नारायणगाव : वारुळवाडी ग्रामपंचायतचे सरपंच राजेंद्र मेहेर यांचेवर अविश्वास ठराव दाखल होताच त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा जुन्नरचे तहसीलदार सुनील शेळके व गटविकास अधिकारी विठ्ठल भोईर यांच्याकडे सुपूर्द केला आहे. यावेळी पॅनल प्रमुख व उद्योजक संजय वारुळे, जालिंदर कोल्हे, माजी ग्रामपंचायत सदस्य विपुल फुलसुंदर , विद्यमान सदस्या माया डोंगरे उपस्थित होते.
सरपंच राजेंद्र मेहेर यांच्यावरील अविश्वास ठरावावर १७ पैकी १४ सदस्यांनी सह्या करून मंगळवारी (दि.११) जुन्नरचे तहसीलदार व गटविकास अधिकारी यांच्याकडे अविश्वास ठराव दाखल केला होता. अविश्वास ठरावावर सोमवारी (दि.१७) वारूळवाडी ग्रामपंचायत येथे मतदान प्रक्रिया पार पडणार होती. परंतु अविश्वास ठरावावरील मतदान प्रक्रिया पार पडण्यापूर्वीच सरपंच राजेंद्र मेहेर यांनी पॅनल प्रमुख संजय वारुळे यांना सोबत घेऊन आपला सरपंच पदाचा राजीनामा दिला. १४ ग्रामपंचायत सदस्यांनी अविश्वासावरील ठराव दाखल केल्यानंतर हे सर्व सदस्य अज्ञातस्थळी रवाना झाले आहेत , सरपंचपदा साठी विनायक भुजबळ यांचे नाव निश्चित झाले आहे , सरपंच निवडणूकीच्या दिवशी सर्व सदस्य उपस्थित राहणार आहेत.