धनंजय मुंडे यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करण्याची अजित पवारांकडे मागणी, मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने निवेदन

उपक्रमासाठी राज्यस्तरीय समिती, विभागस्तरीय समिती, जिल्हास्तरीय समिती, महाविद्यालयीन स्तरीय समिती नियुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. तसेच वाचन पंधरवड्यानिमित्त महाविद्यालये, सार्वजनिक ग्रंथालयांनी पुस्तक प्रदर्शन आयोजित करावे. ग्रंथालयांनी अधिकाधिक विद्यार्थ्यांची सभासद नोंदणी करावी, असेही नमूद करण्यात आले आहे.

वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमात राज्यातील सहा हजारांहून अधिक महाविद्यालये, ८३ विद्यापीठे, साडेबारा हजार ग्रंथालयांचा सहभाग आहे. शहरी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना यात सहभागी होता येईल. विद्यार्थ्यांनी पंधरा दिवसांत एक पुस्तक वाचून त्याचे परीक्षण लिहिणे किंवा सादरीकरण करणे अपेक्षित आहे. राज्यातील दहा विभागातील सर्वोत्कृष्ट प्रत्येकी तीन विद्यार्थ्याची निवड करून त्या तीस विद्यार्थ्यांना मान्यवरांकडून मार्गदर्शन करण्यात येईल. वाचन प्रेरणा दिनाअंतर्गत वाचन उपक्रम होत असला, तरी तो उपक्रम आणि वाचन संकल्प महाराष्ट्राचा हा उपक्रम यात गुणात्मक फरक आहे. केवळ विद्यार्थ्यांसाठी असलेला हा उपक्रम एक प्रकारे विक्रमच ठरेल, असे उच्च शिक्षण संचालक डॉ, शैलेंद्र देवळाणकर यांनी सांगितले.

हेही वाचा…Chandrakant Patil : पुण्याचं पालकमंत्रिपद मिळालं तर स्वीकारणार का? चंद्रकांत पाटलांचं मोठं विधान; म्हणाले, “माझं नेतृत्व मला…”

नव्या उपक्रमाची भर

दरवर्षी १५ ऑक्टोबर रोजी वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात येतो. त्या अंतर्गत वाचन उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. त्यामुळे आता वाचन संकल्प महाराष्ट्राचा या नव्या उपक्रमाची भर पडल्याचे दिसून येत आहे.

Story img Loader