पुणे : महापालिकेची दांडेकर पूल परिसरातील जलवाहिनी सोमवारी रात्री फुटल्यानंतर मंगळवारी जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. हे काम दिवसभर सुरू राहिल्याने पेठांसह अन्य काही भागातील पाणीपुरवठा विस्कळीत झाला. दरम्यान, या भागाचा पाणीपुरवठा बुधवारी (२६ मार्च) रोजी पूर्ववत होईल, असा दावा महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून करण्यात आला.
पर्वती जलकेंद्रांतून सदाशिव पेठ, शिवाजीनगर परिसराला पाणीपुरवठा करण्यात येतो. सोमवारी रात्री साडेनऊच्या सुमारास दांडेकर पूल परिसरातील ७०० मिमी व्यासाची जलवाहिनी फुटली. जलवाहिनी फुटल्यानंतर पाण्याच्या वेग प्रचंड असल्याने रस्ता उखडला गेला तसेच लाखो लीटर पाणी वाया गेले होते.
हा प्रकार घडल्यानंतर पाणीपुरवठा विभागाकडून तातडीने जलवाहिनी दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले. मात्र दुरुस्तीचे साहित्य पिंपरी-चिंचवड येथील भोसरी येथून मागविण्यात आल्याने ते येण्यास विलंब झाला. त्यामुळे मंगळवारी सायंकाळपर्यंत जलवाहिनी दुरुस्तीचे काम सुरू होते. त्याचा परिणाम मंगळवारी मध्यवर्ती भागा, पेठांचा परिसर आणि शिवाजीनगर येथील पाणीपुरवठ्यावर दिसून आला. या भागाचा पाणीपुरवठा मंगळवारी दिवसभर विस्कळीत होता.
सदाशिव पेठ, नारायण पेठ, कसबा पेठेसह डेक्कन, आपटे रस्ता, गोपाळकृष्ण गोखले रस्ता, सेनापती बापट रस्ता, माॅडेल काॅलनी, जंगली महाराज रस्ता परिसराला सुरळीत पाणीपुरवठा होऊ शकला नाही.
यंदाच्या उन्हाळ्यात शहरावर पाणीकपातीचे सावट निर्माण झाले आहे. शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या खडकवासला धरणसाखळी प्रकल्पातील पाणीसाठा झपाट्याने कमी होत असल्याने पाणी काळजीपूर्वक आणि काटकसरीने वापरण्याची सूचना जलसंपदा विभागाने महापालिकेला केली आहे. तसेच शहराच्या अनेक भागातील पाणीपुरवठाही गेल्या काही दिवसांपासून विस्कळीत झाला आहे. त्याबाबतच्या तक्रारी सातत्याने महापालिकेच्या पाणीपुरवठा विभाग आणि क्षेत्रीय कार्यालयांकडे करण्यात येत आहेत.
दरम्यान, दांडेकर पूल परिसरातील जलवाहिनी दुरुस्तीचे काम उशिरापर्यंत सुरू राहिले. त्यामुळे पाणीपुरठा विस्कळीत झाला. मात्र बुधवारी या सर्व भागाला योग्य आणि पुरेशा दाबाने पाणीपुरवठा केला जाईल. तसेच पेठांचा भाग आणि शिवाजीनगर मधील नागरिकांसाठी काही काळ जास्त पाणी सोडले जाईल, असे पाणीपुरवठा विभागाचे प्रमुख नंदकिशोर जगताप यांनी सांगितले. पाणीपुरवठा विस्कळीत झालेल्या भागातून टँकरची मागणी आल्यानंतर त्यांना टँकरद्वारे पाणीपुरवठाही महापालिकेडून करण्यात आला.